Monday, June 17, 2024
Homeताज्या घडामोडीकफ सिरपची निर्यात करणाऱ्या कंपन्यांना सरकारी प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक

कफ सिरपची निर्यात करणाऱ्या कंपन्यांना सरकारी प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक

केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : भारतातून परदेशात निर्यात होत असलेले कफ सिरप सदोष असल्याने गेल्यावर्षी अनेकांचे मृत्यू झाले होते. यामुळे भारताच्या वैद्यकीय उत्पादनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. जागतिक स्तरावर भारताकडून निर्यात होत असलेल्या वैद्यकीय उत्पादनांबाबत लोकांच्या मनात साशंकता असू नये आणि अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये याकरता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून यापुढे निर्यात करताना सरकारी प्रयोगशाळांमध्ये संबंधित उत्पादनाची चाचणी झाल्यानंतरच कफ सिरप परदेशात पाठवण्यात येणार आहेत. १ जूनपासून हा निर्णय लागू होणार आहे.

परकीय व्यापार महासंचालनालयाने सांगितले की, “१ जून २०२३ पासून कफ सिरप निर्यात करताना निर्यातदार कंपनीला सरकारी प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. संबंधित उत्पादनाची चाचणी केल्यानंतर हे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.” इंडियन फार्माकोपिया कमिशन, प्रादेशिक औषध चाचणी प्रयोगशाळा (RDTL – चंदिगड), केंद्रीय औषध प्रयोगशाळा (CDL – कोलकाता), केंद्रीय औषध चाचणी प्रयोगशाळा (CDTL – चेन्नई, हैदराबाद आणि मुंबई), RDTL (गुवाहाटी) आणि NABL या प्रयोगशाळांमधून निर्यातीसाठी परवानगी देण्यात येणार आहे.

अधिक स्पष्टीकरण देताना एका अधिकाऱ्याने सांगितले की, “भारतातून निर्यात होणाऱ्या विविध औषधी उत्पादनांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी निर्यात केल्या जाणाऱ्या कफ सिरप फॉर्म्युलेशनची पूर्व-गुणवत्ता तपासण्याची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.” निर्यातीसाठी परवानगी देण्यापूर्वी तयार उत्पादनाची प्रयोगशाळांमध्ये चाचणी केली जाते. या चाचणीच्या नियमाची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत. यामध्ये MoHFW यांचंही सहकार्य असणार आहे. राज्य सरकारे आणि निर्यातदारांनी या अधिसूचनेची सुरळीत अंमलबजावणी करण्याचेही यावेळी आदेश देण्यात आले आहेत.

गेल्यावर्षी गाम्बिया येथे ६६ आणि उझबेकिस्तानमध्ये १८ लहान मुलांचा भारतीय बनावटीच्या कफ सिरपमुळे मृत्यू झाला होता. यामुळे जगभरात निर्यात केलेले कफ सिरप परत मागवण्यात आले होते. संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

भारताने २०२१-२२ मध्ये १७ बिलियन अमेरिकन डॉलर आणि २०२२-२३ मध्ये १७.६ अब्ज अमेरिकन डॉलर किमतीच्या कफ सिरपची निर्यात केली होती. भारतीय फार्मास्युटिकल उद्योग हा जगभरातील वैद्यकीय उत्पादनांचा प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार आहे. जागतिक स्तरावर जेनेरिक औषधांचा पुरवठा करण्यात भारत हा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. जगभरात एकूण विविध लसींच्या तुलनेत भारताकडून ५० टक्के पुरवठा केला जातो. तर, जगभरात ४० टक्के जेनेरिक औषधे भारताकडून वितरीत केली जातात. यूकेमधील सर्व औषधांच्या सुमारे २६ टक्के पुरवठा भारताकडून केला जातो. सध्या जागतिक स्तरावर एड्सचा सामना करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या अँटीरेट्रोव्हायरल औषधांपैकी ८० टक्क्यांहून अधिक औषधांचा पुरवठा भारतीय फार्मास्युटिकल कंपन्यांकडून केला जातो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -