Friday, May 9, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण

मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना भारतीय सैन्य दलाचे २ जवान शहीद झाले आहेत. त्यामध्ये, मुंबईतील रहिवाशी असलेले आणि मूळचे आंध्र प्रदेशचे असलेल्या मुरली नाईक यांना वीरमरण आले आहे. भारतीय सैन्याचे दुसरे जवान दिनेश शर्मा यांनाही पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानशी लढताना वीरमरण प्राप्त झाले. गोळीबारात जखमी झाल्यानंतर शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशासाठी लढता लढता ते शहीद झाले.

घाटकोपरच्या झोपडपट्टीत वाढलेला, पण छातीत मातृभूमीची ज्वाळा असलेला मुरली नाईक अखेर देशासाठी शहीद झाला. जम्मू काश्मीरच्या सीमारेषेवर पाकिस्तानच्या भ्याड गोळीबारात त्यांना वीरमरण आले. देशभक्तीच्या रक्तात भिनलेल्या या मुंबईकर जवानाने, भारतमातेच्या संरक्षणासाठी प्राणांची आहुती दिली.

भारत-पाकिस्तान सीमेवर पुन्हा तणावाचे वातावरण आहे. भारताच्या ‘सर्जिकल स्ट्राइक’नंतर चवताळलेल्या पाकिस्तानने सीमारेषेवर अतिरेक वाढवला आहे. याच दरम्यान, ९ मे रोजी पहाटे ३ वाजता झालेल्या गोळीबारात मुरली नाईक शहीद झाले. त्यांच्यासोबत आणखी एक जवान दिनेश शर्मा यांनीही वीरमरण पत्करले.

मुरली नाईक यांचे बालपण घाटकोपरमधील कामराज नगरच्या झोपडपट्टीत गेले. काही महिन्यांपूर्वी पुनर्विकासामुळे त्यांचे घर तुटले, आणि कुटुंब परत आंध्र प्रदेशात गेले. पण मुरली मात्र, देशसेवेच्या व्रताशी घट्ट बांधलेले राहिले.

आज घाटकोपरच्या गल्ल्यांमध्ये दुःखाचे मळभ आहे. बॅनर झळकत आहेत, मोतीसारख्या अश्रूंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली जातेय.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही ट्विट करत शहीद जवान मुरली नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. सत्यसाई जिल्ह्याच्या भूमीतून देशासाठी उगवलेला हा सुपुत्र, आता अमर झाला आहे. नाईक हे सत्यसाई जिल्ह्यातील गोरंटला तालुक्यातील रहिवाशी होते. देशासाठी बलिदान देणाऱ्या मुरली नाईक यांना मी श्रद्धांजली अर्पण करतो, नाईक कुटुंबीयांप्रती सहवेदना आहेत, असे ट्वविट मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केले आहे.

देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या मुरली नाईक यांचे बलिदान, घाटकोपरचे नव्हे, तर अख्ख्या देशाचे मस्तक अभिमानाने उंचावतेय.

Comments
Add Comment