Thursday, May 15, 2025

महामुंबई

नव्या रस्त्यांचे पदपथ दिव्यांग व्यक्तींसाठीही...

नव्या रस्त्यांचे पदपथ दिव्यांग व्यक्तींसाठीही...

'पदपथ दिव्यांगस्नेही असावेत' : अभिजीत बांगर

मुंबई : काँक्रीट रस्त्यांसमवेत केले जाणारे पदपथ सर्वसामान्य पादचाऱ्यांसोबत दिव्यांग व्यक्तींसाठीही सुगम्य आणि दिव्यांगस्नेही असावेत. पदपथाचा पृष्ठभाग समान आणि अडथळारहित असावा. पदपथांवर दृष्टिहीन व्यक्तींना मार्गदर्शन करणारी उभ्या तथा आडव्या रेषांची फरशी आवश्यक आहे, असे स्पष्ट निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.

पूर्व उपनगरात सुरू असलेल्या रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण कामांची अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी मंगळवार, १३ मेच्या रात्री प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. त्यात मुलुंड (पूर्व) येथील होली एन्जल्स् हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय परिसरातील रस्ते, पवई येथील सीमाशुल्क वसाहत परिसरातील रस्ते, हिरानंदानी जुना बाजार परिसरातील रस्ते, साकी विहार रस्ता आणि चेंबूर सहकारनगर येथील शेल कॉलनी मार्ग आदींचा समावेश आहे.

२० मे २०२५ पर्यंत पेव्हमेंट क्वालिटी काँक्रीट टाकले जाणार आहे. त्यानंतर उर्वरित कामे पूर्ण करण्यावर भर दिला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर रस्ते बांधणी कामातील आव्हानात्मक ठिकाणांची देखील बांगर यांनी पाहणी केली. तसेच, स्थानिक अभियंत्यांच्या शंकांचे निरसन करत आवश्यक ते निर्देश दिले.

डांबराद्वारे सांधे भरताना बहुतांश वेळा रस्त्याचे विद्रुपीकरण होते. ते टाळण्याचे निर्देश बांगर यांनी यापूर्वीच दिले आहेत. या पार्श्वभूमीवर रंगकामाच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या ऍब्रो टेप या विशिष्ट प्रकारच्या 'मास्किंग टेप' चा या ठिकाणी सांधे भरण करताना अवलंब करण्यात आला. सांधे भरण करताना सिलिकॉन सिलंट तथा डांबराचा वापर करताना ऍब्रो टेपचा अनिवार्य पद्धतीने वापर करावा, असे निर्देश बांगर यांनी दिले.

रस्तेबांधणी अखेरची कामे जसे की, थर्मोप्लास्ट, कॅट आईज, दिशादर्शक फलक, वाहतूक सुरक्षा चिन्हे, जंक्शन ग्रीड आदी अत्युच्च दर्जाची असावी. कोणत्याही परिस्थितीत दुय्यम दर्जाचे काम करु नये, तडजोड करू नये. आवश्यकता भासल्यास कामे पुन्हा करून घ्यावीत, असे स्पष्ट निर्देश बांगर यांनी दिले. रस्ते धुण्यापासून ते थर्मोप्लास्ट, कॅट आईजपर्यंतच्या कामांची खात्री केल्यानंतर रस्ते वाहतुकीसाठी खुले करावेत, असेदेखील बांगर यांनी नमूद केले.

पदपथांवर ठराविक अंतरावर चेंबर असल्यामुळे काही ठिकाणी चढउतार निर्माण होवून 'सुगम्य' धोरणास परस्परविरोध होतो, असे निरीक्षण नोंदविताना अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी नोंदविली. पदपथांवर दृष्टीहीन व्यक्तींना मार्गदर्शन करणारी उभ्या/आडव्या रेषांची फरशी च्या जागेमध्ये चेंबर कव्हर येत असेल तर या कामी तज्ज्ञांचे मत जाणून घ्यावे, भारतीय तंत्रज्ञान संस्थेकडून (आय. आय. टी. मुंबई) सल्ला घ्यावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना केली. तसेच, रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यापूर्वी रस्त्यांलगतच्या पावसाळी जलवाहिनीमध्ये प्रत्यक्षात पाणी टाकून त्यात अवरोध नाही ना याची खात्री करावी, असे निर्देशदेखील दिले.

भारतीय तंत्रज्ञान संस्था (आय. आय. टी. मुंबई) चे सहायक प्रा. सोलोमन देबबर्मा, महानगरपालिकेचे रस्ते व वाहतूक विभागाचे प्रमुख अभियंता गिरीश निकम यांच्यासह गुणवत्ता नियंत्रण संस्थेचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

Comments
Add Comment