Categories: कोलाज

चिकूची बी आणि आंब्याची कोय

Share

माधवी घारपुरे

लेखकाने खासकरून मोठ्या लेखकाने लहान नवोदित लेखकाला हात देऊन वर उचलून घ्यावे, असे म्हणतात. पण मोठा लेखक कोणाला म्हणायचे! ज्ञानेश्वर माऊली, तुकोबा, रामदास यांसारखे मोठे लोक आपण सोडूनच देऊ. पण पु. ल., व. पु.,जी. ए., पिंगेकाका, मधुभाई, विंदा… असे बडो शेकडो लोक स्वतःला लहानच समजतात. मग तुमच्या आमच्यासारख्यांंची गणती कशातच न करणे उत्तम, असे माझे वैयक्तिक मत आहे. कारण बिरबलाने न पुसता एका रेषेशेजारी अधिक उंच रेषा काढून पहिली लहान करून दाखविली यातच सारे काही आले.

अलीकडचा म्हणजे २३ एप्रिल २०२२ चा उदगीरला आलेला अखिल भारतीय साहित्य संमेलनातला भावणारा अनुभव. अशाच विविध अनुभवांसाठी संमेलनाला हजेरी लावायची. चर्चासत्रे किंवा २४ तास काव्यकट्ट्यापेक्षा पुस्तकांच्या स्टॉलमध्ये फिरणे, पुस्तके पाहणे यात मला आनंद जास्त वाटतो आणि वाटते की, मी तिथली कुबेर आहे. मालक कशाचीच नाही.

भवताली पुस्तकांची श्रीमंती अफाट आहे. जेवणाची वेळ टळलेली सुद्धा तिथे कळत नाही. अर्थात पुस्तकांत रमणारा माणूस हवा. माझ्याबरोबर एका स्टॉलवर एक सुप्रसिद्ध लेखिका होती. आमच्या छान गप्पा चालल्या होत्या. १० वर्षांपूर्वी त्या लेखिकेला साहित्य अकादमीचा मोठा पुरस्कार मिळाला होता. स्टॉलमधून हिंडता हिंडता समोरून एक खेडवळ मुलगा, साधारण ३०-३५चा असावा. त्या लेखिकेला त्यानं पाहिलं आणि धावतच येऊन गळ्यातली शबनम खाली ठेवली आणि पायावर चक्क डोके ठेवले. त्या बाई आणि मी दोघीही आश्चर्याने बघत राहिलो.

मी कुणी नसे संत, भाविक ना भक्त,
असे जीव मात्र जीवनी आसक्त…
तुमच्या चरणी मस्तक ठेविले,
उचलायचे भान न राहिले…

माऊलींच्या पादुकांवर माथा टेकल्यावर कवी अनिलांची जी भावना होती, तीच मला त्या मुलात दिसली. ‘त्या’ बाईंनी त्याला उठवून विचारले,

“अहो, तुम्ही कोण? माझ्या पायी का म्हणून मस्तक ठेवलेत? मला लाजवलेत. मी सामान्य स्त्री आहे. गृहिणी आहे.” ओलावलेले डोळे पुसत तो म्हणाला,

“मॅडम मी मारुती वाळके. जवळच्या खेड्यात राहतो. मराठीचा प्रेमी अाहे. मराठीत एमए केलंय. आता पीएचडी करतोय. १० वर्षांपूर्वी तुम्हाला पुरस्कार मिळाला तेव्हा अभिनंदनाचा फोन केला. वाटलं, तुम्ही फोन घ्याल की नाही? बोलाल की नाही? मला छंद आहे की, फोन करून आनंद घ्यायचा आणि द्यायचा. मी दुसरे काय देऊ शकतो. आठजणांचं कुटुंब सांभाळायची जबाबदारी मजवर आहे. अनेकांनी माझ्याकडे दुर्लक्ष केलं कारण मी कोण? पण मॅडम, तुम्ही माझ्याशी इतक्या छान बोललात की, जणू माझी ताई आहात. तुमची कात्रणं, फोटो मी ठेवलेत. प्रत्यक्षच येऊन भेटायचं होतं, पण ऐपत नव्हती. प्रत्येक संमेलनात मी तुम्ही भेटाल म्हणून येतो आणि तुमची ४ पुस्तकं या झोळीत ठेवतो. तुमची सही घ्यायची म्हणून. आज हक्काने सांगतो, ताई संतासारख्या भेटलात, तुमची सही आणि संदेश द्याल कां?”

असे म्हणून झोळीतून एक पुस्तक बाहेर काढले. त्याचं बोलणं ऐकून माझ्याच डोळ्यांची तळी भरली. लेखक असा असावा. सामान्य. त्या म्हणाल्या, “मारुती मोठं कोण आहे, हे कुणी ठरवायचे? तुम्ही वाचक मोठे म्हणून लेखक माेठे आहेत. प्रेक्षक आहेत म्हणून नट मोठे आहेत, श्रोते आहेत म्हणून वक्ते मोठे अाहेत. आपण चालताना खालची धरणी घट्ट आहे म्हणून आपण ताठ आहोत समजले? आजपासून स्वत:ला लहान समजू नको. इतकेच सांगते. इतकी वर्षे माझी पुस्तक जवळ ठेवणारा तू काय म्हणू तुला? ज्ञानेश्वरी बाळगली असतीस, तर माऊलींसारखा झाला असतास. पण त्यांच्यातला आणि आपल्यातला फरकच फक्त लिहिते, समजून घे.”

“संत हे चिकूच्या बी सारखे असतात. अंगाला काहीही लागू देत नाहीत.आपण आंब्याच्या कोयीसारखे. कितीही स्वच्छ करा, परत काहीतरी चिकटून राहतेच. तुझी ताई…”ताई पुढे गेली… मी मागे पाय ओढत राहिले!

Recent Posts

केजरीवालांची स्टंटबाजी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची राजकीय सारीपाटावरील वाटचाल पाहता त्यांच्याबाबतीत ‘कोण होतास तू, काय झालास…

26 mins ago

श्रीराम व्यायामशाळा सेवा संस्था, ठाणे

सेवाव्रती: शिबानी जोशी ठाण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पहिली शाखा ज्या ठिकाणी सुरू झाली, ते ठिकाण…

52 mins ago

पाकव्याप्त काश्मीरमध्ये असंतोषाचा उद्रेक

प्रा. डॉ. विजयकुमार पोटे दोनशे रुपये लिटर दूध, पैसे मोजूनही न मिळणारे पीठ, जीवनावश्यक वस्तूंचा…

1 hour ago

IPL 2024 Final: चेन्नईमध्ये होणार फायनल, तिकीटांची विक्री सुरू, कितीचे आहे स्वस्त तिकीट

मुंबई: आयपीएल २०२४चा प्लेऑफचा टप्पा २१ मेपासून सुरू होत आहे. सनरायजर्स हैदराबाद, कोलकाता नाईट रायडर्स,…

3 hours ago

Health: दररोज आवळ्याचे सेवन करण्याचे हे आहेत चमत्कारी फायदे

मुंबई: आवळ्यामध्ये औषधीय गुण भरलेले असतात. आयुर्वेदात आवळ्यामध्ये अनेक पोषकतत्वे सांगितलेली आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळा…

5 hours ago

राज्यात शांततेत मतदान पार; आता उत्सुकता निकालाची

मतदारयादीत नाव नसल्याने मतदारांचा हिरमोड मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ मतदार संघात…

5 hours ago