काँग्रेस-राष्ट्रवादी फ्रंट फूटवर, तर शिवसैनिक गैरहजर

Share

डोंबिवलीत बंदचा फारसा परिणाम नाही

प्रशांत जोशी

डोंबिवली : लखीमपूर येथील शेतकऱ्यांना चिरडल्याप्रकरणी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. डोंबिवलीत मात्र या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. महाआघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्ते बंदमध्ये फ्रंटफुटवर येऊन बंद यशस्वी करण्यासाठी पुढे आले. मात्र महाआघाडीतील मुख्य पक्ष असलेल्या शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक या दरम्यान दिसून आले नाहीत. यामुळे शिवसेनेचा बंदमध्ये सहभाग यावर प्रश्नचिन्ह उभे राहत असल्याची चर्चा डोंबिबलीत होती.

डोंबिवली पश्चिम येथील स्थानक परिसरात आणि मासळीबाजार दरम्यान काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, लाल बावटा, रिपब्लिकन सेना तसेच विविध सामाजिक संघटनांनी सहभागी होत नारेबाजी केली. जे नागरिक कामासाठी जात होते त्यांना बंदची आठवण करून दिली जात होती. दुकानदारांस दुकाने बंद करा, असेही सांगितले जात असल्याचे समजते.

महाराष्ट्र बंद म्हणून मुंबईला जाणारा चाकरमानी घरातून बाहेर पडताना रिक्षा मिळेल का, या विचारात होता; परंतु सकाळी नेहमीप्रमाणे रिक्षा चालकांची गर्दी दिसून आल्याने चाकरमान्यांना हायसे वाटले आणि चाकरमानी सुखरूप रेल्वे स्थानकात पोहोचला. पश्चिमकडील जुनी डोंबिवली, देवीचा पाडा, महाराष्ट्र नगर, राजूनगर, गरिबाचा वाडा, कोपरगाव तर पूर्वेकडील आयरे, गांधीनगर, निवासी विभाग, स्टार कॉलनी, पाथर्ली, मानपाडा, सुनीलनगर आदी ठिकाणी रिक्षा धावत होत्या. तर निवासी आणि लोढा विभागात पालिका परिवहन सेवा व्यवस्थित सुरू होती, यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही.

भिवंडीत संमिश्र प्रतिसाद

भिवंडी : लखीमपूर शेतकरी हत्याकांडाविरोधात महाराष्ट्र बंदमध्ये भिवंडी शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. कोठेही दुकाने बंद करण्याबाबत कार्यकर्त्यांकडून जबरदस्ती करण्यात आली नाही, तर पोलिसांनी ठिकठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार महाराष्ट्र बंद दरम्यान घडला नाही, अशी माहिती पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली आहे.

उल्हासनगरात अल्प प्रतिसाद

सोनू शिंदे

उल्हासनगर : लाखीमपूर हिंसाचार प्रकरणी महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती; परंतु या बंदला उल्हासनगर शहरात अल्प प्रतिसाद मिळाला.

उल्हासनगर शहरात काँग्रेस पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेलं; परंतु उल्हासनगर शहरात बंदला अल्प प्रतिसाद दिसून आला.

कोरोनामुळे गेले दीड-दोन वर्षं व्यापारी वर्ग मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आता कुठे काही प्रमाणात सर्व सुरळीत सुरू झाले आहे, त्यामुळे व्यापाऱ्यांना हा महाराष्ट्र बंद परवडणारा नाही, अशी माहिती भाजपच्या आमदारांनी दिली. बंदच्या विरोधात भाजप आमदार कुमार आयलानीसह अनेक नगरसेवक रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यासाठी आवाहन करताना दिसत होते. यावेळी भाजप आमदार कुमार आयलानी, जिल्हाध्यक्ष जमनू पुरासवणी, नगरसेवक राजेश वधारिया, प्रदीप रामचंदांनी, अमित वाधवा, मनीष हिंगोराणी, समाजसेवक मनोज साधनांनी आणि कपिल अडसूळ हे पदाधिकारी रस्त्यावर उतरले होते.

मीरा-भाईंदरमध्ये फज्जा

भाईंदर : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे झालेल्या शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ महाराष्ट्रात आघाडी सरकारने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा फज्जा उडाला. यावेळी भाईंदरमध्ये सकाळपासून शहरातील व्यापारी, दुकानदार यांनी आपला व्यवसाय सुरू ठेवला होता. रिक्षा, बस, खासगी वाहने यांची वर्दळ होती. शहरात सर्व काही सुरू असताना दिसून आले.

पोलिसांनी जागोजागी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कार्यकर्त्यांनी दुचाकी, गाड्या घेऊन मिरवणुकीने दुकानदारांना बंदमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते; परंतु तो ताफा थोडासा पुढे जाताच खाली केलेली शटर पुन्हा उघडून दुकाने सुरू करण्यात आली होती. कोरोनाने आधीच व्यापलेल्या व्यापाऱ्यांचा या बंदला कमी प्रतिसाद दिसून आला.

गोल्डन नेस्ट चौकात घोषणाबाजी करणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना कोविडच्या काळात मनाई असताना देखील मोर्चा व बाईक रॅली काढल्याबद्दल नवघर पोलिसांनी ताब्यात घेतले. तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शहर अध्यक्ष श्रीनिवास निकम यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर बसून आंदोलन केले.

आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

कल्याण : लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात कल्याण पूर्व भागात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे कल्याण पूर्व मध्यवर्ती कार्यालयापासून आंदोलनास सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस मनोज नायर, कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष अर्जुन नायर, सारिका गायकवाड, मीनाक्षी आहेर आदींसह इतर कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांना कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले.

Recent Posts

संशय…

आपण बऱ्याचदा माणसाच्या दिसण्यावरून किंवा चेहऱ्यावरून कोणता माणूस कसा आहे हे ओळखतो. पण हा पर्याय…

6 mins ago

मराठीचे पांग केव्हा फेडणार?

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर भाषावार प्रांतरचना आपल्या देशाने स्वीकारली पण त्या त्या राज्यात तिथली राजभाषा…

12 mins ago

परीकथा

प्रतिभारंग - प्रा. प्रतिभा सराफ परीकथेतील राजकुमारा स्वप्नी माझ्या येशील का?’ या गाण्याने तरुणपणात मला…

25 mins ago

कान्स गाजवणारी कोकणकन्या

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे कोकण ही नररत्नांची खाण आहे असं म्हटलं जातं. तिने ते…

27 mins ago

सुजाण पालकत्व

मनस्विनी - पूर्णिमा शिंदे आपली मुलं हीच आपली संपत्ती! आपण आपल्या मुलांना वाढवताना आपल्यातील चांगले…

37 mins ago

वाराणसीत मोदींचीच जादू…

स्टेटलाइन: डॉ. सुकृत खांडेकर उत्तर प्रदेशमधील वाराणसी लोकसभा मतदारसंघात शनिवारी, १ जून रोजी मतदान पार…

41 mins ago