Monday, May 5, 2025

अग्रलेखसंपादकीय

प्रभू रामचंद्रांचा अपमान; हीच राहुल यांची ओळख

प्रभू रामचंद्रांचा अपमान; हीच राहुल यांची ओळख

भारतातील बहुसंख्य जनता भगवान राम यांना आपला आदर्श मानते आणि त्यांच्या एक पत्नीत्वाचे आदर्श सार्वजनिक जीवनात जपते. त्या रामांचा अपमान आता राहुल गांधी यांनी केला आहे आणि त्यामुळे सारे भारतवासीय त्यांच्यावर संतापले आहेत. प्रभू रामांचा अपमान करणे ही राहुल यांची फॅशन झाली आहे आणि तरीही राहुल यांना आपण या देशाचे पंतप्रधान व्हावे असे वाटते. पण त्यांच्या अशा अपमानजनक वक्तव्यांनीच राहुल या देशातील सत्तेपासून दूर दूर जात आहेत. राहुल गांधी यांच्या काँग्रेसला गेल्या लोकसभा निवडणुकीत ९९ जागा मिळाल्या. त्यामुळे लोकसभेतील विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांना पद दिले. पण त्याची कोणतीही जबाबदारीची जाणीव राहुल यांना नाही.

राहुल यांनी अमेरिकेत बोलताना वरील वक्तव्य केले की, भगवान राम हे काल्पनिक आहेत. पण राहुल यांच्या वक्तव्यावर सारे देशवासी संतापले आणि भाजपाचे नेते आणि सामान्य लोकही चांगलेच भडकले. राहुल यांनी महाराष्ट्र ज्यांना आपला आदर्श मानतो त्या सावरकर यांना दुखावण्याचेही काम अनेकदा केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रवासीय त्यांच्यावर सातत्याने भडकलेले असतात. आता त्यात प्रत्यक्ष प्रभू रामांनाच काल्पनिक व्यक्ती म्हटल्याने सबंध उत्तरेतील आणि हिंदुस्थानातील लोकही राहुल यांच्यावर भडकून असतील यात काही आश्चर्य नाही. या देशात आज ८५ टक्के लोकसंख्या हिंदूंची आहे. त्या देशात जर तुम्ही त्यांच्या आराध्य दैवताना काल्पनिक म्हणत असाल, तर कोण भारतीय राहुल यांना मत देईल. अगदी मूर्ख लोकच राहुल याचे पाठीराखे असतील. प्रभू राम यांच्यावर बोलताना राहुल यांची जीभ घसरलीच आणि त्यांच्यावर भाजपाने चांगलीच धारदार टीका केली. भाजपाच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, भगवान राम राहुल यांना कधीच माफ करणार नाही. प्रभू राम यांचा अपमान करणे हीच राहुल आणि त्यांची पिल्लावळ काँग्रेसची ओळख बनली आहे. राहुल यांनी स्वतः होऊन हे संकट ओढवून घेतले आहे. कारण अल्पसंख्याकांना खूश करण्यासाठी हिंदूंच्या देवदेवतांना बदनाम करण्याची घातक सवय काँग्रेसच्या पिल्लावळीला लागली आहे. त्यातूनच हे वक्तव्य आले आहे.

भगवान राम यांचा अपमान करायचा आणि सावरकर यांच्यासारख्या देशभक्ताचा अपमान करायचा, त्यांना माफीवीर म्हणायचे यातून राहुल यांची क्षुद्र वृत्ती दिसून आली आहे. राम हे कोट्यवधी भारतीयांचे आदर्श आहेत आणि त्यांच्या आदर्शाला असे हेटाळणीजनक बोलून आपल्याला येथील लोक मते देतील हे राहुल समजतात तरी कसे, हेच मोठे गौडबंगाल आहे. राहुल यांची समज खूप कमी आहे. पण त्यांच्या सल्लागारांनी तरी राहुल यांना समजावून सांगावे की या देशात राहायचे असेल आणि येथे राजकारण करायचे असेल, तर इथल्या आदर्शाची हेटाळणी करून चालणार नाही. त्यात पुन्हा राहुल यांची गाठ मोदी यांच्यासारख्या महाशक्तीशाली नेत्याशी आहे. त्यामुळे तर राहुल यांनी आपले वक्तव्य करताना फारच सावध राहावे लागेल. पण राहुल यांची मती गुंग झाली आहे आणि त्यांची सद्सदविवेकबुद्धी त्यांना सोडून गेली आहे असे दिसते.

सोनिया गांधी यांनी रामसेतूबाबत जे वक्तव्य केले होते. त्याचप्रकारचे वक्तव्य राहुल यांनी केले आहे. त्यातून काँग्रेसची सत्ता गेली. पण येथील जनतेच्या धार्मिक भावनांशी तुम्ही खेळून राजकारणात राहू शकत नाही. पण राहुल यांना ते भान नाही. त्यामुळे ते अशी उपटसुंभ वक्तव्ये करत असतात आणि तोंडघशी पडत असत्तात. ताजे वक्तव्य त्याच श्रेणीतील आहे. त्यामुळे राहुल यांना धडा शिकवल्याशिवाय जनता राहणार नाही. भाजपाच्या हातात राहुल यांनी कोलीत दिले आहे. त्यामुळे ते राहुल यांची चिरफाड करणार हे उघड होते., त्यामुळे भाजपाच्या एकामागून एक नेत्यानी राहुल यांना राम द्रोही म्हटले आणि त्यात राहुल यांच्याकडे काहीच समर्थन नव्हते. तसे ते सोनिया यांच्याकडेही नव्हते. कारण राहुल असो की सोनिया, यांना भारताच्या अध्यात्मिक परंपरा आणि येथील देवता यांच्याबद्दल काहीही माहिती नाही. सोनिया तर इटलीच्या. त्यामुळे त्यांना काहीही माहिती असण्याची शक्यताच नाही. राहुल यांनी निदान आपल्या आजी आणि आजोबा यांचे विचार तरी भगवान रामांविषयी काय होते याचा विचार करायला हवा होता. तेच सावरकरांविषयी. सावरकर यांच्याविषयी खुद्द राहुल यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी गौरवौद्गार काढले होते आणि त्यांना गौरवले होते. त्या सावरकरांविषयी माफीवीर म्हणून राहुल यांना संबोधताना राहुल यांना जनाची नाही तरी मनाची तरी लाज वाटली पाहिजे.

भाजपाने म्हटले की, राहुल यांची प्रभू रामांविषयीची ही टिप्पणी ही हिंदूविरोधी आहे. पण भाजपाने काय म्हटले यापेक्षाही प्रभू रामांबद्दल भारतीय लोकांना काय वाटते हे जास्त महत्त्वाचे आहे. कारण येथील ८५ टक्के लोक प्रभू रामांना आपले दैवत मानतात. त्यांचा अपमान हा त्या लोकांचा अपमान आहे. तो लोक सहन करणार नाहीत. राहुल यांना याचे तरी भान असायला हवे होते की, आपण आज विरोधी पक्ष नेता आहोत आणि आपली सत्ता हिंदू धर्मविषयक असल्याच बरळण्यामुळे गेली आहे. भाजपाच्या नेत्यांना राहुल यांच्या वक्तव्यामुळे राहुल यांच्यावर टीका करण्याची संधी मिळाली आहे. पण त्यापेक्षाही ही प्रवृत्ती जास्त घातक आहे. परदेशात जाऊन हिंदूदेवतांवर विरोधी टिप्पणी केल्याने राहुल हिरो ठरत नाहीत, तर खलनायक ठरतात. याचे भान त्यांनी राखायला हवे होते. राहुल यांची ओळख प्रभू राम यांचा अपमान करणारा नेता अशी झाली आहे, तर त्यात प्रभू रामांच्या प्रतिमेचे काहीच नुकसान होणार नाही. पण राहुल अजून किती काळ लोकांच्या लक्षात राहतील हे त्यांनी पाहावे. प्रभू राम यांची कीर्ती तरी कायम राहील आणि ते सदोदित वंदनीय आहेत.

Comments
Add Comment