
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर
यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशविरोधातील युद्ध मानले जाईल, असे केंद्र सरकारने जाहीर केले आणि काही तासांतच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने भारत-पाकिस्तान शस्त्रसंधी झाल्याचे घोषीत केले. अमेरिकेने केलेल्या मध्यस्थीमुळेच दोन्ही देशांनी शस्त्रसंधी किंवा युद्धविराम मान्य केला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री मार्को रूबियो यांनी दोन्ही देशांच्या परराष्ट्रमंत्र्याशी चर्चा केली. त्यानंतर अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांनी शस्त्रसंधी करण्याचे मान्य केल्याचे एक्सवरून पोस्ट केली आणि दोन्ही देशांचे अभिनंदन केले. भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाल्याचे प्रथम अमेरिकेने जाहीर केले व नंतर भारताने त्याला दुजोरा दिला. दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाल्यानंतर भारताने हवाई, जमीन आणि सागरी मार्गावरून हल्ले थांबविण्यात येत असल्याचे जाहीर केले. मात्र दहशतवादाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जाहीर करून पाकिस्तानला शस्त्रसंधीनंतर सज्जड इशारा दिला आहे.
शस्त्रसंधी झाल्यामुळे दोन्ही देशांवर होणारे हल्ले थांबतील. गोळीबार, ड्रोन, क्षेपणास्त्रे यांचा वर्षाव थांबेल पण पाकिस्तानप्रेरीत दहशतवाद थांबेल काय? पहलगाम किंवा पुलवामा येथे निरपराध नागरीकांचे आणि सुरक्षा दलाचे जे भीषण हत्याकांड झाले, ते घडविणारे दहशतवादी कुठे गेले? त्यांना प्रशिक्षण कोणी दिले? त्यांना शस्त्रे व स्वयंचलित बंदुका कोणी दिल्या? त्यांना कोणी पाठवले? तुमचा धर्म कोणता हे विचारून हिंदू पर्यटकांना त्यांच्या परिवारासमोर पाँइंट ब्लँक गोळ्या घालून ठार करा असे त्यांना कोणी सांगितले? हत्याकांडानंतर त्यांना कोणी लपवले? त्यांना कोणी संरक्षण दिले? या प्रश्नांची उत्तरे शस्त्रसंधीनंतर मिळणार आहेत का? या प्रश्नांची उत्तरे देण्यास अमेरिका पाकिस्तानला भाग पाडणार आहे का? शस्त्रसंधीमुळे पाकिस्तान सुधारणार आहे का? त्याची हमी कोण घेणार? आणखी काही दिवस युद्ध चालले असते, तर भारताच्या ताकदवान व कुशल सेना दलापुढे पाकिस्तानची दाणादाण उडाली असती. अंतर्गत असंतोषामुळे पाकिस्तानचे आणखी तुकडे झाले असते. शस्त्रसंधीसाठी अमेरिकेने दोन्ही देशांवर दबाव आणला. दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला असताना आम्ही त्यात मधे पडणार नाही असे अमेरिका दोन दिवसांपूर्वी सांगत होती मग मध्यस्थी करावी असे अचानक काय घडले? शस्त्रसंधीचा लाभ नेमका कोणाला होणार? दहशतवाद चालूच राहणार असेल, तर शस्त्रसंधी कशासाठी व कोणासाठी?
भारतीय सैन्य दलाने गेल्या चार दिवसांत पाकिस्तानात घुसून दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आणि पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. दि.२२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी निसर्गाचा आनंद लुटायला आलेल्या २६ पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या. परिवारातील महिलांच्या समोर त्यांच्या पतींची हत्या केली. दहशतवाद्यांना हात जोडून आपल्या पतीला मारू नका अशी विनंती करणाऱ्या महिलांना, जाके मोदी से कह दो. असे त्यांनी बंदुका रोखून बजावले. काश्मीरच्या नंदनवनात परिवारासह गेलेल्या महिला आपल्या पतीचा मृतदेह घेऊन आपल्या घरी परतल्या. या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ७ मेच्या मध्यरात्रीनंतर ऑपरेशन सिंदूर मोहीम सुरू केली आणि पाकिस्तानात घुसून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. त्यात शंभरहून अधिक दहशतवादी ठार झाले. ऑपरेशन सिंदूर मोहीम राबविताना भारतीय सैन्य दलाने जगाला संदेश दिला की, सिव्हिलियन्स से कोई बैर नही, आतंकवादीयों की खैर नहीं.
पहलगाम हत्याकांडानंतर सर्व जगाला दिसून आले की पाकिस्तान व दहशतवादी यांचे नाते कसे जवळचे आहे. पाकिस्तान व दहशतवाद या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे भारताने अनेकदा जगापुढे पुराव्यांसह मांडले आहे. भारतात दहशतवाद घडविणाऱ्यांचा सूत्रधार मसूद अजहर याच्या नातेवाइकाच्या अंत्ययात्रेला पाकिस्तानमध्ये पोलीस आणि लष्करी अधिकारी गणवेशात उपस्थित राहतात, त्याला मानवंदना दिली जाते. दहशतवाद्यांच्या मृतदेहाला पाकिस्तानच्या झेंड्यात गुंडाळून त्याचा शासकीय इतमामाने अंत्यस्कार होतो, याच्या क्लिप्स् व फोटो भारताने जगापुढे मांडले आहेत. पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन दहशतवाद्यांच्या ब्रिगेड तयार होतात, त्यांना अाधुनिक शस्त्रांसह भारतात रक्तपात घडवायला पाठवले जाते आणि पाकिस्तानचे सरकार त्यांना संरक्षणही देते. हे वर्षांनुवर्षे चालूच आहे.
दहशतवादाची केवळ भारतालाच नव्हे, तर जगातील असंख्य देशांना झळ बसली आहे. सर्वसामान्य लोक शांततापूर्ण जीवन जगणे पसंत करतात, पण पाकिस्तानप्रेरीत दहशतवादाने भारतातील शांततेला आणि दैनंदिन जीवनाला वारंवार रक्ताचे डाग लावले आहेत. भारतात जाऊन बॉम्बस्फोट, रक्तपात-हत्याकांड घडविणारे दहशतवादी पाकिस्तानला आवडतात. कोणाचे आई-वडील, कोणाची मुले, कोणाचे नातेवाईक, तर कोणाचे शेजारी दहशतवादाला बळी पडले आहेत. बंदुका हातात घेऊन भारतातील असंख्य महिलांचे कुंकू पुसून टाकण्याचे काम दहशतवाद्यांनी केले आहे.
भारतावर पाकिस्तानप्रेरीत दहशतवादी हल्ले करणाऱ्यांमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटना प्रमुख आहेत. जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या दिल्लीतील संसद भवनात लष्करी गणवेशात घुसून १३ डिसेंबर २००१ रोजी दशतवाद्यांनी हल्ला केला होता. सन २००२ मध्ये अक्षरधाम मंदिरावर दहशतवादी हल्ला झाला. २६ नोव्हेंबर २००८ रोजी समुद्रमार्गे मुंबईवर येऊन दहशतवादी हल्ला करणारे पाकिस्तानीच होते. लष्कर-ए-तोयबाशी त्यांचा संबंध होता. दहशतवाद्यांनी मुंबईत केलेल्या गोळीबारात व घडविलेल्या बॉम्बस्फोटात १६६ निरपराध लोकांचे बळी गेले व तीनशेहून अधिक जखमी झाले. मुंबई पोलिसांनी अजमल कसाबला जिवंत पकडण्यात यश मिळवले. दहशतवादाचे प्रशिक्षण त्याला पाकिस्तानमध्येच मिळाले होते. पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा म्हणून भारताने त्याला जगाला दाखवले. सन २०१६ मध्ये उरी, २०१९ मध्ये पुलवामा आणि २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम हे पाकिस्तानप्रेरीत मोठे दहशतवादी हल्ले होते. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी १९९९ मध्ये कंधार येथून इंडियन एअर लाइन्सच्या विमानाचे अपहरण केले. विमानातील प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी त्यावेळी भारताच्या जेलमध्ये असलेल्या तीन खतरनाक दहशतवाद्यांची भारताला मुक्तता करावी लागली होती. पहलगाम हत्याकांडानंतर पंधरा दिवसांनी भारतीय सैन्याने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. ड्रोन व क्षेपणास्त्रांचा मारा करून भारतीय हवाई दलाने कराची, रावळपिंडी, लाहोर, इस्लामाबाद, पेशावर अशा प्रमुख शहरांमध्ये पाकिस्तानी सैन्याला सळो की पळो करून सोडले. लाहोर ते पेशावर आणि रावळपिंडी ते इस्लामाबाद भारतीय हवाईदलाने केलेल्या हल्ल्याने पाकिस्तानात जीव वाचविण्यासाठी मोठी पळापळ झाली. पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून अवघ्या वीस किमी अंतरावर बॉम्बस्फोट झाल्याने त्यांना सुरक्षित जागेवर हलविण्यात आले, तर लष्करप्रमुख असीम मुनीर यांना बंकरमध्ये लपण्याची पाळी आली. पाकिस्तानने भारताच्या हद्दीत विशेषत: गुजरात, राजस्थान, पंजाब व काश्मीरच्या सरहद्दीवर मोठ्या प्रमाणावर ड्रोन हल्ले केले पण भारतीय सेना दलाने ते परतावून लावले. पाकने केलेल्या हल्ल्यात काही भारतीय जवान व निरपराध लोकांचे बळी पडले. भारताने केलेले हल्ले हे प्रामुख्याने दहशतवादी तळांवर होते, नागरी क्षेत्रावर व लष्करी तळावर हल्ले करण्याचे भारताने कटाक्षाने टाळले पण पाकिस्तानने मात्र कोणतेही धरबंध पाळले नाहीत.
ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा सज्जड पुराव्यानिशी उजेडात आला. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना कसे संरक्षण दिले जाते, याचे फोटो व व्हीडिओ भारताने जगापुढे मांडले. पाकिस्तानचे लष्करी अधिकारी व लष्कर-ए-तोयबाचे कमांडर अब्दुल रहुफ एकत्र असतानाचे पुरावेच भारताने जाहीर केले.
पुलवामा येथे दहशतवाद्यांनी भारतीय सुरक्षा दलाच्या ४४ जवानांचे बळी घेतल्यानंतर भारताने बालकोटमध्ये घुसून भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकने दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. पण त्यानंतर पाकिस्तानने बोध घेतला नाही. भारताबरोबर झालेल्या चारही युद्धात पराभव झाल्यानंतरही पाकिस्तानने धडा शिकला नाही. पहलगाम येथे झालेल्या हत्याकांडानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शांत बसणार नाहीत हे सर्व जगाला ठाऊक होते. म्हणूनच चीन, तुर्की वगळता कोणत्याही देशाने पाकिस्तानला भारताच्या विरोधात पाठिंबा जाहीर केला नाही. भारताचा आक्रमक प्रतिकार बघून चीननेही आपण दहशतवादाच्या विरोधात आहोत अशी नंतर पुस्ती जोडली.
गेले चार दिवस भारत-पाकिस्तान दोन्हीकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा केला गेला. भारताने पहिल्याच फेरीत रात्रीच्या अंधारात पाकिस्तानवर २४ क्षेपणास्त्रे डागली तेव्हा इस्लामाबाद, लाहोर, पिंडीमध्ये सारे सैरभेर झाले होते. जैश- ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरच्या परिवारातील दहा व निकटचे चार असे चौदा जण भारतीय हवाई हल्ल्यात ठार झाले. ठार झालेल्यांची नावांसह यादीही मीडियातून प्रसिद्ध झाली आहे. आजही लष्कर-ए-तोयबा व जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी पाकिस्तानात खुले आम फिरत आहेत. त्याची दृश्य टीव्हीच्या पडद्यावरही दाखवली जात आहेत. दोन्ही देशांनी युद्ध सुरू झाले असे म्हटलेले नाही. भारताने तर आमची लढाई दहशतवादाच्या विरोधात आहे असे स्पष्ट केले आहे. बिहारमधील मधुबनी येथील जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावले होते-आतंकवादियों कों ऐसी कठोर सजा दी जाएगी, जिसकी उन्होंने कल्पना भी नही की होगी...
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफ कधी भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देतात तर कधी भारताने हल्ले थांबवले, तर पाकिस्तान तणाव कमी करण्यासाठी तयार आहे असेही म्हटले. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ, रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊ असा इशारा भारताला दिला होता. चीन व तुर्कीने दिलेल्या शस्त्रांवर पाकिस्तान भारताशी लढत होता. देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली म्हणून जागतिक बँक व आंतराष्ट्रीय नाणेनिधीसमोर पाकिस्तान भिकेचा कटोरा घेऊन आजही उभा आहे.
पहलगाम हत्याकांडात ज्या महिलांचे कुंकू पुसले गेले त्या महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न ऑपरेशन सिंदूरने केला आहे. ऑपरेशन सिंदूर हा कारगिल, मुंबई, अमरनाथ यात्रा, पठाणकोट, उरी, पुलवामा, पहलगाम अशा दहशतवादी हल्ल्यांचा बदला घेणारी मोहीम आहे. लढाई अजून संपलेली नाही. मुंबई पोलीस दलातील निवृत्त सहायक आयुक्त सुजाता पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे-ऑपरेश सिंदूर हा शब्द ऐकूनच डोळ्यांत पाणी आलं. जय हो. सन्मानीय मोदीजी, भारतीय सेना, जय हिंद...!