
दिलीप कुलकर्णी
हलगाम येथे आम्ही पोहोचलो तेंव्हा सर्व घोडेवाले जमा झाले विविध पॉइंट दाखवण्याचे कबूल करण्यात आले. वाढवून चढे दर सांगून थोडी तडजोड करण्यात आली. प्रत्येक पर्यटकांना वेगळे दर, गम बूटचे वेगळे दर, फोटो काढणारे त्यांचे वेगळे दर, तिथे पण वेगवेगळे दर. प्रचंड निगोशिएशन, ही प्रत्येकाची कला. घोडे बरेच चिखलाने माखलेले ... पण लांबूनच काही पॉइंट दाखवण्यात आले व प्रत्यक्ष काही पॉइंट. प्रत्येक वेळी निघण्याची घाई करण्यात आली. माझ्या मुलीने निवडलेला घोडेवाला लगट करत होता. उतरल्यावर प्रत्येक घोडेवाला टीप मागतो. घोड्याकरिता चणे मागतो. फोटोवाला टीप मागतो. हे मुद्दाम सांगू इच्छितो की, घोडा हाकण्याच्या निमित्ताने तो असे करत होता. त्यांचे बोलणे अत्यंत उद्धट होते. घोडा घेताना एक भाषा व प्रत्यक्ष दुसरी भाषा. इतर व्हॅली जाण्यासाठी लोकल युनियनचीच गाडी करावी लागते. तिथे ही निगोशियेट करावे लागते. कोणतेच दर निश्चित नाहीत. अरू व्हॅली येथे, तर मॅगी शंभर रुपये, स्वीट कॉर्न शंभर रुपये. सोनमर्ग... येथे गेल्यावर तिथे पण हीच परिस्थिती. प्रचंड निगोशिएशन. त्यांची भाषा अजिबात कळत नाही.
सांगितलेले पॉइंटमधील फिशपॉइंट. येथे एक ही मासा नाही फक्त तळे आहे. अनेक पॉइंटवर बर्फ नाही पण ते कल्पनाही देत नाहीत. पूर्ण भ्रमनिरास... बरेच पॉइंट लांबून दाखवले जातात. इथे पण मॅगी शंभर रुपये, बटर मॅगी एकशे वीस रुपये. आपल्याला ते एक एटीएम समजतात. शिकारा राईड निगोशिएशन... परत टीप मागतात. फोटो निगोशिएशन त्यावर टीप मागणे आलेच. शालिमार गार्डन... काश्मिरी वेषभूषा करताना पण लगट... फोटो काढणे निगोशिएशन. फोटो सॉफ्ट कॉपी घेणे, ठरलेले पैसे देऊन सुद्धा टीपची मागणी. आपण जातो ते आनंदाकरता आणि त्यांना त्या निमित्ताने रोजगार मिळेल या उद्देशाने... पण ते तसे आपल्याकडे पाहात नाहीत. फक्त लूट.
ज्या दिवशी फायरिंग झाले त्याच्या आदल्या दिवशी आम्ही त्या स्पॉटला होतो. दुसऱ्या दिवशी श्रीनगर येथे होतो. दुसऱ्या(त्या) दिवशी काश्मीर बंदची हाक दिली होती. बरीच दुकाने बंद, हॉटेल बंद आपण तिथे अनोळखी... अशा परिस्थितीत आम्ही आमच्या हॉटेलला दुपारचे जेवण सांगितले. त्याने डाळ भात देण्याचे कबूल केले. बिल प्रत्येकी दोनशे पन्नास रुपये फक्त. माझा नातू सोबत होता वय पाच वर्षे, त्याचे पण तितकेच पैसे. कोणतीही माणुसकी मला तर दिसली नाही. पाण्याच्या बाटल्या देतानाचा एक व्हीडिओ टाकला म्हणजे संपूर्ण काश्मिरातील माणूसकी नव्हे. या परिस्थितीत आम्ही टेन्शनमध्ये होतो(असे तिथे अनेक जण पण असतील). सर्व जण चला परत असे म्हणत होते. मग आम्ही एक क्लिप तयार करून पोस्ट केली. टॅग करून लोकशाही चॅनेलला पाठवली. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बोलणे करून दिले. त्यावर त्वरित एकनाथ शिंदे यांच्या स्वीय सहायक अभिजित दरेकर यांचा फोन आला. त्यांनी काळजी करू नका आम्ही आहोत असे म्हणाले. मागोमाग मुरलीधर मोहोळ यांच्या स्वीय सहायक यांचा पण फोन आला. त्यांनी पण अजिबात काळजी करू नये, आम्ही सर्व व्यवस्था करत आहोत असे सांगितले आणि सर्वांची नावे आणि आधार क्रमांक मागितला. ती यादी आम्ही पाठवली. आता आम्हास खूप धीर आला. दुपारी अभिजीत दरेकर आम्हास हॉटेलवर भेटण्यास आले, त्यांनी पण सर्वांची नावे आणि आधार क्रमांक मागितला. आता सर्व स्तरावर पर्यटक परत आणण्यास प्रयत्न सुरू झाल्याचे समजल्यावर खूप बरे वाटले. संध्याकाळी सात वाजता अभिजित दरेकर यांनी फोन करून बॅग भरून विमानतळावर येण्याची सूचना दिली. त्याप्रमाणे आम्ही त्वरित बॅग भरून घेऊन विमानतळावर आलो. दरम्यान, मुरलीधर मोहोळ यांच्या स्वीय सहायक यांनी एक यादी फेस बुकवर प्रसिद्ध केली त्यात आमच्यातील अकरापैकी आठ जणांची नावे दिसली. त्यावेळेस आम्ही श्रीनगर विमानतळावर होतो. त्यावर आम्ही मुरलीधर मोहोळ यांच्या स्वीय सहायक यांना आम्ही विमानतळावर आहोत असे सांगितले आणि एकनाथ शिंदे हे आम्हास घेण्यास येणार असल्याचे सांगितले. दहा वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले. त्यांना बघून सर्वांच्या डोळ्यांत अश्रू आले. त्यांनी आम्हास विमानात बसवून मुंबईस पाठवले. अशा वेळी आम्हास सर्वोतोपरी मदत करणारे, मुरलीधर मोहोळ आणि त्यांचे सर्व सहकारी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अभिजीत दरेकर साहेब आणि आमचे मुंबई येथे सहर्ष स्वागत करणारे कुर्ला येथील आमदार मंगेश कुडाळकर, अंधेरी येथील आमदार मुरजी पटेल, विजय सांगळे आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे असंख्य कार्यकर्ते यांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो यांच्या संयुक्त प्रयत्नाने आम्ही सुखरूप घरी पोहोचलो.
माझ्या मनातील काही प्रश्न... १)त्यावेळी तेथे घोडेवाले, फोटोग्राफर, जे रील करण्यात तरबेज होते, छोटे-मोठे स्टॉलवाले, यांची संख्या असंख्य होती, तर याचे फोटो अथवा व्हीडिओ चित्रण कोणीच कसे केले नाही , २) अशा भयावह परिस्थितीत, प्रोग्राम प्रिपोंड करून तीन दिवस आधी निघाल्यावर पण हॉटेलवाल्याने त्या तीन दिवसांचे पण पैसे घेतले, ही कसली माणुसकी(त्यांना विनंती करून पण), तुम्ही आधी जाताय यात आमचा काय दोष असे म्हणणारे ते... ३) याच प्रमाणे ठेवलेला टेम्पो ट्रॅव्हलर यांनी पण वाहन न वापरता सुद्धा तीन दिवसांचे पैसे घेतले. वाहन तुमच्या करिता होते, तुम्ही वापरले नाही आम्ही काय करू... ४) काश्मीर बंद असताना, पर्यटक घाबरले असताना, डाळ भात खाण्यासाठी दोनशे पन्नास रुपये लावणारा हॉटेलवाला, यांच्याकडून ही माणूसकी आम्हास बघण्यास मिळाली. माणूसकीच्या नुसत्याच गप्पा, तुमच्यामुळे आमचे कुटुंब चालते असे म्हणून, मगरीचे अश्रू ढाळणारे हे आणि आपली माणसे संकटात असताना प्रत्यक्ष येऊन घरी परत आणणारे, फोन करून आधार देणारे, लगेच येण्याची सोय करणारे.. यांच्यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. तेव्हा या तयारीनिशी आपण तिकडे जावे किंवा कसे ते आपण ठरवावे ही नम्र विनंती.