Saturday, May 10, 2025

कोलाज

नातवाचे गो-शाळा प्रेम अन् आजोबांची स्वप्नपूर्ती...!

नातवाचे गो-शाळा प्रेम अन् आजोबांची स्वप्नपूर्ती...!

विशेष संतोष वायंगणकर

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार नारायण राणे म्हणजे नव-नवीन संकल्पना सत्यात उतरवणारे व्यक्तीमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. कोणतेही कार्य हाती घेतल्यावर ते अर्धवट सोडत नाहीत. मनातल्या संकल्पनांना प्रत्यक्ष त्याची मांडणी करण्यात नारायण राणे यांना आनंद आणि समाधान लाभते. असाच एक प्रकल्प नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातल्या करंजे गावी उभा केला आहे. अर्थात या प्रकल्पाची संकल्पना खा. नारायण राणे यांच्या नातवाची आहे. अर्थात अभिराज निलेश राणे याच्या गो-प्रेमातून पुढे आली. लहानपणापासून अभिराज मुंबईत असतानाही दररोज न चुकता गाईला चारा देणे हा त्याचा नित्यक्रम बनला. यासाठीच आ. निलेश राणे यांनी दोन गाई मुंबईतून आणल्या आणि अभिराज या गाईंना स्वत: चारा देऊ लागले.

नातवाचे हे गो-प्रेम साहजिकच आजोबांच्याही कौतुकाचा विषय होता. यामुळेच कोकणात सिंधुदुर्गात गो-शाळा बांधावी असे खा. नारायण राणे यांनी ठरवले आणि करंजे गावी या गोशाळा प्रकल्पाने आकार घेतला आहे. गो-शाळा प्रकल्पाची २३ एकर जागेत उभारणी करताना खा. नारायण राणे यांनी नेहमीप्रमाणे फारच अभ्यास करून त्याची उभारणी केली आहे. एखादा प्रकल्प खा. नारायण राणे उभा करतात. तेव्हा त्याची भव्यदिव्यता तर असतेच; परंतु त्यातही इतरांपेक्षा वेगळे निर्माण करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहतो. गोशाळा उभारत असताना त्या गोशाळेत सर्व प्रकारच्या जातींच्या गाई आणण्यात आल्या आहेत. १०० गाई आणण्यात आल्या आहेत. गाईंच्या दूधापासून दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती व्हावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग या प्रकल्पात करण्यात आला आहे. गिरगाय तर आहेच; परंतु त्याचबरोबर देवळी जातीच्या, आपल्याकडील गाईच्या वासरां एवढ्याच वाटणाऱ्या पुंगनूर जातीच्या, उंचीने कमी असलेल्या गाई या गो-शाळेत केव्हाच्याच दाखल झाल्या आहेत. दिसायला अतिशय देखण्या असलेल्या गाईंचे आकर्षण सर्वांनाच आहे. ज्या गाई आजवर कधी पाहताही आल्या नाहीत. त्या गाईंचे दर्शन करंजेतील या गो-शाळेत होणार आहे.

करंजे माळरानावर खऱ्या अर्थाने खा. नारायण राणे यांनी नंदनवन उभं केले आहे. २३ एकरच्या या जागेत प्रवेशद्वारापासूनच राणेंच्या कल्पकतेची जाणीव होऊन जाते. गो-शाळेत एक सुबक प्रसन्न वाटावे अशी श्रीकृष्णाची मूर्ती आहे, गो-शाळेतील गाईंच्या राहण्याची खाणपाण्याची व्यवस्थाही तशीच आहे. या मुक्या जनावरांना कोकणातील हवामानाचा कोणताही त्रास होऊ नये याची पूरेपूर काळजी या प्रकल्पात घेतलेली दिसते. गेल्या काही वर्षांत कोकणात गाई, म्हैशी पाळण्याचे प्रमाण ग्रामीण भागातील अनेक गावांतून कमी होत आहे. पूर्वी कोकणातील प्रत्येक घरांच्या पुढे अथवा मागे गुरांचे गोठे असायचे. गोठ्यांमध्ये चार-पाच गाई, बैल जोडी, एक-दोन म्हैशी असायच्या. गुरांच्या शेणातून शेतीला लागणारं शेणखत, गोबरगॅसचा वापर व्हायचा. गुरांच्या संगोपनात इथला शेतकरी रमलेला असायचा. आज कोकणात काही भागात दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न शेतकरी करत आहेत, तर अनेकांच्या घरांशेजारील गोठे असेच आहेत. गेल्या दहा वर्षांत गावो-गावचे हे विदारक पण सत्य आहे. भाकड जनावरांचा प्रश्न गंभीर आहेच.

भाकड गाईंच संगोपन करण्याचा प्रयत्नही या गोवर्धन गो-शाळेतून होणार आहे. करंजे गावातील या गो शाळेच्या परिसरात शेळी, मेंढी पालनाचा प्रकल्पही आहे. या गो-शाळा प्रकल्पात इथे असलेल्या गाईंचे दूध, तूप आणि दूधापासून तयार होणारे पदार्थ इथेच तयार व्हावेत. हा देखील उद्देश ठेवून या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्रक्रिया उद्योगाची उभारणीही आहे. या प्रकल्पात टप्पा-टप्प्याने अनेक गोष्टी घडणार आहेत. अलीकडे कोणत्याही प्रकल्पाची उभारणी करताना आकर्षक वाटण्यासाठी काँक्रीटचे जंगल निर्माण केले जाते; परंतु इथे तर कोकणचे कोकणपण टिकून राहण्यासाठी आंबा, काजू, कोकम, जांभूळ या बरोबरच उंबर, वड, पिंपळ, रुद्राक्ष ही झाड देखील इथे असणार आहेत. वृक्षप्रेमी असलेल्या खा. नारायण राणे यांनी आजकाल दुर्मीळ होत चाललेल्या अनेक वृक्षांना या परिसरात आणून उभं करण्याचा प्रयत्न केला आहे. गाईंना लागणारा ओला चाराही इथेच निर्माण केला जात आहे. पारिजात, शेवंती, आबोली अशी अनेक फुलझाडं या परिसराच्या सौंदर्यात भर घालणारी आहेत. करंजे गावाच्या समोरच सह्याद्रीचा उंचकडा आहे. त्यामुळे इथले सृष्टी सौंदर्य या प्रकल्पाने अधिक देखणे होणार आहे. हा प्रकल्प म्हणजे गो-शाळे पुरता मर्यादित राहत नाही, तर केवळ सिंधुदुर्गातील नव्हे तर कोकणातील एक निसर्ग पर्यटन स्थळ म्हणून निश्चितच नावारुपाला येईल यात कोणतीही शंका नाही.

आज शहरी वातावरणाने गुदमरलेली अनेक कुटुंब शांत, निवांतपणा शोधतात. तेव्हा त्यांच्यासाठी हा परिसर खास आकर्षक बनेल. कोणत्याही व्यक्तीकडे केवळ पैसा असून चालत नाही, त्यांच्या पैशांची श्रीमंती ही त्यांच्या-त्यांच्या पूरती मर्यादित राहते. समाजाला त्याचा आदर्श घ्यावा असे काही नसते; परंतु खा. नारायण राणे यांनी आजवर स्वप्नवत वाटणारे अनेक प्रकल्प आणले उभे केले. व्यवसायाच्या,रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. राणेंवर नेहमीच टीका करणाऱ्यांकडे सांगण्यासारखे, समाजाला दाखवावे असे काहीही उभे करता आलेले नाही. ही वास्तवता कोकणातील जनतेलाही माहीत आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही भागात राणे हा प्रकल्प उभा करू शकले असते; परंतु कोकण हा खा. नारायण राणे यांचा विकपाॅइंट आहे. कोकण म्हटलं की ते त्यावर भरभरून बोलतात आणि अनेकवेळा आपलेपणाच्या भावनेने भावूकही होतात. कोकणातील अनेकांनी विविध व्यवसायांत पुढे यावे हाच त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. करंजे गावी गोवर्धन गोशाळेचा प्रकल्प उभा करतानाही त्यांना वाटत.

कोकणातील जनतेने यातून प्रेरणा घेऊन या व्यवसायाकडे वळावे. हाच त्यामागचा उद्देश आहे. खा. नारायण राणे यांनी आजवर स्वत:ची पाऊलवाट नव्हे, तर समाजाला मार्गदर्शन होईल असा नवा मार्ग निर्माण करत राहिले आहेत. करंजे गावातील गोवर्धन गोशाळेच्या निर्मितील एक वेगळी किनार आहे. नातू अभिराज निलेश राणे यांच्या संकल्पना आणि आजोबांनी म्हणजे खा. नारायण राणे यांनी ही संकल्पना सत्यात उतरवण्याची स्वप्नपूर्ती केली आहे. असेच म्हणावे लागेल !

Comments
Add Comment