
भव्य पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार पूजन
किल्ले राजकोट येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांची विशेष उपस्थिती
मालवण : मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट येथे राज्य शासनाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आला आहे. महाराजांच्या या पुतळ्याचे दर्शन घेऊन पूजन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवार, ११ मे रोजी दुपारी १२ वाजता मालवण येथील किल्ले राजकोट येथे येणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री नितेश राणे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. यांसह सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनिल नाईक, खासदार नारायण राणे, माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, आ. निरंजन डावखरे, आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, आ. कालिदास कोळंबकर सार्वजनिक बांधकाम विभाग अपर मुख्य सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर, सा. बां. विभाग (रस्ते) सचिव सदाशिव साळुंखे, बांधकाम सचिव संजय दशपुते, सा. बां. कोकण प्रादेशिक विभाग मुख्य अभियंता शरद राजभोज, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या पहिल्या १०० दिवसांत महाराजांच्या पुतळ्याचे काम हाती घेतले. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जगप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या मे. राम सुतार आर्ट्स क्रिएशन्स प्रा. लि. या कंपनीकडून अतिशय दर्जेदार स्वरूपात महाराजांच्या पुतळ्याचे राम सुतार यांचे सुपुत्र शिल्पकार अनिल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. समुद्राच्या दिशेने तलवारधारी स्थितीत योद्ध्याच्या आवेशात छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा आहे. पुतळ्याची उंची जमिनीपासून उंची ९३ फूट एवढी आहे. संपूर्ण पुतळा ब्राँझ धातूमध्ये उभारण्यात आला असून पुतळ्यासाठी सर्वोत्तम दर्जाचे स्टेनलेस स्टील सपोर्ट फ्रेमवर्क करण्यात आले आहे. तसेच चौथऱ्यासाठी उच्च दर्जाचे काँक्रीट व स्टेनलेस स्टील सळईचा वापर करण्यात आलेला आहे. २०० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहिले तरी पुतळ्याला काहीही होणार नाही. पुतळा भक्कमपणे उभा राहील याचीही चाचणी करून घेण्यात आली आहे. एकूणच सर्वोत्तम असा महाराजांचा पुतळा देखण्या स्वरूपात अभिमान वाटावा असा पुर्ण झाला आहे. सर्वात उंच स्वरूपातील महाराजांचा हा पुतळा आहे. पुतळा उभारणीत सर्वांचे योगदान मोलाचे ठरले. असे शिल्पकार अनिल सुतार यांनी सांगितले.
महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या पूजन समारंभास उपस्थित राहावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभाग सिंधुदुर्गचे अभियंता मिलिंद कुलकर्णी, सावंतवाडी विभाग कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, मालवण उपविभाग सहायक अभियंता अजित पाटील यांनी केले आहे.