
महाभारतातील मोतीकण भालचंद्र ठोंबरे
श्रीमद् भागवत पुराणानुसार द्विविदा नामक एका वानराची कथा आहे. त्रेतायुगात रामायणातील सुग्रीवाच्या सेनेतील मैंदा नावाच्या वानराचा हा विशालकाय व महाबलाढ्य भाऊ होता. त्याच्या अंगी दहा हजार हत्तीचे सामर्थ्य होते. अर्थातच राम रावण युद्धात त्याचेही अमूल्य योगदान होते. लक्ष्मणाकडून आपल्याला मरण यावे अशी त्याची इच्छा होती. पुढे द्वापार युगात तो नरकासुराचा मित्र होता. भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केल्याने त्याने यादवांविरुद्ध संघर्षाची भूमिका घेऊन यादवांविरुद्ध यादव नगरीत धुमाकूळ घातला.
वृक्ष उखडवून टाकले, नदींची पात्रे वळविणे, मोठ्या शिळा व टेकड्या खचवून पायथ्याशी असणारी खेडी उद्ध्वस्त करणे, कधी कधी सागरामध्ये उड्या मारून अथवा हाताने सागरातील पाणी भूमीवर फेकून पूर समान परिस्थिती निर्माण करून तीरावरील खेडी उद्ध्वस्त करणे आदी कृत्ये केली. ऋषीमुनींच्या आश्रमातील यज्ञकुंडात मलमूत्र टाकून ते अपवित्र करणे, स्त्रिया पुरुष ऋषीमुनी आदींना डोंगराच्या गुहेत टाकून गुहेच्या तोंडावर मोठ्या शिळा ठेवून त्यांची तोंडे बंद करून त्यांचे प्राण घेणे, आदी भयानक कृत्येही तो करीत असे.
एके दिवशी तो रैवत पर्वतावर गेला. त्या ठिकाणी बलराम रेवती व असंख्य यादव स्त्री-पुरुष आनंद उत्सव साजरा करीत होते. तेथे या द्विविदाने आपल्या मर्कट लिला सुरू केल्या. तसेच यादव स्त्रियांकडे दगड धोंडे फेकून विकृत हास्य करू लागला. त्याने बलरामाचा मधु कलश पळविला व बलरामाची कुचेष्टा करू लागला. द्विविदाने प्रदेशाची केलेली नासधूस तसेच यादव स्त्री-पुरुषांची केलेली कुचेष्टा पाहून बलरामने आपला नांगर व मुसळ त्याच्यावर उगारले. द्विविदाने एक मोठा वृक्ष उपटून बलरामाच्या डोक्यावर मारला.
बलरामाने तो प्रहार सहन करून द्विविदावर मुसळाचा प्रहार केला. त्यामुळे त्याचे डोके फुटून रक्त निघू लागले. मात्र त्याची पर्वा न करता हा महाकाय वानर मोठे मोठे वृक्ष उपटून बलरामावर फेकू लागला. मोठमोठ्या शिळाचेही प्रहार त्याने बलरामावर केले. मात्र बलरामने त्या सर्वांचा चकनाचूर केला. द्विविदाने आपल्या लांब हाताने बलरामाच्या छातीवर प्रहार केला. तेव्हा बलराम व द्विविदामध्ये मुष्टीयुद्ध झाले. दोघांनीही एकमेकांवर वार प्रति वार केले.
अखेर बलरामने द्विविदाच्या मानेवर प्रहार करताच तो वानर मरण पावला. त्याच्या जमिनीवर पडण्यामुळे तो पर्वत, वृक्ष व मोठ्या शीलाखंडासहीत कंपायमान झाला. यादवांना सळो की पळो करणाऱ्या द्विविदाचा बलरामाने वध करताच यादवांसह सर्व देवतांनाही आनंद झाला. भागवतातील ही कथा चांगले व वाईट यामधील संघर्षाचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे विकृत मनोवृत्तीने ग्रासीत व्यक्ती समाजाला कशा घातक ठरू शकतात याचेही हे उदाहरण आहे. म्हणूनच ही कथा सदगुणांचा दुर्गुणावरील विजयाचे प्रतीक मानले जाते.