
माझे कोकण : संतोष वायंगणकर
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, तमाम हिंदुस्थानची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वराज्य निर्मितीसाठी जो पराक्रम गाजवला त्याची साक्ष गडकिल्ल्यांच्या रूपाने आजही दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणातील मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्यांच्या रूपाने इतिहासाची साक्ष देत समुद्रलाटांचा सामना करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणांचं दर्शन यानिमित्ताने होते. सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरच राजकोट किल्ला आहे. कोकणात रायगडसह अनेक गड, किल्ले आजही उभे आहेत. या गडकिल्ल्यांकडे पाहिल्यावर, गड किल्ल्यांवरील वास्तुशास्त्र आणि वास्तूला देखणेपण कशा रितीने आणले गेले हे या गडकिल्ल्यांमध्ये फिरताना सहज लक्षात येऊन जाते. जसे छत्रपती शिवाजीराजे एक पराक्रमी राजे होते. तसेच ते ‘मॅनेजमेंट’ गुरूही होते. म्हणून कोणत्याही गडकिल्ल्यांचे बांधकाम हे त्या-त्या वैशिष्ट्यपूर्णतेसाठी प्रसिद्धच आहे. प्रत्येक किल्ल्याची निर्मिती करताना त्या-त्या वेळची आवश्यकता लक्षात घेऊन किल्ल्यांची उभारणी करण्यात आली आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वी देखील गडकिल्ले उभारताना किती छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार करण्यात आला आहे हे देखील सहज समजून येते.
समुद्रात उभा असलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या निर्मितीवेळी मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम साहित्य ठेवण्यासाठी सुरक्षितस्थळ म्हणून राजकोट किल्ल्याची उभारणी करण्यात आली. याच राजकोट किल्ल्यावर ११ मे २०२५ रोजी हिंदुस्थानातील छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा उभा करण्यात आला आहे. ‘नेव्ही डे’च औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता; परंतु एक दुर्दैवी घटना घडली. त्याचवेळी राज्यसरकारने जाहीर केले, राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा देशातील सर्वात उंच पुतळा उभा करण्यात येईल. त्याप्रमाणे मर्यादित कालावधीतच हा पुतळा उभारण्यात आला.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेण्यासाठी, छत्रपतींची आरती म्हणत छत्रपतींना मानाचा मुजरा करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपतींचे दर्शन व महाराजांची आरती ओवाळून त्यांना मानाचा मुजरा करण्याचा समारंभ ११ मे २०२५ रोजी पार पडला. राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्याने निश्चितच कोकणात येणाऱ्या शिवप्रेमींना राजकोट किल्ल्यावर जाऊन दर्शन घेता येणार आहे. नेव्ही डे नंतर कोकणातील विशेषकरून पर्यटकांची येणारी संख्या प्रचंड वाढली आहे. आता तर राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. हा पुतळा दहा फुटांचा चबुतरा त्यावर तलवारीसह ९३ फुटी पुतळा मिळून १०३ फूट उंचीचा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा देशातील सर्वात उंच पुतळा आहे.
साहजिकच छत्रपती शिवाजी महाराजांना नतमस्तक होण्यासाठी देशभरातून शिवप्रेमी येणारे आहेत. छत्रपती शिवारायांच्या रूपाने महाराष्ट्राची अस्मिता उभी आहे. तमाम मराठीजनांना त्याचा सार्थ अभिमान आहेच. त्याचबरोबर छत्रपती शिवरायांचे आरमार उभारणी कशा पद्धतीने केली होती. त्याच्या आठवणींचीही अनेक स्थळ आहेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी छत्रपतींचा हा पुतळा उभारणी होत असताना फार बारकाईने अनेक गोष्टींवर लक्ष ठेवून होते. सुप्रसिद्ध शिल्पकार रामसुतार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिल्पकार पुत्र अनिल सुतार आणि टीमने या पुतळ्याची उभारणी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता मिलींद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता किणी, उपअभियंता पाटील या सर्वांनीच छत्रपतींचा हा भव्य-दिव्य पुतळा उभारला जाताना ठराविक मर्यादित कालावधीत पूर्ण करण्याच्या प्रयत्नात मोलाचा वाटा राहिला. पालकमंत्री ना. नितेश राणे, मालवण-कुडाळचे आ. निलेश राणे हे, तर छत्रपतींच्या पुतळ्याच्या बांधकामावर नजर ठेवत सतत आढावा घेत होते. यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांनी देखील हिंदुस्थानच्या अस्मितेचा हा विषय असल्याने आवश्यक असणारा निधी तत्काळ उभा करून दिला.
कोकणात पर्यटनासाठी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला राजकोट किल्ल्यावर यावेसेच वाटेल. छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक व्हाव असं प्रत्येक पर्यटकाला वाटल्यावाचून राहणार नाही. या पुतळयाची भव्य-दिव्यता कोकणातील पर्यटन वाढीलाही चालना देणारी ठरणार आहे. यानिमित्ताने कोकणच्या पर्यटन विकासाचाही एक नियोजनबद्ध आराखडा तयार केला पाहिजे. आणि एक वर्षभराच्या या नियोजन आराखड्यात कोकणातील सर्वच पर्यटनस्थळांचा सर्वांगिण विकास करण्याचा संकल्प महाराष्ट्र शासनाने ठरवला पाहिजे. पर्यटन प्रकल्प विकासातून राज्याच्या तिजोरीत मोठी भर पडू शकते. महाराष्ट्र राज्याच्या अर्थ संकल्पाचा मोठा वाटा उचलण्याची ताकद कोकणातील पर्यटन स्थळात आहे; परंतु कोकणातील पर्यटन विकास नेहमीच महाराष्ट्रातील पर्यटन मंत्र्याच्या उदासिनतेने रखडला आहे.
कोकणातील पर्यटनातून महाराष्ट्राची आर्थिक समीकरणे कशा रितीने झपाट्याने बदलू शकतात याबद्दलची कोणतीही माहिती राज्याच्या पर्यटन विभागाला असण्याची शक्यता कमी आहे. कोकणातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या निमित्ताने कोकणातील छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या अनेक वास्तू आहेत. त्याची देखील जपणूक केली पाहिजे. शिवसृष्टीदेखील प्रस्तावित आहे. या शिवसृष्टीचे निर्माणदेखील विशिष्ट कालावधीत केल्यास निश्चितच येणाऱ्या पर्यटकांना ही नव्याने उभी राहणारी सृष्टीदेखील पाहता येणारी आहे. भारत सरकारचा पुरातत्त्व विभाग काही करू देण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यातही बदल घडण्याची आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजीराजेंच्या राजकोटवरील पुतळ्याने मालवण शहरालादेखील मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे.