Monday, May 12, 2025

विशेष लेख

यांना रुग्णालये म्हणायची का ?

यांना रुग्णालये म्हणायची का ?

विनायक बेटावदकर : कल्याण

पुणे येथील दीनानाथ या खासगी रुग्णालयात एका गरोदर महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचे उदाहरण आहे. त्याचे सर्व पडसाद महाराष्ट्रात उमटले. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. हे उदाहरण ताजे असतानाच कल्याणच्या महापालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालयात एका महिलेला अपुऱ्या साधनाअभावी उपचार करणे अशक्य असल्याने कळवा येथील ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. तेव्हा तिला नेण्यासाठी वाहन असूनही ते न मिळाल्याने तिने रुख्मिणीबाई रुग्णालयाच्या आवारातच प्राण सोडल्याची दुर्दैवी घटना घडली. यामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. डॉक्टर असूनही केवळ उपचार करायला लागणारी साधने व औषधे नाहीत असे प्रथम दर्शनी सांगितले जाते. नवीन आलेल्या महापालिका आयुक्तांनी याची तातडीने दखल घेऊन चौकशी सुरू केल्याचेही सांगितले जाते. कल्याण-डोंबिवली महापालिकेची डोंबिवलीत एक व कल्याणात एक अशी दोन मोठी रुग्णालये आहेत. पण ही दोन्ही रुग्णालये वैद्यकीयदृष्ट्या नागरिकांना किती उपयुक्त आहेत असा प्रश्न सर्वांनाच पडतो? या दोन्ही रुग्णालयांचा दर्जा नागरिकांच्या मते योग्य नसल्याने अनेकदा रुग्णाला खासगी रुग्णालयात न्यावे लागते. काहीवेळा वेळीच उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावतात. अशावेळी त्यांच्या नातलगांनी रुग्णालयात गोंधळ घातल्याची, तोडफोडीची उदाहरणे पहावयास मिळतात. सविता गोविंद बिराजदार वय ४३ वर्षे यांना अत्यवस्थस्थितीत या रुग्णालयात आणण्यात आले. तेथे त्यांची प्रकृती पाहून कळव्याच्या ठाणे महापालिकेच्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला डॉक्टरानी दिला. पाच तास प्रयत्न करूनही त्यांना वाहन उपलब्ध होऊ शकले नाही. त्यांना प्रथम पक्षाघाताचा झटका आला, थोड्याचवेळात ब्रेनस्ट्रोकचाही झटका येऊन त्यांची प्रकृती अधिक गंभीर बनली. महापालिका रुग्णालयात डॉक्टर होते. त्यांनी रुग्णाला तातडीने कळवा रुग्णालयात नेण्यास सांगितले. यावेळी महापालिकेच्या चार रुग्णवाहिका तेथे होत्या पण त्यातील तीन रुग्णवाहिका या सुस्थितीत नसल्याचे आढळून आले. एक रुग्णवाहिका सुस्थितीत होती. तिचा चालकही तेथेच उपलब्ध होता. त्याने वेळेचे महत्त्व व रुग्णाची प्रकृती लक्षात घेतलीच नाही. . एका रुग्णाच्या जोडीला दुसरा रुग्ण आला की गाडी काढतो असे सांगून तो स्वस्थ राहिला. रुग्णाच्या नातलगांनी १०८ क्रमाकावर संपर्क साधला पण तीही रुग्णवाहिका आली नाही. या दरम्यान सावित्रीची प्रकृती गंभीर होत गेली. यातून आज महापालिका वैद्यकीय विभागासंबंधात अनेक प्रश्न निर्माण होतात. या रुग्णवाहिका, वहाने नेमकी कोणासाठी आहेत? जर आपल्याकडील वाहन देता येत नसेल तर दुसरे वाहन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी रुग्णालय व्यवस्थापनाची येते. ती त्यांनी पार का पाडली नाही. खासगी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न का केले नाही? या सर्व घटनांना कर्मचारी, अधिकारी व महापालिकेचा संपूर्ण वैद्यकीय विभाग जबाबदार आहे. त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल होणे जरुरीचे आहे. याची चौकशी करून दोषी व्यक्तींवर कारवाई करणे अत्यंत महत्वाचे आहे. याकडे गांभीर्याने पाहून रुग्णालय हे रुग्णाच्या मृत्यूचा सापळा होणार नाही याची काळजी घेणे जरुरीचे आहे.

Comments
Add Comment