
ओंजळ पल्लवी अष्टेकर
आत्ताच आमच्या ओळखींमध्ये अनेक मंडळींची पन्नाशी पूर्ण झाली, हळूहळू आपण पण पन्नाशीकडे निघालो आहोत हे लक्षात आले. पन्नासपासून एक नवीन आयुष्याची सुरुवात आहे आणि अनेक गोष्टी आयुष्यात बदलणे गरजेचे आहे, हा लेख सर्व पन्नाशीला धडकणाऱ्या असलेल्या मंडळींसाठी आहे. माझ्या परिचयातल्या गौतमी काकू आज पासष्ठीच्या वयात आहेत. अनेकदा आम्ही दोघी वेगवेगळ्या गप्पा करतो. त्या जरी मला वयाने ज्येष्ठ असल्या तरी गप्पा मारण्यासाठी आमच्या आड कधी वय आले नाही. गौतमी काकूंना दोन मुली व एक मुलगा आहे. त्यांनी आपल्या दोन्ही मुलींची व मुलाचे लग्नं करून दिले. त्यांचा मुलगा व सूनबाई नोकरी करतात. त्यांच्या पतीचे त्यांच्या वयाच्या बासष्ठीला निधन झाले.
गौतमीताई एका शाळेत शिक्षिका म्हणून काम करायच्या. त्यामुळे एकप्रकारचे त्यांचे जीवन साचेबद्ध होते. आता त्यांचे आयुष्य म्हातारपणाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचले आहे. गौतमीताईंसोबत बोलताना मला कधीही त्यांच्याकडून निराशायुक्त शब्दं ऐकायला मिळत नाहीत, जणू उत्साहाने वाहणारा धबधबा. कविता करणाऱ्या, लेख लिहिणाऱ्या गौतमीताईंबाबत माझे कुतूहल वाढतच होते. एकदा मी त्यांना विचारले, “तुम्ही इतक्या उत्साही कशा?’’
“अगं, वयाच्या अंदाजे पन्नाशीपासून मी काही गोष्टी माझ्या मनावर ठसविल्या. मी शाळेत नोकरी करत असताना नेहमी मुलांमध्ये राहायचे. त्यामुळे त्यांच्यातील चैतन्य, उत्साह मला गवसला. मी स्वत:साठी काही तत्त्वे जाणीवपूर्वक पाळायची ठरविले. माझ्या सुनेशी-मुलाशी वितुष्टं न येता सर्वांचे राहणे आनंदमय कसे होईल हा विचार मी कायम मनात ठेवला. परगावी असलेल्या माझ्या मुलीदेखील आपापल्या व्यापातून मला भेटायला येतात. आम्ही हसून-खेळून वावरतो. त्यामुळे आयुष्य मला कधी कंटाळेवाणे वाटले नाही. माझे पती आपला व्यवसाय सांभाळून स्वत:च्या वृद्धं आईची सेवा करायचे. मुलांनीही लहानपणापासून हेच पाहिले. आता मुले आपला आदर करतात या विचाराने मला बरे वाटते. शिवाय माझ्या मुलाच्या व सुनेच्या संसारात किती लुडबुड करायची हे मी सुरुवातीपासून ठरविले होते. त्यामुळे आताचा काळ मी सुखाने काढू शकते”. गौतमीताईंच्या बोलण्यातून मला खूप साऱ्या गोष्टी समजल्या. उतारवयात आपले जीवन कसे ठेवायचे हे जणू त्यांनी सांगितले.
बँकांचे आर्थिक व्यवहार, पोस्टाचे व्यवहार, मुच्युअल फंडस्, इन्शुरन्स पाॅलिसीज अशा गोष्टी स्रियांनी जाणून-शिकून घेणे याला फारसे महत्त्व त्यांनी दिलेले नसते. ‘मुले परदेशी स्थाईक’ अशी कितीतरी जोडपी आपण पाहतो. अनेकदा आपली बँकांची-पोस्टाची कामे मुलांवर, नातवडांवर सोपवून ते मोकळे होतात. विशेषत: स्रियांनी आर्थिक व्यवहारात लक्ष घालणे जरूरीचे आहे. नाहीतर वृद्धापकाळी आपल्याला यातले काहीच कळत नाही अशी मनाची स्थिती होऊन जाते. तसेच आजकालच्या नवनवीन तंत्रज्ञानाविषयी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. नाहीतर आपण अगदीच कालबाह्य झाल्याची जाणीव होते.
काही वेळा एकट्याने आयुष्य काढणे वृद्धांना नकोसे वाटते. अशावेळेस ते केअर सेंटरचा आसरा घेतात. आमच्या परिचयातील एक आजी तीन मुले असूनही एकट्याच केअर टेकरच्या मदतीने आयुष्य काढत आहेत. त्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. कधी एखादे आजारपणं उद्भवले, तर त्या खूप कावऱ्याबावऱ्या होतात. घाबरून जातात. मग तेवढ्यापुरते चार दिवस मुले त्यांचे करतात आणि आपल्या घरी निघून जातात. पण आईला कायमस्वरूपी स्वत:च्या घरी घेऊन जाण्याचे नावच काढत नाहीत. अशा उतारवयात त्यांना एकटे राहावे लागणे हे वृद्धं पिढीला न पचणारे आहे.
अनेक वृद्धमंडळीचा “वेळ कसा घालवू” असा प्रश्नं डोक्यावर असतो. अशा मंडळींसाठी डे-केअर हा पर्याय चांगला असू शकतो. काही डे-केअर संस्था ९ ते ५ अशा वेळेत चालतात. तिथे झेपतील-जमतील अशा वेगवेगळ्या उपक्रमात वृद्धांना सहभागी होता येते. त्यांची नाश्ता व दुपारच्या जेवणाची सोय असते. गप्पा-गाणी यातून वेळ जातो. विविध उपक्रमांमध्ये मान्यवर येऊन काही गोष्टी शिकवतात. आपण म्हातारपणापर्यंत टेकलो हे अनेकांना पटत नाही, पण त्यामुळे निर्माण होणारे ताण-तणाव टाळता आले पाहिजेत. ९ ते ५ डे-केअरची वेळ संपल्यावर ही मंडळी आपापल्या कुटुंबात जातात. यामुळे वृद्धापकाळात आपला वेळ पण जातो व पुन्हा आपण आपल्या कुटुंबाशी जोडले जातो ही भावना आशादायक असते. त्याने मनाला पुन्हा उभारी येते.
आम्ही मालाड येथील मठात जप करण्यासाठी जातो, तिथे एक आजी नेहमी जप करत असतात. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक स्मित हास्य असते. त्यांच्या कानांना ऐकू येत नाही; परंतु त्यांचा हसतमुख चेहरा समाधानाने झळकत असतो. मनापासून जप करण्यात त्यांचा दिवस जातो. सर्वांना या आजींचा सहवास आनंददायी वाटतो. आपल्यालाही वृद्धापकाळात आपले मन समाधानी ठेवता यावे, जेणेकरून आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींना त्रास होणार नाही. त्यासाठी जपाची सवय होणे गरजेचे आहे. ही सवय मनाला पन्नाशीतच लावायला नको का?
खास करून पन्नाशीच्या आसपास स्रियांसाठी हा काळ “एम्टी नेस्ट पिरिएड” असतो. लहानपणी जे मुल सर्वस्वी आईवर अवलंबून असते, ते मुल आता काॅलेज शिक्षण संपवून आपापल्या उद्योगाला व्यवसायाला लागते. आपली पिल्लं स्वावलंबी होऊन घरट्यातून मुक्त होतात. अशावेळेस बायकांना आपल्या मुलांसाठी आपली गरज संपली अशी भावना मनात निर्माण होते. यातून काहीसे नैराश्य येण्याची शक्यता असते. या काळात त्यांनी सहनशीलतेने वागणे जरूरीचे आहे. तसेच येणाऱ्या वृद्धापकाळासाठीची तयारी पन्नाशीच्या आसपास पोहोचल्यानंतर व्हायला हवी. हे मनावर ठसविणे कठीण असले तरी अशक्य नक्कीच नाही. त्यामुळे रिकाम्या वेळात आपल्या आवडी-निवडी व छंद जोपासणे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मन ताजेतवाने व आनंदी बनते.
तसेच पन्नाशीनंतर आरोग्य टिकवून ठेवायचे असेल तर नियमितपणे व्यायाम, योगाभ्यास या गोष्टी करणे जरूरीचे आहे. तसेच वय वाढत जाईल तसे हृदयविकार, मधुमेह, संधिवात, हाडे ठिसूळ होणे अशा रोगांची शक्यता वाढते. डोळ्यांच्या समस्या जसे की मोतीबिंदू, काचबिंदू या वयानुसार येणाऱ्या समस्या असू शकतात. कमी हालचाली, तोल न सांभाळता येणे, पडण्याची भीती या वयात होण्याची शक्यता दाट असते. नैराश्य, अस्वस्थता विविध कारणांनी येऊ शकते. जसे की तब्येत, समाजापासून तुटक वागणे किंवा आर्थिक काळजी, वय वाढत जाईल तसे विस्मरण, वैचारिक क्षमतेवर परिणाम या गोष्टी घडतात. या सर्वांपासून येणाऱ्या ताण-तणावांवर मात करणे आवश्यक आहे.
आपले मन ताजेतवाने ठेवण्यासाठी वाचन, नवीन शिकण्याच्या गोष्टी आत्मसात करणे, छंदांमध्ये मन रमविणे यातून वैचारिक क्षमता स्थिर ठेवण्यास मदत होईल. आपले मित्र-मैत्रिणींसोबत जोडले जाण्याने एकटेपणाच्या समस्या दूर होतील. आर्थिक तरतूद, निवृत्तीनंतरचा आराखडा, भविष्याबद्दल सुरक्षितता या गोष्टी या वयात महत्त्वपूर्ण काम करतात. आपल्या संतुलित जीवनाची गुरूकिल्ली आपणच आहोत. चला तर मग, वयामुळे येणाऱ्या समस्या व त्यावरचे उपाय यांना आपण धाडसाने सामोरे जाऊ शकतो.