मोदींच्या प्रश्नाने काँग्रेस घायाळ

Share

देशाच्या कानाकोपऱ्यांत लोकसभा निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाला आहे. तीन टप्प्यातील मतदान पार पडले असून काही भागांत राजकीय पातळीवर शांतता आहे. मात्र ज्या ठिकाणी मतदान झाले आहे, त्या ठिकाणची नेते मंडळी, पदाधिकारी बाजूच्या ठिकाणी मतदान न झालेल्या भागात प्रचारात व्यस्त झाली आहेत. आजवर पार पडलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि ही निवडणूक यात जमीन आस्मानाचा फरक आहे. ही निवडणूक भाजपासाठी व काँग्रेसच्या पुढाकाराने बनलेल्या इंडिया आघाडीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंह यांच्यासह रथी-महारथी पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे प्रचारसभा घेत आहेत. रोड शो, रॅलीमध्ये सहभागी होत आहेत. दुसरीकडे राहुल गांधी, प्रियंका गांधी व इंडिया आघाडीचे नेते देखील सभा, रॅली, रोड शो करण्यात व्यस्त आहेत.

देशामध्ये प्रथमच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचारयंत्रणा स्थानिक पातळीवर राबविण्यात येत असल्याचे पाहावयास मिळाले आहे. महाराष्ट्रात पंतप्रधान मोदींच्या तब्बल १५ सभा झाल्या असून आणखी काही सभा होणार आहेत. अमित शहांच्या देखील सभा झाल्या आहेत. महाराष्ट्र भाजपाकडून स्थानिक पातळीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह अन्य नेतेमंडळी प्रचाराची राळ उडवत आहेत. महाविकास आघाडीकडून उबाठा सेना, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस कंबर कसून प्रचार यंत्रणेत व्यस्त झाली आहे. दोन्हींकडून आरोप-प्रत्यारोपांची जुगलबंदी सुरू आहे. दोन्हींकडच्या वरिष्ठ नेते मंडळींकडून भाषणामध्ये मर्यादा सांभाळण्यात येत असल्या तरी दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील नेते मंडळींची तसेच अन्य स्टार प्रचारकांची भाषणांमधून जीभ घसरण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. काँग्रेस व इंडिया आघाडीकडून करण्यात आलेल्या आरोपांना पंतप्रधान मोदींकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे. मात्र पंतप्रधान मोदींकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर, केल्या जाणाऱ्या आरोपांवर काँग्रेस तसेच इंडिया आघाडीकडून कोणतेही प्रत्युत्तर फारसे देण्यात आलेले नाही अथवा पंतप्रधानांचे मुद्दे आजवर खोडून काढण्यात आलेले नाहीत.

भाजपाकडून गेल्या दहा वर्षांत करण्यात आलेल्या विकासकामांचा लेखाजोखा सादर करताना मते मागितली जात आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसकडून व त्यांच्या इंडिया आघाडीकडून केवळ व्यक्तिगत आरोपांशिवाय फारसे काही बोलले जात नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणांमध्ये त्या त्या राज्यात केंद्र सरकारने केलेली कामे सांगताना काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढत आहेत. त्या तुलनेत काँग्रेस व इंडिया आघाडीला भ्रष्टाचारावर बोलणे शक्य झाले नाही. मुळातच गत दहा वर्षांच्या कालावधीत मोदींच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराला थाराच न मिळाल्याने विरोधकांना भ्रष्टाचाराबाबत बोलणे शक्यच होत नाही. काँग्रेसकडून आरक्षणापासून ते कालपरवापर्यंत हेमंत करकरेंपर्यंत अनेक मुद्दे उपस्थित करत भाजपाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला; परंतु हा प्रयत्न त्यांच्याच अंगलट आला आहे. आपल्या प्रचार अभियानात उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे स्वत:च अडचणीत येण्याची ही वेळ काँग्रेसवर प्रथमच आलेली आहे.

भाजपा आरक्षण बदली करणार असल्याचा टाहो काँग्रेस व इंडिया आघाडीकडून सातत्याने करण्यात आला; परंतु हा मुद्दाही त्यांच्याच अंगलट आला असून त्यांना याचा काहीही उपयोग झाला नाही. आरक्षणात बदल होणार नसल्याचा दावा पंतप्रधान मोदींसह अमित शहांपासून देवेंद्र फडणवीसांपर्यंत करण्यात आल्याने आरक्षण प्रकरणी काँग्रेस केवळ मतांसाठी दिशाभूल करत असल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेसच्या नेत्यांकडून हेमंत करकरेंच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मुळातच हा मुद्दा निवडणूक काळातच उपस्थित का झाला? इतर वेळी या प्रकरणी काँग्रेस का मौन बाळगून होती? हेही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. २६/११च्या घटनेला अनेक वर्षे उलटली आहेत. त्या काळात तर राज्यात व केंद्रात काँग्रेसचीच सत्ता होती. भाजपा तर २०१४ साली केंद्रात सत्तेवर आला आहे. त्यापूर्वी दहा वर्षे काँग्रेस व मित्र पक्षांची केंद्रात सत्ता होती. काँग्रेसला या घटनेची सत्यता पडतळायचीच होती तर त्यांच्या सरकारच्या काळात शोध घेणे सहज शक्य झाले असते.

ऐन निवडणूक काळात हा मुद्दा उपस्थित करून दिशाभूल करण्याचा काँग्रेसकडून केला जाणारा फसवा प्रकार उघड झाला आहे. लव्ह जिदाह, भू जिहादपाठोपाठ व्होट जिहादनेही निवडणूक प्रचारात खळबळ उडाली आहे. जिहाद म्हणजे काय आणि तो कोणाविरोधात केला जातो, हे सर्वांना माहिती आहे. तरीही इंडिया आघाडीचे नेते मुस्लिमांना एकत्र येऊन व्होट जिहाद करण्यास सांगत आहेत. व्होट जिहाद करा, असे सांगत इंडिया आघाडीने लोकशाहीचा अपमान केला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या एकाही नेत्याने याचा विरोध केला नाही. व्होट जिहादचे आवाहन करत काँग्रेसकडून तुष्टीकरणाचे राजकारण केले जात असल्याचे भाजपाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अदानी-अंबानींबाबत पंतप्रधान मोदींनी काँग्रसचे अक्षरश: वाभाडेच काढले आहेत. काँग्रेसने निवडणूक लागण्याअगोदर मोदींच्या सरकारवर अदानी-अंबांनींप्रकरणी सातत्याने आरोप करत देशवासीयांची दिशभूल करण्याचा प्रयत्न केला होता.

प्रत्येक दिवसाला मोदी सरकारच्या कारभारावर अंबानी-अदानींचे सावट आहे, हे सरकार त्यांच्या सावलीखाली चालत आहे, उद्योजकांना झुकते माप देत आहे, असे सांगत केंद्रातील मोदी सरकारची प्रतिमा मलीन करण्यात काँग्रेस आक्रमक होती. पण निवडणूक काळात तीन टप्प्यातील निवडणुका पार पडल्या. पण अदानी-अंबानी या विषयावर राहुल गांधी काहीही बोलत नसल्याचा मुद्दा पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित करत काँग्रेसला अंबानी-अदानींकडून निवडणुकीसाठी काय मिळाले आहे? असा जाहीर प्रश्न करत अंबानी-अदानींबाबतच्या काँग्रेसच्या सध्याच्या भूमिकेवर एक प्रकारे संशय उपस्थित केला आहे. ज्यांनी सरकार व अदानी-अंबानी संबंध जोडत टीका केली, ते निवडणूक काळात याच विषयावर मौनी का आहेत, याबाबत पंतप्रधानांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर राहुल गांधी आणि काँग्रेसने तेवढ्याच तत्परतेने उत्तर देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला.

पंतप्रधानांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांनी काँग्रेस व इंडिया आघाडी पुरती घायाळ झाली आहे. भाजपाची प्रतिमा मलीन करण्यासाठी केल्या जाणाऱ्या आरोपांच्या चक्रव्यूहात काँग्रेस अडकत चालल्याचे देशाला पाहावयास मिळाले आहे. निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप होतच असतात. विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या प्रचाराला धार असते, पण या निवडणुकीत उलटेच पाहावयास मिळत आहे. सत्ताधाऱ्यांकडून केल्या जाणाऱ्या प्रचाराला धार, तर दुसरीकडे काँग्रेसच्या प्रचाराची धार बोथट झाल्याचे आजवरच्या प्रचारादरम्यान पाहावयास मिळाले आहे.

Recent Posts

केजरीवालांची स्टंटबाजी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची राजकीय सारीपाटावरील वाटचाल पाहता त्यांच्याबाबतीत ‘कोण होतास तू, काय झालास…

48 mins ago

श्रीराम व्यायामशाळा सेवा संस्था, ठाणे

सेवाव्रती: शिबानी जोशी ठाण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली शाखा ज्या ठिकाणी सुरू झाली, ते ठिकाण…

1 hour ago

पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोषाचा उद्रेक

प्रा. डॉ. विजयकुमार पोटे दोनशे रुपये लिटर दूध, पैसे मोजूनही न मिळणारे पीठ, जीवनावश्यक वस्तूंचा…

2 hours ago

IPL 2024 Final: चेन्नईमध्ये होणार फायनल, तिकीटांची विक्री सुरू, कितीचे आहे स्वस्त तिकीट

मुंबई: आयपीएल २०२४चा प्लेऑफचा टप्पा २१ मेपासून सुरू होत आहे. सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स,…

4 hours ago

Health: दररोज आवळ्याचे सेवन करण्याचे हे आहेत चमत्कारी फायदे

मुंबई: आवळ्यामध्ये औषधीय गुण भरलेले असतात. आयुर्वेदात आवळ्यामध्ये अनेक पोषकतत्वे सांगितलेली आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळा…

5 hours ago

राज्यात शांततेत मतदान पार; आता उत्सुकता निकालाची

मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात…

5 hours ago