Categories: रिलॅक्स

यू मस्ट डाय खेळ आणि खल

Share
  • कर्टन प्लीज: नंदकुमार पाटील

नाटकाची तिसरी बेल होते. प्रेक्षकागृहात गडद अंधार होतो. मग बंद पडद्यामागे स्त्री-पुरुषाचा संवाद ऐकायला मिळतो. दोघेही त्रासलेले, चिडलेले. ‘हिंमत असेल, तर गोळी घाल’ पुरुष बोलतो आणि बंदुकीतून गोळी निसटल्याचा आवाज येतो. पडदा उघडतो. रंगमंच प्रकाशमान होते. व्हीलचेअरवर मृत अवस्थेत पाठमोरा अनुराग पाठारे दिसतो आहे. अशा स्थितीत एक अनोळखी माणूस मदतीच्या आशेने या बंगल्यात प्रवेश करतो. खरं तर गुन्हेगारी, रहस्यमय नाटक म्हटल्यानंतर सुरुवातीची काही मिनिटे वातावरण निर्मिती करण्यात जातात, मग प्रेक्षक संभ्रमात पडतील, असा संवाद ऐकायला मिळतो. पुढे मीच गुन्हेगार आहे, असे वाटावे, अशी पात्रांची संशय घेणारी हालचाल सुरू होते. यातच बऱ्याच वेळ निघून जातो. मग खऱ्या अर्थाने नाटक सुरू होते. ‘यू मस्ट डाय’ या नाटकाच्या बाबतीत असे काही होताना दिसत नाही. पडदा बाजूला सरतो, तर ते अगदी नाटक संपेपर्यंत प्रेक्षक या नाटकाच्या कथेसोबत राहतो. ही किमया दिग्दर्शक विजय केंकरे, लेखक नीरज शिरवईकर आणि त्यातल्या सहभागी कलाकारांची आहे. ‘प्रवेश’ आणि ‘वरदा क्रिएशन्स’ यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. अदिती राव हे या नाटकाच्या निर्मात्या आहेत. ठिकाण खंडाळा, निर्जन ठिकाणी प्रशस्त बंगला, या बंगल्यात पाठारे कुटुंबाचे वास्तव्य आहे. दोन मुले एक विक्षिप्त, दुसरा मृत अवस्थेत पडलेला आहे. आई, पत्नी असा हा परिवार इथे वास्तव्य करीत आहे. देखभालीसाठी गोविंद हा नोकर येथे आहे. दोन्ही भावंडांची काळजी घेण्यासाठी ज्युलीचे या बंगल्यात वास्तव्य असत्यामुळे तिचेही कुटुंब सदस्याप्रमाणे वावरणे असते. अनुराग पाठारे याची हत्या कोणी केली?, का केली? याचा शोध घेणारे हे नाटक आहे. गुन्हा एक व्यक्ती करतो पण त्याची शहानिशा करण्यासाठी संपूर्ण कुटुंबाला, सान्निध्यात येणाऱ्या व्यक्तींना सामोरे जावे लागते. एक तर सुटका होण्यासाठी किंवा त्याचा गैरफायदा घेण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. यात पोलीस यंत्रणा चातुर्य दाखवते. प्रेक्षक अंदाज बांधतात. पण अखेरीस हे सर्व अंदाज फोल ठरतात, ही या नाट्यकृतीची खासियत आहे. खेळ आणि खल असा दुहेरी अनुभव प्रेक्षकांना घेता येतो.

नाटकाच्या कथेत अनुराग पाठारे यांच्याकडून अपघात झालेला आहे. त्यात पंकज सरोदे आणि त्यांचे कुटुंब यांचे निधन झाल्याचे कळते. त्यात अनुरागला अपंगत्व आलेले आहे. सतत मद्यपान करणे. विरंगुळा म्हणून बसल्या जागेवरून शिकार करणे त्याचे वाढलेले आहे. सरकारमान्य परवानाधारक तो शिकारी असल्यामुळे त्यावर कारवाई होत नाही. या त्याच्या वृत्तीला पत्नी मालती पूर्णपणे कंटाळलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यात सतत भांडणे होत आहेत. अनुरागला अमोघ नावाचा छोटा भाऊ आहे. तो मनोरुग्ण आहे, त्यामुळे त्याचे विक्षिप्त वागणे घरातल्यांना त्रासदायक झालेले आहे. अशा पार्श्वभूमीवर अनुरागची हत्या होते. पोलिसांसाठी ते कोडे ठरते. कारण मालती हा गुन्हा मी केल्याचे भासवत असते, तर बंगल्यात अनपेक्षितपणे मदतीच्या भावनेने शिरलेला अनोळखी महेश माने हा गुन्ह्याचा साथीदार होण्यासाठी धडपड करीत असतो. मालती आणि स्वतः माने या प्रकरणात पुरावा सापडू नये म्हणून प्रयत्न करीत असतात. पोलीस अधिकारी घारगे यांना ते मान्य नसते. सहकारी इन्स्पेक्टर शिंदे यांच्या मदतीने ते शोध कार्य चालू ठेवतात आणि पुराव्यानिशी एक एक नावे पुढे येतात. गोविंद, ज्युली, मनोरमा, अमोघ, मालतीचा प्रियकर युवा नेता सिद्धेश यांची चौकशी होते. प्रथमदर्शी यातलाच कोणीतरी गुन्हेगार आहे, असे वाटायला लागते. सत्य समोर येणे तसे कठीण असते. अशा स्थितीत घारगे यांच्या सांगण्यावरून एक युक्ती केली जाते आणि गुन्हेगार समोर येतो. तो कोण? आणि तो असे का करतो, हे मात्र तुम्हाला नाटकातच पाहावे लागेल. हे नाटक अगाथा क्रिस्तीन यांच्या कथेवर आधारलेले आहे. नीरज शिरवईकर यांनी त्याचे लेखन केले आहे. नेपथ्याचीही बाजू त्यांनी सांभाळलेली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नाटक म्हटल्यानंतर प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी अनेक संकल्पना लढवल्या जातात. मग ते नाटक न राहता मालिका किंवा चित्रपटाचा एक भाग होतो. दिग्दर्शक विजय केंकरे कट्टर नाट्यकर्मी आहेत. प्रेक्षकांना वास्तव हवे असते. त्यांना अवास्तव नको असते, हे त्यांनी ओळखलेले आहे. त्यामुळे ते प्रेक्षकांना आपण छान नाटक पाहिल्याचे समाधान देतात. संगीतकार अशोक पत्की यांच्यासाठी नाटक हा जिव्हाळ्याचा विषय प्रत्येक कलाकृतीला विषायानुसार संगीत देणे हा प्रयत्न याही नाटकाच्या बाबतीत झालेला आहे. शीतल तळपदे यांनी सुद्धा प्रकाशयोजना कथानकाला साजेल अशी केलेली आहे. मंगल केंकरे यांची वेशभूषा आणि राजेश परब यांची रंगभूषा या नाटकाला लाभलेली आहे.

नाटक मनोरंजनाचे माध्यम असले तरी त्याचे सादरीकरण हे नाटकाच्या विषयावर अवलंबून असते. ‘यू मस्ट डाय’ हे नाटक गुन्हेगारीवर आधारित आहे. अशा नाटकासाठी लेखक, दिग्दर्शक जेवढा प्रगल्भ मनाचा असावा लागतो तसे यात काम करणारे कलाकारसुद्धा तेवढे कसबी असावे लागतात. फक्त वाक्य पोहोचवणे हा या कथेचा मुख्य उद्देश नसतो, तर त्यातील परिणामसुद्धा त्या कलाकाराला साधता आला पाहिजे. थोडक्यात काय, तर संवाद, अभिनय, देहबोली या साऱ्या गोष्टींसाठी कलाकाराला सतर्क राहावे लागते. हे औत्सुक्य ज्या कलाकारांनी दाखवले, त्यात सौरभ गोखले यांनी महेश माने, शर्वरी लोहोकरे यांनी मालती पाठारे, संदेश जाधव यांनी इन्स्पेक्टर घारगे त्यांच्या भूमिका करताना दाखवलेली आहे. नेहा कुलकर्णी (ज्युली), प्रमोद कदम (गोविंद), हर्षल म्हामुणकर (अमोघ) यांनी भूमिका प्रभावी होण्याच्या दृष्टीने अभिनयाबरोबर संवादाच्या बाबतीत घेतलेली काळजी महत्त्वाची वाटली. याशिवाय यात विनिता दाते, अजिंक्य भोसले, धनेश पोतदार यांचा सुद्धा कलाकार म्हणून सहभाग आहे.

Recent Posts

युद्ध शांती अंतत: विश्वशांती ! (भाग-१)

निसर्गवेद : डॉ. महालक्ष्मी वानखेडकर कुटुंबातील कलहापासून ते विश्व महायुद्धापर्यंत ही सर्व युद्ध का होतात?…

7 mins ago

Death : मृत्यू अटळ सत्य…

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे मरणाचे स्मरण असावे जन्म आणि मृत्यू सत्य, असत्य, दिवस-रात्र अमावस्या, पौर्णिमा,…

12 mins ago

आपला माणूस

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ नाते कोणतेही असो बहीण-भावाचे, प्रेयसी-प्रियकराचे, नवरा-बायकोचे, आई-मुलांचे. जर आपण या…

17 mins ago

Save water : पाणी

कथा : रमेश तांबे एप्रिल-मे महिन्यात सगळीकडेच पाणीटंचाईची भीषण समस्या असते. यावेळी जंगलातील प्राणी-पक्षी पाण्यावाचून…

23 mins ago

Colourful Stars : रंगीत तारे

कथा : प्रा. देवबा पाटील यशश्रीचे विज्ञानाचे ज्ञान बघून, परीला खूप आनंद होत होता. तीही…

27 mins ago

Poems and riddles : अद्दल घडली कविता आणि काव्यकोडी

अद्दल घडली खरंच सांगतो दोस्तांनो एकदा काय घडलं आभाळातून पावसाला मी खाली ओढून आणलं म्हटलं…

39 mins ago