Thursday, May 1, 2025

श्रध्दा-संस्कृती

विस्तार माणसाचा आणि जगाचा

विस्तार माणसाचा आणि जगाचा

सद्गुरू वामनराव पै

जगाचा विस्तार हे परमेश्वराचे रूप आहे. हा विस्तार कसा होतो आहे हे आपण आपल्या ठायी सुद्धा अनेक प्रकारे पाहू शकतो. आपल्या आत एक पेशी होती. एकाची दोन, दोनाच्या चार, चाराच्या आठ, आठाच्या सोळा, सोळाच्या बत्तीस, बत्तीसच्या चौसष्ठ म्हणजे भौतिक प्रमाणाने हा विस्तार चाललेला आहे. किती पेशी? तर अब्जावधी पेशी आपल्या शरीरात निर्माण झालेल्या आहेत. किती निर्माण होतात व किती लयाला जातात याचाही हिशोब नाही. या निर्माण झालेल्या पेशी ज्या ठिकाणी जाऊन बसतात तिथलेच काम करतात. गुडघ्याच्या ठिकाणी जाऊन बसलेल्या पेशी गुडघ्याचे काम करतात. कानाच्या पेशी कानाचेच काम करतात. डोळ्यांच्या पेशी डोळ्यांचे काम करतात. हे यांना शिकवले कोणी? आपण जर एखादी संस्था निर्माण केली व कारकूनाचे काम जर कुणाला दिले तरी त्याच्या कामावर आपल्याला लक्ष ठेवावे लागते. नाहीतर तो त्या कामात चुका करतोच.

एक साधा निरोप द्यायचा झाला तरी गोंधळ असतो. मी एकदा माझ्या भाच्याला सांगितले अरे माझा हा निरोप मामाला जाऊन दे. थोड्या वेळाने मी त्याला बोलावले व विचारले तू काय निरोप देणार आहेस ते सांग. त्याने जे सांगितले ते भलतेच काहीतरी होते. इथे एक साधा निरोपसुद्धा व्यवस्थित सांगता येत नाही व तिथे एवढ्या कोट्यवधी पेशी निर्माण होतात. त्या आपापल्या जागी जाऊन बसतात व तिथे त्या कार्य करतात हे सर्व अद्भुत आहे.

माणसाचा एरव्ही विस्तार होतो तो वेगळाच. एक आपण मग बायको. मुले, सून, जावई, नातवंडे, पतवंडे हा विस्तार होत होत जातो. मला काय सांगायचे आहे. एक आंबा तो किती विस्तारत विस्तारत जातो की हजारो आंब्यांमध्ये तीच पारांबी असते. पाने मोहोर हे काय मोजता येतात? ते अगणितीय आहे. पाने मोहोर मोजता येत नाही, फक्त आंबे मोजता येतात. हे सगळे पहिले तर किती वर्णन करायचे? आकाशातल्या विश्वाकडे पाहिले तर ते किती अद्भुत आहे. पाण्यातले, समुद्रातले विश्व ते आणखी वेगळे. जे अव्यक्त आहे ते किती व काय आहे याचा पत्ताच नाही. “ अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेथुनी चराचर त्यासी भजे’’. अव्यक्त परमेश्वराबद्दल तर बोलताच येणार नाही, पण अव्यक्त जीवजंतू किती असतील? डोळ्यांना दिसणारे जे जीवजंतू आहेत त्यापेक्षा कितीतरी अव्यक्त जीवजंतू आहेत. परमेश्वराबद्दल कुणीही, कितीही सांगितले तरी तो जसा आहे. तसा त्याची कुणाला कल्पनाच करता येणार नाही. आपण आहोत एवढेसे व तो आहे अथांग, अफाट, असीम त्याची आपल्याला कल्पनाच करता येणार नाही.

Comments
Add Comment