Thursday, May 1, 2025

श्रध्दा-संस्कृती

‘भगवान परशुराम एक चिरंजीवी’

‘भगवान परशुराम एक चिरंजीवी’

ऋतुजा केळकर

काल अक्षय्य तृतीया झाली. हा दिवसा हिंदू आणि जैन धर्मीयांसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो. “अक्षय” म्हणजे कधीही क्षय न होणारे, म्हणजेच या दिवशी केलेले दान, पूजा आणि सत्कर्म अनंत फलदायी ठरतात. संपत्ती, समृद्धी आणि नवीन सुरुवातीचा प्रतीक असलेला हा दिवस. या दिवशी नवीन वाहन, घर, व्यवसाय किंवा लग्नसंबंधी खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवसाचे अजून एक महत्त्व म्हणजे याच दिवशी गंगा सहकाराच्या जटेतून पृथ्वीवर अवतरली होती अशी आख्यायिका आहे. भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांची देखील भेट याच दिवशी झाली असे एका पौराणिक कथेमध्ये उल्लेखले आहे. महाभारतातील द्रौपदीला अक्षय पात्र देखील याच दिवशी प्राप्त झाले असे म्हटले जाते. या दिवशी यथाशक्ती भगवंताची पूजा करून श्रीसूक्त, विष्णुसहस्रनाम किंवा लक्ष्मी स्तोत्र यांचे पठण करावे. तसेच यथाशक्ती अन्नदान, वस्त्रदान व जलदान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. अग्रतः चतुरो वेदाः पृष्ठतः सशरं धनुः। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि।।

या संस्कृत श्लोकानुसार, ज्याला चारी वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. मौखिक म्हणजे तोंडपाठ आहेत, अर्थात ज्याला चारही वेदांचे पूर्ण ज्ञान आहे. ज्याच्या पाठीवर धनुष्यबाण आहे म्हणजेच ज्याच्या अंगात शौर्य आहे आणि जो ब्राह्मतेज व क्षात्रतेज दोन्ही तेजाने झळाळत आहे, असा तो त्यामुळे जो अधर्म आणि अनाचार अंगी बाळगून अत्याचार करेल, त्याचा विरोध करेल त्याला शापाने वा शस्त्राने पराजित करू शकतो असा तो ‘भगवान परशुराम’ यांचा जन्म वैशाख शुक्ल तृतीयेला म्हणजेच अक्षय्य तृतीयेला झाला. भगवान परशुराम हे महर्षी जमदग्नी आणि माता रेणुका यांचे पुत्र आहेत. त्यांचे मूळ नाव रामभद्र आहे; परंतु त्यांनी भगवान शंकराची कठोर तपस्या करून त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या अखंड भक्ती आणि तपस्येमुळे भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवंतानी त्यांना परशू नावाचे दिव्य शस्त्र प्रदान केले. यामुळेच रामभद्र हे “परशुराम” झाले. भगवान परशुराम हे भृगू वंशीय ब्राह्मण आहेत आणि त्यांचे गोत्र जामदग्न्य आहे. अशा या शस्त्र आणि शास्त्र दोन्हीमध्ये पारंगत असलेल्या परशुरामांनी दुष्ट क्षत्रियांना एकवीस वेळा पृथ्वीवरून नष्ट केले.

आता नवीन पिढी हा प्रश्न नक्कीच विचारेल की, असे काय घडले म्हणून परशुरामाने दुष्ट क्षत्रियांना एकवीस वेळा पृथ्वीवरून नष्ट केले, तर कार्तवीर्य अर्जुन हा एक अत्यंत बलशाली आणि अहंकारी क्षत्रिय राजा होता. त्याने महर्षी जमदग्नींच्या आश्रमात प्रवेश करून त्यांच्या कामधेनू गाईचे अपहरण केले. तसेच जमदग्नी ऋषींना अपमानित करून त्यांचा वध करण्यात आला, त्यामुळे परशुरामांनी पित्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सहस्त्रार्जुनाचा वध केला. मात्र हे युद्ध इथेच न थांबता त्याच्या वंशजांनी परशुरामाच्या कुटुंबावर वारंवार हल्ले केले. त्यामुळे परशुरामांनी एकवीस वेळा पृथ्वीवरून दुष्ट क्षत्रियांचा संहार केला आणि अधर्माचा नाश केला. असे हे भगवान परशुराम यांनी शस्त्र आणि शास्त्र दोन्हींमध्ये पारंगत असलेल्या योद्ध्यांची निर्मिती केली. अशा या भगवान परशुरामाचे वर्णन शब्दात करावयाचे झाले तर, रामभद्रोऽभवद् विप्रः परशुरामो महाबलः। शंकरस्य महाभक्तः तपसा तं प्रसादयत्॥ दत्तं परशुं देवेन परशुरामोऽभूद् ततः। क्षत्रियानां विनाशाय धर्मसंस्थापनाय ययौ॥ हत्वा कार्तवीर्यं वीरः पुनः क्रूरान् निवारयन्। विंशत्यं क्षत्रियान् लोके शस्त्रतेजं समाश्रितः॥ चिरंजीवी सप्तमध्ये कालान्तेऽपि संस्थितः। धर्मरक्षणनित्यश्च ब्रह्मतेजः समालंब्य॥

आता यात प्रथमतः सप्त चिरंजीवी म्हणजे काय ते जाणून घ्या. सप्त चिरंजीवी म्हणजे सात दिव्य आणि अमर व्यक्ती. अश्वत्थामा, हनुमान, विभीषण, कृपाचार्य, मार्कंडेय आणि राजा बळी हे आहेत. सप्त चिरंजीवी की जे युगानुयुग टिकून राहतील आणि धर्मसंस्थापनेसाठी कार्य करतील. सप्त चिरंजीवींमध्ये भगवान परशुराम सहावे चिरंजीवी गणले जातात. यात प्रथम येतात ते,‘अश्वत्थामा’ हे महाभारतकालीन असे महान योद्धा आहेत, ज्यांना श्रीकृष्णाच्या श्रापाने अनंतकाळ पृथ्वीवर कपाळावरील भळभळती जखम घेऊन फिरत राहण्याची शिक्षा मिळाली आहे. दुसरे चिरंजीवी आहेत भगवान विष्णूंच्या वामन अवतारास कारणीभूत ठरलेले राजा बळी की जो भक्त प्रल्हादाचा वंशज आहे आणि एक महान दानशूर राजा तसेच शक्तीचा अवतार आहे. तिसरे अर्थातच ‘श्रीरामभक्त अंजनेय म्हणजेच आपले साऱ्यांचे लाडके पवनपुत्र हनुमंत’ होय. जे रामाचे कार्य पूर्ण होईपर्यंत पृथ्वीवर राहतीलच. चौथे आहेत ‘विभीषण’ रावणाचा बंधू. पाचवे चिरंजीवी ‘कृपाचार्य’ की जे महाभारतकालीन विद्वान आणि द्रोणाचार्यांचे सहकारी म्हणून गणले जातात.

जे युगानुयुग धर्माचे रक्षण करतच राहतील सहावे भगवान ‘परशुराम’ की जे भगवान विष्णूंचा सहावा अवतार आहेत. जे शस्त्र आणि ब्रह्मतेजाचा संगम आहेत. सातवे चिरंजीवी आहेत ऋषी ‘मार्कंडेय’ ज्यांनी मृत्यूवर विजय मिळवला आणि ते अजरामर झालेत. हे सातही चिरंजीवी धर्मरक्षणासाठी आणि अधर्माच्या नाशासाठी पृथ्वीवर कायम राहतील. ते युगांनुसार बदलत असले तरी अदृश्य रूपात उपस्थित आहेत असे मानले जाते. कित्येकांना नर्मदा परीक्रमाच्या वेळी तर आजही अश्वथामा तसेच पवनपुत्र हनुमंताने दर्शन दिले आहे. अनेक हिंदू मंदिरांमध्ये सप्त चिरंजीवींच्या स्तुतीसाठी श्लोक आणि मंत्र उच्चारले जातात. आज काश्मीरमधील नाजूक परिस्थिती आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी अधोरेखित करता पहलगाम जे अमरनाथ यात्रेतील पहिला पडाव मानले जाते तेथे झालेल्या धर्मांध हत्येच्या पार्श्वभूमीवर आपण या सप्त चिरंजीवींना धर्म रक्षणार्थ आळवून मी माझ्या लेखणीला विराम देते.

Comments
Add Comment