
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. नारायण राणे, ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ना. नितेश राणे, आ. निलेश राणे यांच्यासह अनेक मान्यवर राहणार उपस्थित
कणकवली : करंजेच्या माळरानावर उभे झालेले नंदनवन म्हणजे कै. तातु सिताराम राणे ट्रस्ट संचलीत गोवर्धन गोशाळा! या गोशाळेचा दिमाखदार शुभारंभ रविवारी ११ मे रोजी होत आहे. या पार्श्वभुमीवर दुपारी १ वाजता विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आ. निलेश राणे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व मंत्रीगण उपस्थित राहणार आहेत.
गोवर्धन गोशाळेच्या परिसरातच हेलीपॅडही उभे करण्यात आले असून सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. हिरव्या वनराईने नटलेल्या, निसर्गरम्य करंजे गावात सुमारे ७० एकर जागेत ही अत्याधुनिक ‘गो-शाळा’ उभारण्यात आली असून त्यामध्ये गीर, साहीवाल, देवणी, पुंगनूर आदी भारतातील व महाराष्ट्रातील विविध जातींच्या तसेच खिल्लार, स्थानिक कोकण कपिला अशा विविध गाई ठेवण्यात आल्या आहेत. या गोशाळेत दूधापासून विविध पदार्थ, उत्पादने, तयार करण्यात तसेच त्याची विक्री करण्यात येणार आहे. तसेच गोमूत्रा पासून औषधे व खत, गोबरगॅस, आणि रंग तयार करण्यात येणार आहेत.
गो शाळेसोबतच शेळी -मेंढी पालन,कुक्कुटपालन प्रकल्प सुरु करण्यात येत आहेत. या प्रकल्पामुळे करंजे व आसपासच्या गावांतील तरुण -तरुणीना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेलच, शिवाय या ठिकाणी पशुपालन,दुग्ध व्यवसाय, शेळी -मेंढी पालन, कुक्कुट पालन खत निर्मिती,दुग्धजन्य पदार्थ निर्मिती आदी विषयावर विविध चर्चासत्रे, अभ्यास शिबीरे, कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये तज्ञांमार्फत मार्गदर्शनही केले जाणार आहे. या शाळेच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन रविवारी होणार आहे. गो- शाळेला जोडूनच भाकड गाई सांभाळण्यासाठी एक भव्य शेड उभारण्यात येत आहे.
या गोशाळेच्या उद्घाटन सोहळ्याला जिल्हावासीयांनी उपस्थित राहावे, असे आवाहन राणे परिवाराच्या वतीने खा. नारायण राणे , सौ. निलमताई राणे, सौ. प्रियांका राणे, सौ. ऋतुजा राणे, कु. अभिराज निलेश राणे, कु. निमिश नितेश राणे यांनी केले आहे.