
राज चिंचणकर
कलाक्षेत्रात येऊन यशाच्या पायऱ्या चढत जाणाऱ्या अनेक कलावंतांचे पाय आजही जमिनीवर आहेत आणि याचे कारण म्हणजे लहानपणापासून त्यांच्यावर झालेले संस्कार! अशाच कलावंतांपैकी एक अभिनेत्री म्हणजे शीतल क्षीरसागर. नाटक, सिनेमा आणि मालिकांमध्ये विविध भूमिका रंगवणाऱ्या शीतलचे बालपण अगदी ‘चाळकरी’ थाटातले होते. त्याविषयी तिच्याशी संवाद साधण्याचा योग आला. शीतल सांगते, “माझे बालपण कुर्ला येथील नेहरूनगर परिसरात गेले. या परिसरात सर्वधर्मीय लोकांची वस्ती होती. साहजिकच, लहानपणापासून विविध भाषा माझ्या कानांवर पडत गेल्या. अगदी उर्दू भाषाही तिथे माझ्या कानांवर पडत होती. आमच्या शेजारी केरळी आणि पंजाबी कुटुंबे होती. चाळीत मराठी सण तर साजरे व्हायचेच; परंतु त्याचबरोबर इतर धर्मियांचे सणही उत्साहात व्हायचे. आम्ही सर्वच सणांमध्ये आनंदाने सहभागी व्हायचो. सर्वधर्मसमभाव, बंधुभाव या सगळ्याची शिकवण मला आमच्या चाळीत मिळत गेली. इथेच मी माणसांकडे ‘माणूस’ म्हणून पाहायला शिकले.

मुंबई : लोकसभा संपली, विधानसभाही पार पडली… आता देशातील लक्ष वेधणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीची चाहूल लागली आहे. प्रशासनाकडून निवडणुकीच्या ...
चाळीने माझे पाय जमिनीवर ठेवले. यश किंवा अपयशाला हिंमतीने सामोरे कसे जायचे; हेही मला चाळीने शिकवले. कलाक्षेत्रात पाय घट्ट रोवून उभे राहण्याचे बळ मला चाळीने दिले. आमच्या चाळीने मला कायम प्रोत्साहन दिले. मी अभिनय क्षेत्राकडे वळले; त्याचे चाळीतल्या लोकांना कौतुक होते. चाळीतल्या सगळ्या उत्सवांमध्ये मी उत्साहाने सहभागी व्हायचे. अगदी नाटकांपासून वेशभूषा स्पर्धा, गायन स्पर्धा तिथे व्हायच्या. मला यात अनेक पारितोषिके मिळाली आहेत. माझ्यातल्या कलेला तिथे प्रोत्साहन आणि उत्तम वळण मिळाले. आमच्या चाळीच्या एका मजल्यावर आठ घरे होती आणि त्यातच आमचे १८० चौरस फुटांचे घर होते. इतक्या सगळ्या मंडळींमध्ये आम्ही गुण्यागोविंदाने राहात होतो. परिणामी, एकमेकांशी होणारी देवाणघेवाण, विचारांचे आदानप्रदान हे सर्व आपोआपच घडत गेले. मी अभिनयाकडे वळले; तेव्हा मी बालपणापासून अनुभवलेल्या या सगळ्या गोष्टींचा मला खूप फायदा झाला. नाटक, सिनेमा, मालिकांतून मी आतापर्यंत विविध प्रकारच्या भूमिका रंगवल्या आहेत. माझ्यातल्या कलेचा पाया चाळीमध्येच तयार झाला आहे. कारण चाळीत मी अनुभवलेल्या घटना, तिथल्या व्यक्ती, त्यांचे अवलोकन; या सगळ्याचा मला माझ्या भूमिका करताना खूप उपयोग झाला.