Tuesday, April 23, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलसौजन्यशील सुशील

सौजन्यशील सुशील

सरसगाव नावाच्या एका गावात सुशील नावाचा एक मुलगा राहत होता. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने सुशील थोडा मोठा होता. बरोबर त्याला सतत अंगमेहनतीची सारी कामे करावी लागली. तो दररोज मजुरी करून आपला शाळेचा खर्च भागवायचा नि उदरनिर्वाह करायचा. असेच कष्ट करीत, स्वावलंबनातून आपला शैक्षणिक खर्च भागवित, मित्रांच्या पुस्तकांवर अभ्यास करीत एकदाचा सुशील पदवीधर झाला. आता प्रश्न होता तो नोकरीचा. कारण मित्रांच्या अनुभवावरून, त्यांच्या सांगण्यावरून बिनापैशाने एकही नोकरी लागत नव्हती. सुशीलजवळ तर मुलाखत द्यायला जाण्यासाठी बसच्या भाड्यालाही पैसा नव्हता, तर नोकरीला भरण्यासाठी कोठून आणणार? तरी सुशील आता मोठ्यांसारखी शेतमजुरीची कष्टाची कामे करायचा. आलेल्या पैशांतून अतिशय काटकसर करायचा. त्याचे आई-वडीलही पोराच्या भाड्याची सोय होण्यासाठी पोटाला चिमटा द्यायचे.

असाच सुशील एकदा चंद्रनगरला एका कंपनीत पर्यवेक्षकाच्या नोकरीसाठी मुलाखतीला जाण्याकरिता सरसगावाहून जवळच्या आनंदपूर शहरात आला व आनंदपूरहूला चंद्रनगरला जाणा­ऱ्या बसमध्ये बसला. बसमध्ये निघताना काहीच गर्दी नव्हती. पण पुढे सुवर्णखेड गावामध्ये मात्र बसमध्ये थोडी गर्दी झाली. बस सुवर्णखेडहून सुटताना एक सुशिक्षित वयोवृद्ध गृहस्थ घाईगडबडीत बसमध्ये चढले.

“पुढे सरका, पुढे सरका…” अशा बसवाहकाने केलेल्या आवाहनानुसार बसमध्ये पुढे पुढे सरकत ते सुशील बसलेल्या बाकाजवळ येऊन उभे राहिले. सुशीलचे त्यांच्याकडे लक्ष जाताच सुशील आपल्या बाकावरून उठला व त्यांना त्याच्या जागेवर बसण्यास विनंती केली. त्यांनी प्रथम सुशीलला नकार दिला. पण सुशीलची ती विनम्र वृत्ती बघून ते सुशीलचे आभार मानीत त्याच्या जागेवर बसले. सुशील तेथेच अदबीने आपला बाकाच्या बाजूस उभा राहिला.

खाली बसल्यानंतर त्यांनी सुशीलची आपुलकीने चौकशी केली. चंद्रनगरमध्ये बसमधून उतरल्यानंतर त्यांना घ्यायला आलेल्या कारमध्ये ते निघून गेले. सुशील आपला पैदल त्या कंपनीकडे मुलाखतीला निघाला.

कंपनीमध्ये सर्वात शेवटी पर्यवेक्षकांच्या मुलाखती होत्या. ज्यावेळी सुशीलचा मुलाखतीचा नंबर आला, त्यावेळी “आत येऊ का सर?” असे नम्रतेने विचारून समोरच्यांनी “या” म्हटल्यानंतर सुशील आत गेला. आत गेल्यानंतर त्याला एकदम आश्चर्याचा धक्काच बसला.

बसमध्ये त्याने ज्या सद्गृहस्थांना बसण्यासाठी जागा दिली होती, तेच मुलाखत घेणा­ऱ्या समितीमध्ये उच्चपदी विराजमान होते. ते त्या कंपनीचे मालक होते व सुवर्णखेडमध्ये त्यांचा राहण्याचा मोठा बंगला होता, असे त्यास नंतर समजले. सुशीलने स्मितहास्याने “नमस्कार सर” म्हणत नमस्कार केला. त्यांच्यापैकी एकाने बसा म्हणून बोटाने दाखविलेल्या खुर्चीवर “धन्यवाद सर!” म्हणत सुशील बसला.

समितीतील सदस्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची सुशीलने समाधानकारक उत्तरे दिली. ते बघून ते सद्गृहस्थ एकदम खूश झाले. मग त्यांनीच बोलायला सुरुवात केली. “बरं का मंडळी, माझी कार ऐन वेळेवर नादुरुस्त झाल्याने मुलाखती वेळेवर व्हाव्यात म्हणून येथे येण्यासाठी मी पटकन बस पकडली. आपल्या कारचालकाने फोन करून तुम्हाला कळविले असल्याने तुम्ही माझ्यासाठी चंद्रनगरच्या बसस्टँडवर दुसरी कार पाठविली. पण ज्या बसमध्ये मी चढलो त्यात गर्दी असल्याने मी उभाच होतो. याच मुलाने उठून आपली जागा मला बसायला दिली. आता आपण आपल्या कंपनीतील ही पर्यवेक्षकाची जागा त्याला देऊया”, त्यांनी असे म्हणताच, साऱ्यांनी एकमताने त्यांना सहमती दर्शविली. त्यांनी सोबतच्या लिपिकाला सुशीलचे नोकरीचे आदेशपत्र टाईप करायला सांगितले व सुशीलचे अभिनंदन केले. सुशील आपल्या खुर्चीवरून उठला व त्यांच्या पाया पडला. त्यांनी सुशीलला उठविले नि उद्यापासूनच नोकरीवर रुजू होण्यास सांगितले. सुशील हो म्हणाला व आपले आदेशपत्र घेऊन पुन्हा एकदा साऱ्यांना नमस्कार करीत हॉलच्या बाहेर आला.

सुशील संध्याकाळी आपल्या घरी पोहोचल्यानंतर तो सर्वप्रथम आपल्या देव्हाऱ्यात जाऊन देवांच्या पाया पडला. नंतर आई-बाबांच्या पाया पडत त्याने घडलेला किस्सा त्यांना सांगितला. अशा रितीने परोपकारी सुशीलला त्याने केलेल्या परोपकाराने नोकरी मिळाली व त्याची पायपीट थांबली.

– प्रा. देवबा पाटील

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -