Saturday, May 10, 2025

रिलॅक्स

अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०२५

अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन २०२५

नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने मराठी माणसे परदेशी स्थायिक होतात. त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते. तेथे ती घरेही बांधतात. मात्र त्यांच्या मनात आपल्या मातीची ओढ कायम राहते. आपल्या भाषेच्या आणि संस्कृतीच्या माणसांना एकत्र आणल्याशिवाय त्यांच्या जीवनाला अर्थ प्राप्त होत नाही. ऑस्ट्रेलियात दर तीन वर्षांनी अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन होत असते, ते ऑस्ट्रेलियातील सर्व मराठी माणसांना एकत्र आणण्यासाठीच. असे पहिले संमेलन १९९३ साली झाले होते. २०२२ मध्ये हे संमेलन मेलबर्न येथे झाले होते. त्यावेळी ,’महाराष्ट्र मंडळ व्हिक्टोरिया’ ने यजमानपद स्वीकारले होते. तीन दिवस ते संमेलन अनेक कार्यक्रमासहित पार पडले. यावर्षी म्हणजे २०२५ मध्ये हे संमेलन सिडनीतील पेनरिथ येथे आयोजित करण्यात आले. ‘मराठी असोसिएशन सिडनी इनकॉर्पोरेटेड’ (MASI)या संस्थेने यजमानपद स्वीकारून, ऑस्ट्रेलियातील सर्व मराठी मंडळांना, संस्थांना संपर्क करून एका छत्राखाली आणले, आणि यावर्षी सिडनी येथे २५,२६,२७ एप्रिल रोजी ‘अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन, पेनरीथ  येथे,’व्हॅली रिजनल स्पोर्ट सेंटर, पेनरीथ मधे, दणक्यात पार पाडले. ‘मासी ‘मधून या संमेलनासाठी खास ९ लोकांची कमिटी निवडण्यात आली होती. त्याच्या अध्यक्ष होत्या नीलिमा बेर्डे. त्या सिडनी येथील सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने काम करत असतात’. ‘मासी’चे सध्याचे अध्यक्ष नितीन चौधरी यांच्यासोबत मासी संस्थेची कार्यकारणी देखील या संमेलनासाठी झटत होतीच.

संमेलनासाठी खास निवडलेल्या कमिटीत प्रत्येक व्यक्तीचे कौशल्य वेगळे होते त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींसाठी त्याचा उपयोग करून घेता आला. एप्रिल २५ तारखेला निघालेल्या शोभायात्रेची संकल्पना फार विचारपूर्वक ठरलेली होती. सर्व मराठी मंडळी ऑस्ट्रेलियातील असली, तरी ती महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेली आहेत त्यामुळे मंडळींनी आपापल्या मूळ शहराशी जोडून राहावे यासाठी प्रत्येकाने आपल्या शहराचा फलक घेऊन उभे राहावे. मग कोणी कोकण, तर कोणी कोणी मुंबई, तर कोणी कोल्हापूर गटामध्ये सामील झाले. आपले गाववाले भेटल्याचा आनंदही लोकांना मिळाला. संमेलनाचे उद्घाटन प्रसंगी ऑस्ट्रेलियाचे आणि भारताचे राष्ट्रगीत गायले गेले. त्यानंतर उमेश थत्ते यांनी लिहिलेले आणि ऑस्ट्रेलियातील तरुण गायकांनी गायलेले’ वृंदावनात अजूनही आमच्या सह्याद्रीची माती या गीताचे चित्रीकरण दाखवण्यात आले आणि संमेलनाची दणदणीत सुरुवात झाली.

पहिल्या संमेलनाची संकल्पना ज्यांची होती त्या मोहिनी जतकर मॅडम यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी संमेलन समिती अध्यक्ष नीलिमा बेर्डे व सुहाना मसाल्याचे सर्वेसर्वा श्री विश्वास चोरडे महानगरपालिकेचे मेयर टॉड कार्नी, संमेलनावर खास अंक काढणारे वसंत मासिकाचे संपादक. दिलीप देशपांडे व सुप्रसिद्ध गायिका आर्या आंबेकर हे पाहुणे उपस्थित होते. या तीनदिवसीय संमेलनात भरगच्च कार्यक्रम होते. सिडनीच्या या अखिल ऑस्ट्रेलियात मराठी संमेलनात खास कार्यक्रम म्हणजे ‘महाऑस्ट्रेलियाची लोकधारा’ !या कार्यक्रमात ऑस्ट्रेलिया आणि महाराष्ट्रीय संस्कृतीला धरून पारंपरिक नृत्य सादर केली गेली धनगर, बाल्या, भारुड,  गोंधळ अशी नृत्य  सादर करण्यासाठी  वय वर्षेच ९ ते ७५ मधील लोकांचा सहभाग होता. नयनरम्य वेशभूषा, नऊवारी साड्या आणि पारंपारिक पोशाख यामुळे लोकांच्या डोळ्यांचे पारणे फिटलं. नृत्यांमधील कुशलता उत्तमच होती. शेवटी ‘माऊली माऊली या गीतांवर सुंदर नृत्य झालं.

‘संवाद सुरांचा’ हा गाण्याचा कार्यक्रम ‘नृत्य वंदना’ हा भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याची जोड देऊन सादर केलेला कार्यक्रम, खेळ माझा श्वास आणि ध्यास ही क्रिकेटवरील मुलाखत, काव्यवाचन, हास्य कविसम्मेलन असे एक से एक सुंदर कार्यक्रम पाहत रसिक गुंग झाले. संमेलनात ‘वारसा’ हा खास कार्यक्रम होता. महाराष्ट्रातील तरुण मंडळींना नाट्यगीताची आवड कितपत आहे ? घरी जर रेडिओ, टीव्ही, रेकॉर्ड वर नाट्यगीते लावली  जात असतील, तरच तरुण मंडळींच्या कानावर नाट्यगीते पडतात. ऑस्ट्रेलियातील मराठी मंडळींना हा वारसा जपावस वाटतो. त्यांनी मराठी नाट्यगीते निवडून त्यावर एकीकडे नाट्य व एकीकडे संगीत, अशी योजना करत नाट्य गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. त्याला नाव दिले ‘वारसा’ त्यानिमित्ताने संगीत शारदा, कट्यार काळजात घुसली, राधा रमण हरी इत्यादी लोकप्रिय नाट्यगीते श्रोत्यांना ऐकायला मिळाली समारोपला आर्या आंबेकर आणि टीमचे सुश्राव्य गायन होतेच त्यामुळे शेवटही गोड झाला.

Comments
Add Comment