
श्रीरंगपट्टन : कर्नाटकमधील प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ आणि पद्मश्री पुरस्कार विजेते डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला आहे. डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांचा मृतदेह श्रीरंगपट्टनच्या साई आश्रमाजवळील कावेरी नदीत आढळला.
अय्यप्पन पत्नीसह म्हैसूरच्या विश्वेश्वरा नगर औद्योगिक क्षेत्रात राहत होते. ते ७ मे पासून बेपत्ता होते. घरच्यांनी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. पोलीस तपास सुरू असताना नदीतून वाहत एक मृतदेह किनाऱ्यालगत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच पोलीस नदीच्या किनाऱ्यावर पोहोचले. ज्येष्ठ नागरिकाचा मृतदेह बघून पोलिसांनी अय्यप्पन कुटुंबाशी संपर्क साधला. अय्यप्पन कुटुंबातील सदस्यांनी मृतदेह बघून ओळख पटवली. डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली आहेत.
पोलिसांनी पद्मश्री पुरस्कार विजेते सुब्बन्ना अय्यपन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी तपास सुरू केला आहे. संशयितांची चौकशी सुरू आहे. डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांनी आत्महत्या केली की त्यांना कोणीतरी पाण्यात ढकलून दिले याचा तपास पोलीस करत आहेत.
डॉ. सुब्बन्ना अय्यप्पन यांनी मत्स्यव्यवसायात पदव्युत्तर पदवी शिक्षण घेतले होते. राष्ट्रीय स्तरावर अनेक उच्च पदांवर काम केले होते. भारताच्या नीलक्रांतीला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याप्रकरणी त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन २०२२ मध्ये गौरव करण्यात आला होता.