
पुणे : देशातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाउंटंट) अभ्यासक्रमाची परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यात ९ ते १४ मे या कालावधीत होणाऱ्या सीए अंतिम, इंटरमिजिएट, पोस्ट क्वॉलिफिकेशन कोर्स या परीक्षांचा समावेश आहे. आयसीएआयने प्रसिद्धिपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली.
आयसीएआयने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २ ते १४ मे या कालावधीत परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यात इंटरमिजिएट परीक्षेत गट-१ ची परीक्षा ३, ५ आणि ७ मे रोजी, तर गट-२ मधील परीक्षा ९, ११ आणि १४ मे रोजी होणार होती. तसेच, अंतिम परीक्षेतील गट-१ मधील परीक्षा २, ४ आणि ६ मे रोजी, तर गट-२ मधील परीक्षा ८, १० आणि २३ मे रोजी घेण्याचे नियोजन होते; परंतु देशात उद्भवलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबतची काळजी यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर परीक्षा घेतल्या जातील. नव्याने वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.