Saturday, May 10, 2025

कोलाज

... झाडे भरात आली!

... झाडे भरात आली!

नॉस्टॅल्जिया श्रीनिवास बेलसरे

तारुण्यातील पहिले प्रेम अनावर असते. तरी ही भावना पूर्वी लज्जेशी, संकोचाशी, संयमाशी जोडलेली होती. त्यामुळे प्रियाराधन, प्रियकर-प्रेयसीची पहिली भेट, प्रेमसंवाद या गोष्टी सहजसाध्य नव्हत्या. एकांत आणि प्रणय तर खूप दूरच्या गोष्टी! त्यामुळे या सर्वांची केवढी अपूर्वाई असायची! खूप तहान लागल्यावर अनपेक्षितपणे थंडगार पाणी मिळाले तर जितका आनंद होतो तितकाच उत्कट आनंद आधी वंचना आणि अनेक अडचणींनंतर सफलता मिळालेल्या प्रेमाचा असायचा. त्या प्रेमाची लज्जत काही औरच असायची. कदाचित त्यामुळेच ते प्रेम खूप टिकावू असायचे. ते प्रेम आयुष्यभर मनाच्या गाभाऱ्यात तेवत राहणारा अनुभव बनायचे, मग ते सफल होवो की शेवटी कायमच्या ताटातूटीत संपो!

हल्लीसारखे तेव्हाचे प्रेम “हेलो आय अॅम अमुकअमुक” ने सुरू होऊन, काही महिन्यांतच “वेल, नाऊ वी मस्ट अॅडमीट, वी कांट गेट अलाँग, इट्स टाईम फॉर ब्रेकअप!” अशा सवयीच्या कोरड्या निरोपाने संपत नसायचे! कारण आवडलेल्या व्यक्तीपुढे प्रेमाचा प्रस्ताव मांडायला, तो दुसऱ्या बाजूने स्वीकारला जायलाच कितीतरी वेळ लागलेला असायचा. तोवर दोघांच्या मनात केवढे तरी विचार येऊन गेलेले असायचे. परस्परांच्या मनात भेटीची ओढ असायची, एकटेपणाची घालमेल आणि पुढच्या संभाव्य रोमांचक क्षणांची एकेकट्यानेच पाहिलेली रम्य स्वप्ने असत. मनात तिच्या किंवा त्याच्याविषयी एक अतर्क्य आकर्षण रुजलेले असायचे. प्रत्यक्ष भेट व्हायच्या आधीच त्या व्यक्तीत केवढी तरी भावनिक गुंतवणूक व्हायची. ती सोडणे जवळजवळ अशक्यच असायचे. आयुष्यात पुढे कायमचे वेगवेगळ्या वाटेने जावे लागले तरी त्या आठवणी कधीच विसरल्या जात नसत. मंगेश पाडगावकर हे अशा तरल भावना अत्यंत नाजूकपणे सजवणारे रोमँटिक कवी! त्यांची प्रेयसीच्या अशाच भेटीवरची एक कविता आहे. यशवंत देवांनी संगीत देऊन तिचे एक सुंदर भावगीत केले. देवांनी कवितेतील रोमान्सपेक्षा कदाचित तिच्यातली सूचक, संयत अभिव्यक्ती महत्त्वाची वाटली असेल म्हणून त्यांनी अतिशय पातळ आवाज असलेल्या अरुण दातेंची निवड केली असावी. पावसाळ्यातल्या धुंद वादळी वातावरणात झालेल्या त्या रोमांचक भेटीचे वर्णन पाडगावकर कसे करतात पाहा-

जेव्हा तिची नी माझी चोरून भेट झाली, झाली फुले-कळ्यांची, झाडे भरात आली! जेव्हा तिची नी माझी... यशवंत देवानी अरुणजींना ध्रुवपदानंतर जे “हं हं हं हं” करायला लावले आहे त्यामुळे गाण्याची लज्जत अजूनच वाढली. या नुसत्या मुग्ध “हं हं हं हं.”मुळे गाण्यातील प्रियकर या भेटीनंतर किती खूश आहे ते श्रोत्यापर्यंत सहज पोहोचते! मग नकळत तोही गाणे गुणगुणू लागतो. हे सामर्थ्य असते संगीतकाराचे! मंगेशजींचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते चित्रमय शैलीत लिहायचे. त्यांची लेखणी एक कुंचला बनून वाचकाच्या मनाच्या भव्य कॅनव्हासवर वावरू लागते तेव्हा ते किती विविधरंगी आकार, आभास चितारतात, अतिशय मोहक असे विभ्रम निर्माण करतात. बाह्य मनाला ते नेहमी कळतेच असे नाही. मात्र त्यांचा केवढातरी प्रभाव रसिकाच्या सुप्त मनावर पडून जातो! आणि तोही कवीच्या अनुभवात गुंततो. गीताच्या पुढच्या ओळी कसा चित्रमय आभास निर्माण करतात पाहा...

दूरातल्या दिव्यांचे मणिहार मांडलेले, पाण्यात चांदण्याचे आभाळ सांडलेले. कैफात काजव्यांची, अन पालखी निघाली, झाली फुले कळ्यांची, झाडे भरात आली. जेव्हा तिची नी माझी...

म्हणजे जणू या भेटीमुळे कवीच्या मनात तिला भेट द्यायच्या मणीहाराचे नियोजनही सुरू झाले की काय? पण तो तसे थेट म्हणत नाही. उलट आजूबाजूच्या भोवतालचे वर्णन करून अगदी अस्पष्टपणे तेच सूचित करतो आहे असे वाटत रहाते. तसे कवीच्या भावविश्वात काय काहीही अशक्य नसतेच! मग एखादे वादळ येऊन गेल्यावर जशी प्रचंड पडझड झालेली असते तसे दोघांचे सगळे भावविश्व त्या भेटीने किती हादरले होते ते दर्शवण्यासाठी पावसाच्या साठलेल्या पाण्यात आपल्याला चक्क चांदण्यांचे आकाश सांडलेले दिसते.

आता पाऊस थांबलाय, सगळा आसमंत स्तब्ध आहे आणि त्यात काजव्यांचा एक थवा हळूहळू उडत चाललाय. त्याला पाडगावकर जणू सावकाश जाणाऱ्या राणीच्या पालखीची उपमा देतात. वर हेही सांगतात की तिच्या नि माझ्या भेटीचा आजूबाजूच्या झाडांनाही इतका आनंद झाला की त्यांच्या कळ्यांना त्यांनी लगेच उमलायला लावले. कळ्यांची क्षणार्धात फुले झाली कारण आमच्या प्रेमाच्या पावसात झाडेसुद्धा बेभान झाली होती. पाडगावकर म्हणजे हा असा कहर असतो, शब्दांचा, कल्पनांचा, प्रतिमांचा आणि आभासांचा! तो अनुभव लौकिकाचा कोणताही विचार न करता कवीबरोबर स्वत:ला झोकून देऊन घ्यायचा असतो.

वादळी सायंकाळी झालेली ही भेट. पावसाच्या पाण्यात सांडलेले आभाळ आणि काजव्यांची पालखी नुकतीच येऊन गेलेली! सगळीकडे अंधारून आलेले. त्या अंधारात कवीच्या मनात दरवळत राहतो तो तिच्या केसातील जुईच्या फुलांचा गंध! अहाहा! कवीची प्रेयसीशी झालेली ही भेट इतकी आवेगी आणि बेधुंद होती की दोघांच्या श्वासांची लयसुद्धा तीव्र झाली. दोघांनी जणू त्या मिठीत एकमेकाला समर्पितच करून टाकले. मनातील इच्छा, आकांक्षा, अभिलाषा, भावभावनांच्या कळ्या त्या आवेगी अलिंगमनात पूर्ण फुलल्या. अर्धोन्मीलित कळ्यांची प्रसन्न, कृथार्थ फुले झाली.

केसांतल्या जुईचा तिमीरास गंध होता, श्वासातल्या लयीचा आवेग अंध होता. वेड्या समर्पणाची वेडी मिठी मिळाली, झाली फुले कळ्यांची, झाडे भरात आली. जेव्हा तिची नी माझी...

दोघे भेटीसाठी, कितीतरी गोष्टी एकमेकांना सांगण्यासाठी, आतुर झाले होते, पण त्यांच्यात काही संवाद झालाच नाही. एक गूढ मौनच पूर्ण तृप्ती देऊन गेले. कारण नुसत्या स्पर्शाने झालेला तो उत्कट संवाद किती सुखद होता, अवर्णनीय होता. जणू त्यावेळी लाखो ताऱ्यांचे चांदणे चमचमू लागले होते, आतही आणि बाहेरही! काळाची टिकटिक स्तब्ध झाली, तो थांबलाच आणि दोघांना फुलांच्या एका ताटव्याने झाकून टाकले.

नव्हतेच शब्द तेव्हा, मौनात अर्थ सारे. स्पर्शात चंद्र होता, स्पर्शात लाख तारे. ओथंबला फुलांनी अवकाश भोवताली, झाली फुले कळ्यांची, झाडे भरात आली. जेव्हा तिची नी माझी...

जर तारुण्यातील भावनांची उत्कटता, ओढ, तहान, अतृप्ती, नॉस्टॅल्जिक हुरहूर पुन्हा अनुभवायची असेल, तर मंगेश पाडगावकर या कवीला पर्याय नाही!

Comments
Add Comment