Monday, May 12, 2025

विशेष लेखसंपादकीय

सायबर संस्कार ही एक आवश्यक गरज

सायबर संस्कार ही एक आवश्यक गरज

डॉ. दीपक शिकारपूर

एव्हाना आपण सर्वांनीच सायबर जगतात आणि त्या निमित्ताने एका नव्या विश्वात प्रवेश केला आहे. या जगतात आपल्याला अनुकूल आणि जगणे सूखकर करणारी अनेक तंत्रे समाविष्ट आहेत. गेल्या दशकातील तंत्रज्ञान विकास व अंमलबजावणीच्या वेगापेक्षा पुढील दशकातील वेग अधिक दखलपात्र असेल. सर्वांना, विशेषतः एकविसाव्या शतकात जन्माला आलेल्या पिढीला इथे वावरताना जास्त सतर्क व जागरूक राहावे लागेल.

मनन करून, सर्वांगीण विचार करून कृती करतो तो मनुष्य. चांगला विचार आणि कृती होण्यासाठी संस्कारांची गरज असते. आजचे युग पूर्णपणे डिजिटल झालेय. एकविसाव्या शतकात संगणक आणि मोबाइल क्रांतीने जीवनपद्धतीचे सर्व संदर्भ बदलेले आहेत. आज प्रौढ वयात संगणक अथवा इंटरनेटशी संबंध आलेली पिढी आणि जन्मापासून संगणकीय युगातच वावरणारी म्हणजे साधारण २०००नंतर जन्मलेली मुले-मुली यांच्या इंटरनेटकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात मूलभूत फरक असणार आहेच. इंटरनेट वापराच्या ३० टक्के एवढा वेळ सोशल नेटवर्किंग आणि ब्लॉग्जसाठी खर्च केला जातो, जो ई-मेलपेक्षा ही जास्त आहे. गेल्या काही वर्षांमध्ये लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट वापरकर्त्यांच्या प्रमाणात जगभर लक्षणीय वाढ होत आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक कायम टाळला पाहिजे. अनेकदा वेळ नसल्याने पालक आणि पाल्यांचा संवाद कमी होत आहे. त्यामुळे संगणक, मोबाइल, टीव्ही ही उपकरणे मुलांच्या संवादाची साधने बनली आहेत. ८-१४ वयोगटातील बरेच विद्यार्थी याच्या आहारी जाऊन तेच आपले विश्व असल्याच्या भ्रमात वावरतात. त्यामुळे नैराश्य, दुभंगलेले व्यक्तिमत्त्व आदी समस्यांमुळे काहीजण आत्महत्येचा मार्गही स्वीकारत आहेत.

या पार्श्वभूमीवर प्रत्येक वस्तू, उपकरण हे ‘स्मार्ट’ असणे ही आज चैन नसून गरज बनत चालली आहे. सतत इंटरनेटचा वापर हे सुद्धा एक व्यसनच बनत आहे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक कायम टाळला पाहिजे. शेवटी आपण लक्षात घेतले पाहिजे की तंत्रज्ञान हे सुऱ्यासारखे असते. एखादे फळ कापण्यासाठी किंवा एखाद्याची हत्या करण्यासाठीही ते वापरले जाऊ शकते. इंटरनेटवर अनेक गुन्हेगार वावरत असतात, तसेच अतिरेकी मनोप्रवृत्तीचे लोकही वावरत असतात. मात्र हे लोक तुम्हाला फसवायचा प्रयत्न न करता आपलेसे करण्याचा प्रयत्न करत असल्याने या प्रकारच्या लोकांनी चालवलेल्या संकेतस्थळांची सफर करताना सावधपणा अंगी बाळगणे जरूरीचे असते. आजच्या काळात पालकांनी आपल्या पाल्यांना स्मार्टफोन द्यायच्या आधी तो कसा वापरावा याचे प्रशिक्षण देणे अत्यावश्यक आहे. तंत्राला वापरणारे मन, विचार हे त्याचा वापर ठरवते. अमेरिकेत अनेक वेळा शाळकरी मुलांवर खुनी हल्ले झालेत. ते आत्तापर्यंत कुठल्या तरी हाडामासाच्या विकृत खूनही व्यक्तीने केलेत. पण भविष्यात कदाचित स्वयंचलित वाहन किंवा यंत्रमानव असे गुन्हे करू शकेल. त्यावेळी हत्या करणारा कोण हे ठरवणे अवघड असेल. माहिती-तंत्रज्ञानातील अभूतपूर्व क्रांतीने सारे जग जोडण्याची किमया केली खरी; परंतु त्याबरोबरच विघातक, विध्वंसक वृत्तींनाही कमी जोखीम पत्करून जास्त दुष्परिणाम घडवण्याची क्षमताही प्राप्त झाली. सायबर तंत्रज्ञानाद्वारे चालवली जाणारी अशी युद्धे आत्तापर्यंतच्या लढायांपेक्षा फार वेगळी असणार आहेत. कोणतीही प्रत्यक्ष सीमारेषा नसलेली आणि फार वेगाने पसरणारी. यापुढे शाळा, महाविद्यालयांमध्येही संगणक किंवा स्मार्टफोनच्या दुष्परिणामांवर प्रबोधन होणे बंधनकारक व्हायला हवे. नागरिकशास्त्र या विषयातही याचा समावेश करायची हीच वेळ आहे. आधुनिक तंत्रज्ञान योग्य प्रकारे वापरणे म्हणजे सायबर संस्कार. सायबर संस्कार प्रशिक्षणात स्मार्टफोनचा वापर नेमका कसा करावा, सोशल मीडियावर माहिती पोस्ट करताना कोणती काळजी घ्यावी, सेल्फीचे व्यसन मर्यादेत असावे; किंबहुना ते व्यसन बनूच नये, योग्य पद्धतीने चलतचित्रण करणे, सायबर गुन्हेगारी, स्वतःला सायबर सुरक्षित कसे ठेवायचे, सायबर कायदे कसे पाळायचे आणि सायबर गुन्हेगारी करणाऱ्यांना झालेल्या शिक्षा या महत्त्वाच्या बाबींची माहिती द्यायला हवी. हे प्रशिक्षण गांभीर्याने द्यायला, घ्यायला हवे. तरच त्याची परिणामकारकता जाणवेल आणि उपयुक्तता सिद्ध होईल. पूर्वी फक्त भौतिक गोष्टींची सुरक्षा गणली जायची. आता सायबर सुरक्षा आणि सर्व संगणकीय भांडवलाची आणि माहितीची सुरक्षा ही एक अत्यावश्यक बाब झाली आहे. कुंपण, पहारेकरी, कड्या-कुलूप, तिजोरी, शिस्त हे सर्व पर्याय पारंपारिक भौतिक जगातील व्यवसायांसाठी ठीक आहेत, पण डिजिटल युगात ते कुचकामी ठरतात. त्यासाठी वेगळे सायबर नियम अत्यावश्यक आहेत.

आगामी काही वर्षांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, विश्लेषण, यंत्रमानव (रोबोटिक्स), इंटरनेट ऑफ थिंग्स यासारख्या तंत्रज्ञानामुळे येत्या काळात जगाच्या भल्यासाठी अनेक क्रांतिकारी शोध लागतील. या संशोधनाचा वापर करून नवीन उत्पादने बनू शकतील आणि बनतीलही. पण हेच सर्व तांत्रिक प्रवाह एखाद्या विकृत, गुन्हेगारी वृत्तीच्या व्यक्तीच्या हाती पडल्यास नाशही होऊ शकतो. यामुळेच एमआयटी, स्टॅनफर्ड, हार्वर्डसारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये संगणक तंत्रज्ञांना आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नैतिकता, नीतिमूल्य या मूलभूत विषयांवर सक्तीचा अभ्यासक्रम विकसित होत आहे. त्यामुळे काय बरोबर आहे व काय चूक आहे हे समजून घेणे कसे गरजेचे आहे, हे नव्या पिढीला, तंत्रज्ञांना कळेल आणि या बाबी ते आचरणात, व्यवहारात आणतील, असा त्यांचा होरा आहे. हा प्रवाह काही वर्षांमध्येच भारतीय शिक्षणपद्धतीमध्येही अंतर्भूत होईल. अस्तित्वात असलेल्या मानवी नातेसंबंधांचा दर्जा आणि खुमारी वाढवण्यासाठी तंत्रज्ञान वापरा, पण सोशल नेटवर्किंग साइटवर जाऊन मित्र-मैत्रिणी शोधू नका, अशा ई-नातेसंबंधांचे मानवी व्यक्ती ऋणानुबंधात फार क्वचित रुपांतर होते, हे आता समजून घ्यावे आणि प्रसंगी समजावून सांगावे लागेल. त्यातून अनेकदा गुन्हेगारीचे प्रकार घडतात. सर्वच इंटरनेट वापरकर्ते सभ्य आणि सुसंस्कृत असतीलच असे नाही. इंटरनेटवर अनेक गुन्हेगार वावरत असतात तसे अतिरेकी मनोप्रवृत्तीचे लोकही वावरत असतात. मात्र हे लोक तुम्हाला फसवायचा प्रयत्न न करता आपलेसे करण्याचा प्रयत्न करत असल्याने या प्रकारच्या लोकांनी चालवलेल्या संकेतस्थळांची सफर करताना अंगी सावधपणा बाळगणे जरूरीचे असते.

कुठलीही गोष्ट मर्यादित प्रमाणात मूल्य देते. तंत्रज्ञानाचेही असेच आहे. गरज असेल तरच मुलांनी ते वापरावे. वेळ जात नसेल तर मैदानी खेळ, कला, बाह्य क्रिया, योगा, फिरणे, संगीत असे अनेक पर्याय आहेत. इंटरनेट न वापरायचीही सवय झाली पाहिजे. माझा एक मित्र रविवारी इंटरनेट अजिबात वापरत नाही. या बाबतीतही स्वतःवर बंधन आणि शिस्त आवश्यक आहे. अनेकजण स्वत:वर ते घालून घेतात तर अनेकजण मुळातच संतुलन राखून सोशियल मीडिया, इंटरनेटचा वापर करतात. या ठिकाणी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, माफक प्रमाणात आणि हवे असेल तेव्हाच आपण हे तंत्रज्ञान वापरले तर त्याचे अनेक फायदे आहेत, मात्र अनाठायी, उठता-बसता सायबरजगतात रमायची सवय लागली, तर नजिकच्या काळातच या सवयीचे रुपांतर व्यसनामध्ये होऊ शकते आणि पाहता पाहता मुले या तंत्राच्या आहारी जाऊ शकतात. सायबरचोरीचे, या तंत्रामुळे निर्माण होणाऱ्या गुंत्याचे तोटे समजून घेतले आणि समजावून दिले, तर भविष्यात या विश्वात वावरणे सोयीचे होईल, अन्यथा त्याचा बाऊ करणे किंवा त्यापासून दूर राहण्याचा मार्ग अनेकजण स्वीकारताना दिसतील.

Comments
Add Comment