विशेष
लता गुठे
लोक वाङ्मयातील प्रयोगसिद्ध रूपे आणि पारंपरिकता यांचा खूप जवळचा संबंध असतो, ग्रामीण संस्कृतीमध्ये लोकदैवत संप्रदायाला जेव्हापासून महत्व प्राप्त झाले. त्या देवतांना प्रसन्न करण्यासाठी विधीनाट्याची संकल्पना उदयाला आली. आदीम काळापासून जेव्हा माणसांचा समूह जंगलामध्ये राहत होता नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करण्यासाठी निसर्ग देवतेच्या पूजाअर्चा तो करू लागला. पुढे लोक समूहाने राहू लागले. त्याचे रूपांतर गावांमध्ये झाले. गावाचे रक्षण करण्यासाठी मूर्तीपूजा उदयाला आली, यामध्ये शक्ती आणि शिवाची पूजा, प्रकृती आणि पुरुषाची पूजा अनेक लोकविधींमधून शतकानू शतके चालू आहे. आजही आपल्याकडे देवीला खंडोबाला प्रसन्न करण्यासाठी ‘जागरण’, ‘गोंधळ’ हे विधीनाट्य केले जाते. ज्यांचे खंडोबा आणि रेणुका माता कुलदैवत आहेत ते मुलाचा विवाह झाल्यानंतर नवीन सून घरात येते त्या वेळेला त्यांची संसारवेल वाढावी यासाठी नवोदित दांपत्याच्या हातून जागरण गोंधळाची पूजा केली जाते. ही देवतांची पूजा अनेक विधी विधानातून करण्याची प्रथा पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेली आहे. यामध्ये गीत, नृत्य, नाट्य, संगीत, आदि कलांचा समावेश असतो. जागरणात गोंधळात वाघे मुरळी पूजा मांडून त्यासमोर मल्हारी देवाचं आख्यान लावतात. तसेच म्हाळसा आणि बानुबाई यावर आधारित असलेले गीते सादर करतात. वाघ्या वाद्य वाजवतो आणि मुरळी हातामध्ये घंटा घेऊन त्याच्या तालावर नाचते.
या विधी नाट्यांमध्ये जागरणाबरोबरच देवतेची प्रतिष्ठापना करतात. देवतेला आवाहन करतात तिचा प्रतिकात्मक संचार आणि निर्गमन या गोष्टी अंतर्भूत असतात. याचबरोबर गण, नमन, स्तवन, आवाहन, गवळणी, पदे, कथा, आरती आणि लंगर तोडीचा विधी हा गोंधळ जागरणासाठी विधीनाटकाचा अविष्कार क्रम असतो. यामध्ये घाटी, डिमडी, तुंतूने, मंजिरी म्हणजे (मोठा टाळ) या वाद्यांच्या साथीने जागरण सादर होते. तर संबळ, तुंतुने, मंजिरी, डफ आदि वाद्यांच्या साथीने गोंधळ सादर होतो. भराड हे विधीनाट्य डमरूच्या तालात सादर होते. तंतूवाद्य स्वरांची साथ करते, तर डमरू संबळ, दिमडी, डफ यासारखे वाद्य तालाची साथ करतात. यातून मनोरंजनही होते आणि मानसिक समाधानही मिळते. महाराष्ट्रातील लोकदैवत संप्रदाय आणि भक्ती संप्रदाय गुण्यागोविंदाने नांदले. हे विधीनाट्यातून पाहायला मिळते. खंडेरायाच्या म्हाळसा आणि बानू या दोन पत्नी त्यांची समस्या खालील ओवीमधून समोर येते...
खंडेराया तुला कसा घ्यावा वाटून
एक भाकरी त्याचे तुकडे केले दोन
असे वर्णन असलेली गाणी विधीनाट्यांमध्ये गायली जातात. गोंधळी एकाच वेळी गायन, निरूपक, कथेतील प्रमुख पात्र अशा भूमिका प्रभावीपणे सादर करत असतो. ‘जांभूळ आख्यान’ हा विधीनाट्याचा एक प्रकार मानला जातो. जांभूळ आख्यान नावाचे आख्यान परभणीचे गोंधळी महर्षी राजाराम भाऊ सादर करायचे, तेव्हा ते एकाच वेळी मुख्य गायकाची भूमिका करत असताना निरुपक व जांभूळ आख्यानातील द्रोपदी, कृष्ण आदी पात्रे साकार करायचे. अशाप्रकारे विविध प्रांतामध्ये अनेक लोककलाकार अशा प्रकारचे विधीनाट्य सादर करतात. तसेच महाराष्ट्रातील कोकणामध्ये दशावतार हे विधी नाट्य सादर केले जाते. दशावतार हे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रचलित लोकनाट्यप्रकार आहे. यात विष्णूच्या दशावतारांचे सादरीकरण करतात. यामध्ये संधिप्रकाश, देवपूजन आणि नाट्य यांचा समावेश असल्याने ते विधीनाट्य ठरते.
आदिवासी भागांमध्येही अनेक प्रकारचे विधीनाट्य पाहायला मिळतात. यामध्ये पालघर, ठाणे, जिल्ह्यातील आदिवासींचे समूह विधी व कौटुंबिक विधी म्हणजे वाघदेवाची वाघ्या पूजा, गावदेवी पूजामध्ये अनेक प्रकारची नृत्य सादर करतात. त्यामध्ये वाद्य वाजवून सामुदायिक नृत्य सादर करण्यासाठी बोहडा, तारपा, मादळ, ढोल, नृत्य टिपरीनृत्य यांचाही सामूहिक विधीनाट्याचे प्रकार पाहायला मिळतात. भारतातील वेगवेगळ्या राज्यांमध्येही विधीनाट्य भारतीय त्या त्या प्रदेशातील संस्कृतीनुसार विधीनाट्य सादर करण्याची प्रथा आहे. विधीनाट्य म्हणजे केवळ नाट्यप्रकार नव्हे, तर तो एक धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक अनुभव आहे. या नाट्यप्रकारांचा उगम धर्मकथांमध्ये, लोकश्रद्धांमध्ये व निसर्गपूजेच्या परंपरेत आहे. भारतात प्रत्येक प्रांतात त्याच्या विशेष धार्मिक व सांस्कृतिक सत्त्वामुळे वेगवेगळे विधी नाट्यप्रकार विकसित झालेले आहेत.
केरळमध्ये कथकली, थेय्यम आणि कूडियाट्टम कथकली हे पारंपरिक नाट्यप्रकार असून याचे मूळ धार्मिक विधींमध्ये आहे. यात महाभारत व रामायणातील कथा रंगमंचावर प्रकट केल्या जातात. यात अतिशय समृद्ध रंगभूषा, हस्तमुद्रा, पदन्यास आणि भावाभिनय यांचा समावेश असतो. तामिळनाडूमध्ये तेरू कोठू आणि कोथू हे विधी नाट्याचे प्रकार आहेत. तेरू कोठु हा तमिळनाडूमधील एक विधीनाट्य प्रकार आहे. यात देवी-देवतांच्या कथा रस्त्यांवर मोठ्या जनसमूहासमोर सादर केल्या जातात. रामायण, महाभारत आणि स्थानिक पुराणे यावर आधारित कथा यामध्ये प्रमुख असतात. दक्षिण कर्नाटकामध्ये-यक्षगान हे विधिनाट्य प्रसिद्ध आहे. यामध्ये भव्य पोशाख, ड्रमसंगीत (चेंडे व मृदंग) आणि कथाकथन यांचा मिलाफ असतो. रात्रीच्या वेळेस, अनेक तास चालणारे हे नाट्य धार्मिक विधीप्रमाणे सादर केले जाते. विधीनाट्याचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे...भारतातील विविध प्रांतांतील विधीनाट्य परंपरा हा केवळ नाट्याचा प्रकार नसून संपूर्ण लोकजीवनाचा भाग आहे. यातून श्रद्धा, परंपरा, लोककथा व सांस्कृतिक अभिव्यक्ती यांचे दर्शन घडते. या परंपरांची जपणूक करणे म्हणजे आपली सांस्कृतिक समृद्धी टिकवणे होय.