
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या अपप्रचाराची अर्थात फेक नरेटिव्हची भारताने पत्रकार परिषदेतून पोलखोल केली. पाकिस्तानकडून सतत भारतातील विविध ठिकाणांवर हल्ले करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सूरतगडमधील एस-४०० प्रणाली, नगरोदाचा ब्राह्मोस तळ, देहरागिनीचा तोफखान, चंदिगडमध्ये असलेला दारुगोळा हे नष्ट करण्यासाठी केलेले हवाई हल्ले यशस्वी झाल्याचा दावा पाकिस्तानने केला. प्रत्यक्षात भारताचे असे कोणतेही नुकसान झालेले नाही. भारताने या ठिकाणांचे वेळ आणि तारखेंची नोंद असलेले निवडक फोटो दाखवून पाकिस्तानचा प्रचार खोटा असल्याचे सिद्ध केले.
पाकिस्तानकडून हवाई हल्ल्यांचा प्रयत्न होत आहे तसेच सीमेपलिकडून पाकिस्तानन भारतातील गावांवर आणि सुरक्षा पथकांवर सातत्याने गोळीबार आणि तोफांचा मारा करत आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात सीमेजवळच्या गावांमधील अनेक घरांचे आणि दुकानांचे नुकसान झाले. पण पाकिस्तान ७ मे २०२५ पासून १० मे २०२५ च्या दुपारपर्यंतच्या काळात भारताचे हवाई हल्ल्यांद्वारे मोठे नुकसान करू शकलेला नाही. पाकिस्तानने ९ - १० मेदरम्यान रात्री यू-कॅप ड्रोनसह लढाऊ विमानं आणि रॉकेट, क्षेपणास्त्र यांच्याद्वारे भारतावर हल्ला केला. पाकिस्तानने भारतात २६ ठिकाणी हल्ला केला. पण भारताने पाकिस्तानचे २६ ठिकाणी केलेले हवाई हल्ले परतवून लावले.
पाकिस्तानच्या हल्ल्यात भारताचे मर्यादीत प्रमाणात नुकसान झाले. पण प्रामुख्याने हल्ले परतवण्यात भारत यशस्वी झाला. पाकिस्तानने १० मे रोजी मध्यरात्री १ वाजून ४० मिनिटांनी हाय स्पीड क्षेपणास्त्राद्वारे पंजाबच्या एका हवाई तळाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने श्रीनगर, उधमपूर, अवंतीपूरच्या हवाई दलाच्या तळांवर तसेच निवडक शाळांवर हवाई हल्ले केले. नागरी पायाभूत सुविधांवर हल्ले करुन पाकिस्तानने बेजबाबदार वर्तन केले. सीमेपलिकडून गोळीबार करतानाही पाकिस्तानचा भर भारतातील गावांना लक्ष्य करण्याकडे दिसत आहे. पाकिस्तान बेजबाबदार वर्तन करुन तणाव वाढवत आहे. पाकिस्तानच्या सैनिकांच्या सुरू असलेल्या हालचाली बघता सीमेपलिकडून संघर्षाची व्याप्ती वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसते, असेही भारताने पत्रकार परिषदेत सांगितले.