
मनस्विनी : पूर्णिमा शिंदे
उकाडा काही केल्या कमी होईना! कधी एकदाचा संपणार आहे? जीव कासावीस झालाय. पाणी पाणी करतोय. अंगाची काहीली होते. कधी संपेल हा उन्हाळा? असे म्हणताच पावसाची पहिली सर आलीच. उन्हाळा संपताक्षणी सुरू होणारा पहिला पाऊस. सर्वांना हायसं करणारा आपला आवडता ऋतू पावसाळा. गरमीची घामाघुम रखरखत्या उन्हाला क्षणार्धात गारवा देणारा पाऊस! तोही पहिला मातीचा सुगंध सुवास मृदंग आनंदी उल्हासित करणारा रोमांचित करणारा. आपण सारेच पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. बळीराजाचे तसेच आहे पुन्हा पुन्हा आकाशाकडे वाट बघत आभाळ भरून आल्यावर अचानक वातावरणात झालेला बदल पाहून खूप छान वाटते. गार वारा सुटतो. पावसाची रिमझिम सुरू होते. टपोऱ्या थेंबातून सरीच वाहू लागतात आणि गाराही पडू लागतात. ढगांचा गडगडाट होतो. सारं काही अचानक झाल्यामुळे वातावरणात होणारा जो बदल आहे तो अतिशय सुंदर रमणीय आणि निसर्गप्रेमींना तर आनंददायीच वाटतो. म्हातारी ढगात हरभरे दळतीये असे म्हणतात. कारण तो ढगांच्या गडगडाटांसह विजेचा कडकडाट सुरू असतो. या गंमतीजंमती होत असतात. डोळ्यांना सुखावणारा हिरवा रंग आणि मनाला भुरळ पडणारा मातीचा सुवास मृदगंध किती सुंदर! कोणत्याही अत्तराला लाजवेल असा! अनमोल असतो. तापलेल्या जमिनीवर थंडगार वर्षावातून पावसाच्या सरींनी जणू काही जमीन न्हाऊन निघते. रखरखीत जमीन उन्हात दरवर्षी आसुसलेली असते ती न्हाऊन निघण्यासाठी. पक्षी, प्राणी, फुले, वेली, झाडं, रस्ते, नद्या, डोंगर, नाले इतकंच काय तर माणसं सुद्धा पहिल्या पावसात मनसोक्त ओलेचिंब, बेभान होऊन भिजतात, नाचतात, बागडतात. ‘नेमेची येतो पावसाळा’ म्हणतोच. दरवर्षी सालाबादप्रमाणे पाऊस असतोच. आपणही आपल्या लहानपणी, ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. हे गाणं खूप आवडीने म्हणायचो. या कवितेच आणि पाऊस यांचे सुंदर नातं आहे. पावसाचे दिवस सुरू झाले की, खूप आनंद वाटतो. छत्र्या, रेनकोट विकत घेण्याची लगबग सुरू होते. पण त्याआधी मनसोक्त भिजून. अनुभव घेऊया. मनामध्ये आठवण म्हणून जपून ठेवूया पहिला पाऊस! जाऊ दे ना डॉक्टरांना निमंत्रण. मोठा पाऊस पडला पाणी तुंबले, रस्ते भरले, शाळांना सुट्टी पडली, तरी थोडसं का होईना भिजल्याने काय होते पाहूया? बऱ्याचदा आपल्या हौसेने आपण धमाल करतो. निसर्गाच्या या नवलाईची खरच कमाल आहे. उन्हाळ्याच्या कासावीस झालेल्या उष्म्याने जीवघेणी तहानलेली सृष्टी कशी गार गार होते. हिरवी नवी नवरी जशी दिसते. सृष्टीची किमयाच न्यारी आहे. पावसाचे आगमन होताच एक गोड आवाजाचा पक्षी ‘पावशा’ सुद्धा किती सुंदर शीळ घालतो. रानामध्ये असा हा एकूणच निसर्ग पर्यावरण आणि सृष्टीला सजवणारा आहे. पहिला पाऊस अंगणातला असो की मनातला. पण आनंदी, उल्हासित आणि रोमांचित करतोच करतो. निसर्ग कवी ना. धो. महानोर यांची सुंदर रचना आठवतेय ना, घन ओथंबून येती.