महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि गुजरात या चार राज्यांना सतर्कतेचा इशारा
मुंबई : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ हे येत्या २४ तासात आणखी तीव्र होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकणसह गुजरातमधील किनारपट्टीवर ५० ते ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि गुजरात या चार राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवसांत ते उत्तर आणि उत्तर-पश्चिम दिशेने सरकेल. या पार्श्वभूमीवर मच्छिमारांनी अरबी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
#WATCH | Gujarat: High waves are seen at Tithal beach of Valsad ahead of Cyclone Biparjoy.
Tithal Beach was closed for tourists as a precautionary measure by the Valsad administration following the cyclone Biparjoy warning (9/06) pic.twitter.com/TSvQfaiezv
— ANI (@ANI) June 10, 2023
कोकण किनारपट्टीसह गुजरातच्या किनारपट्टीवर देखील वेगाने वारे वाहू लागले आहेत. गणपतीपुळे येथील गणेश मंदिराच्या पाय-यांवरुन मंदिरात लाटा उसळत आहेत. वलसाडमध्येही मोठ्या लाटा उसळत आहेत. डुमास आणि सुवलीमध्ये वेगाने वारे वाहू लागले असून १४ जूनपर्यंत येथील किनारी भाग बंद करण्यात आला आहे. मच्छिमारांना आणि पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
भारतासह ओमान, इराण, पाकिस्तान या देशांवर चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता
या चक्रीवादळाचा परिणाम भारत, ओमान, इराण आणि पाकिस्तानसह अरबी समुद्राला लागून असलेल्या देशांवर होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ आता पूर्व-मध्य अरबी समुद्रातून हळूहळू उत्तर आणि वायव्येकडे सरकत आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार या वादळामुळे ताशी १३५ ते १४५ किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. याचा परिणाम किनारी भागात होऊ शकतो. यामुळे किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.