
वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया. हिंदू दिनदर्शिकेनुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून अक्षय्य तृतीयेकडे पाहिले जाते. या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभ कार्याचे फळ अ-क्षय्य (ज्याचा कधीही क्षय किंवा ऱ्हास होत नाही) असे मिळते, असा समज आहे.
वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया. हिंदू दिनदर्शिकेनुसार साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून अक्षय्य तृतीयेकडे पाहिले जाते. भारतीय संस्कृतीच्या पौराणिक अधिष्ठानामुळे या दिवशी आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. हिंदू संस्कृतीचे सगळे सण हे निसर्गाच्या चक्रानुसार ठरलेले असतात. म्हणूनच गुढीपाडव्याला सुरू केलेली शेतीची नांगरणी या दिवशी संपवून शेतकरी जमिनीच्या मशागतीला लागतात. मशागत केलेल्या जमिनीत बियाणे पेरतात. भारतात काही ठिकाणी या दिवशी मृत्तिका पूजन करण्याची प्रथाही आहे.
मृत्तिकेच्या रुपात असणारी लक्ष्मी आपल्यावर सदैव प्रसन्न राहो, ही भावना या पूजनामागे असते. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आळी करून लावलेल्या फळबागा भरघोस फळ उत्पादन देतात अशी समजूत आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या औषधी वनस्पतीही अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर रोवल्यास या वनस्पतींचा क्षय होत नाही, म्हणजेच औषधी वनस्पतींचा तुटवडा भासत नाही. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीच्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही. त्यामुळे या मुहूर्तावर वस्त्र, शस्त्र, दागिने किंवा मोठी खरेदी करण्यात येते.