Monday, May 12, 2025

अग्रलेखसंपादकीय

जित्याची खोड...

जित्याची खोड...

आम्ही शांततेत राहावे म्हणून युद्ध करतो असे प्रख्यात ग्रीक तत्वज्ञ ॲरिस्टॉटल याचे वचन आहे. त्याची प्रचिती मोदी यांनी काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धात आणून दिली. मोदी यांचा युद्धाचा आडाखा अचूक होता. भारताने पाकच्या नागरिकांवर हल्ले केले नाहीत. पाकच्या मांडीवर बसून भारतातील निरपराध नागरिकांना कंठस्नान घालणाऱ्या दहशतवाद्यांना टार्गेट केले. हे युद्ध होते आणि पाकचा या युद्धात सर्वंकष पराभव झाला, तसा तो पूर्वीही साडेतीन वेळा झाला आहे. पण आता तर तो जास्तच परिणामकारक आणि प्रिसिजन म्हणजे अचूक हल्ला होता असे म्हणावे लागेल. मोदी यांचे अचूक अंदाज आणि आडाखे किती अचूक आहेत याचा अंदाज येतो. वास्तविक हे युद्ध पारंपरिक अर्थाने नव्हते, तर हा पाकच्या नापाक इराद्यांना जमीनदोस्त करण्याच्या इराद्याने भारताने पाकला शिकवलेला धडा होता. पहलगाम येथे पाकच्या दहशतवाद्यांनी पर्यटकांवर नृशंस हल्ले केले आणि त्यांचे कपडे काढून त्यांना ठार मारले. अनेकांना कलमा पढायला लावला आणि ज्यांना तो येत नव्हता त्यांना पॉइंट ब्लॅक गोळ्या घातल्या. या दहशतवाद्यांना मोदी यांनी धडा शिकवण्याचा निर्धार केला आणि तो अमलातही आणला. या जागी नेहरू किंवा काँग्रेसचे सरकार असते तर मुळमुळीत निषेधाचे खलिते धाडत बसले असते. पण मोदी आणि नेहरू किंवा काँग्रेस यांच्यात हा गुणात्मक फरक आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार आपल्याला नेमके काय हवे आहे हे निश्चित जाणते आणि तसेच करते. त्यामुळे मोदींची लोकप्रियता पराकोटीची वाढली आहे. पण येथे मोदी यांच्या लोकप्रियतेचा प्रश्नच नव्हता. ज्या भारताच्या निरपराध भगिनींनी आपले कुंकू गमावले त्यांच्या पतींच्या हत्येचा बदला घेणे आवश्यक होते आणि तेच मोदी यांनी केले. त्यामुळे या कारवाईला मोदी यांनीच 'ऑपरेशन सिंदूर' हे सार्थ नाव दिले.

भारताला आता विरोधक शहाणपणा शिकवत आहेत की, भारताने युद्ध का केले नाही आणि पाकला संपूर्ण उद्ध्वस्त करायला हवे होते. जर तसे केले तर हेच विरोधक बोंबलत गेले असते की मोदी सरकारने पाकच्या लोकांना ठार मारले म्हणून. त्यामुळे मोदी यांनी शांत राहून आपला बदला घेतला आणि महिलांना न्यायही दिला आहे. पाकच्या कोणत्याही भुलावणीस बळी पडू नये हे जाणून मोदी यांनी पाकला आता त्यांच्या दहशतवाद्यांच्या अड्यांना उद्ध्वस्त केले आहे. जर लोकांना मारले असते तर पाक गाऱ्हाणी घेऊन बोंबलत गेला असता. पण आता त्याला ती संधी नाही. कारण भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ले करून ते बेचिराख केले आहेत. यातच मसूद अझर याच्या कुटुंबीयांचा खात्मा झाला आहे. हा मसूद अझर म्हणजे तोच की ज्याने कंदाहार येथे विमान अपहरण प्रकरणात भारतीयांना ओलिस ठेवले होते आणि त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला होता. त्याचे नऊ कुटुंबीय ठार झालेत, तर दुसरा एक दहशतवादी अब्दुल रऊफ हा देखील या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झाला आहे. हे युद्ध नव्हते तर पाकला त्याच्या जबरदस्त आगळीकीबद्दल तितकीच न भूतो न भविष्यती अशी शिक्षा होती. दहशतवादी आता हा धडा धेऊन चुकले असतील. आता भारतात काँग्रेसचे सरकार नाही, तर मोदी यांच्या भाजपाचे राज्य आहे आणि ते आपल्याला थोड्याही चुकीचे प्रायश्चित्त देते. पाकच्या शस्त्रसंधीवर भारताचा विश्वास नाही. त्यामुळे आता भारताने पाकला ठणकावून सांगितले आहे की यापुढे जर पाकने कोणतीही आगळीक केली, तर ते भारताविरोधात युद्ध पुकारले असा त्याचा अर्थ धेतला जाईल. यामुळे पाक आधीच गर्भगळीत झाला आहे. मोदी यांनी सिंधू जल करार स्थगित राहील अशी व्यवस्था केली आहे. त्यामुळे पाकच्या नाकातोंडात पाणी गेले आहे आणि त्यामुळे त्यांची शेती पाण्याअभावी सुकणार आहे. तसेच कित्येक आर्थिक उपाय योजले आहेत ज्यामुळे पाकचे जिणे मुश्किल होणार आहे. पाकला शिकवला तो धडा पुरेसा नसला तरीही सध्या तरी इतके पाकला आपल्या चुकीची जाणीव करून देणे आवश्यक होते आणि ती मोदी यांनी करून दिली आहे. भारताने या ऑपरेशनमध्ये दहशतवादी तळांवर हल्ले करून ते उद्ध्वस्त केले. हे यश फार मोठे आहे. भारताने कुठेही जनतेला ढाल केले नाही. त्याउलट पाकने त्याच्या स्वभावानुसार आपल्याच जनतेला ढाल करून भारतीय लष्करांवर हल्ले केले होते. पण ते हल्ले सर्व फोल ठरले. आता पाकला असा धडा शिकवला आहे की काही वर्षे तरी तो यातून डोके वर काढू शकणार नाही. पाकच्या कारवाया बंद तर होतीलच पण दहशतवादी ज्यांनी पहलगाम हत्याकांड घडवले त्यांना वेचून ठार मारण्यावर आता भारत लक्ष केंद्रित करेल. कारण भारताची ही जखम आहे की, जे दहशतवादी या हल्ल्याला जबाबदार आहेत ते तर पळून गेले आहेत. त्यांना जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत भारताचा बदला अपुरा राहील. आता पाकला शांततेची शिकवण याद येते आहे. पाकचे दैनीक 'द डॉन'मध्ये उपदेशाचे डोस पाजले आहेत की युद्ध कसे चुकीचे आहे. पण अगोदर कुणी सुरुवात केली आणि इतके दिवस पाक तेच करत होता. आता भारताकडून जशास-तसे किंबहुना त्यापेक्षाही कडवे उत्तर मिळायला लागले म्हणून पाकला आता शांतता आठवते आहे. शांतता हवी असेल तर ताकदवान असावे लागते. दुर्बळांच्या आवाहनाला कुणीही प्रतिसाद देत नाही. भारताने हे सिद्ध केले आहे. पाकने मात्र आपण अद्यापही सुधारत नाही असे वारंवार सिद्ध केले आहे. त्याने शस्त्रसंधी झाल्यावरही आगळीक सुरूच ठेवली आहे. पाकचे ड्रोन भारतीय हद्दीत येत आहे आणि त्यामुळे कित्येक घरांचे नुकसान झाले आहे. तसेच काही ठिकाणी माणसेही ठार झाली आहेत. पाकला कोणत्याही परिस्थितीत सामंजस्याचे बोलणे समजत नाही. त्याला बरबादीची भाषाच समजते. तसे असेल तर भारतही त्यास आता तसेच उत्तर देईल. मोदी यांनी पाकला धडा तर शिकवला आहे पण पाक ते समजणार नसेल तर पाकशी सर्वंकष हल्ल्याची भाषा करावी लागेल. अजूनही पाकच्या कुरापती काढण्याचे उद्योग सुरूच आहेत. त्या थांबल्या नाहीत, तर भारताला अखेरचा घाव घालावा लागेल. मग पाकला जगातील कोणताही देश वाचवू शकणार नाही हे सत्य आहे.

Comments
Add Comment