Thursday, May 8, 2025

किलबिलसाप्ताहिक

जोडी जोडी

जोडी जोडी

नक्षत्रांचे देणे - डॉ. विजया वाड

शरयू आणि सोनू जुळ्या बहिणी. दिसायला बऱ्या गऱ्या नि घाऱ्या. स्वभावाने सुहृद. सरळ मनाच्या दोघी जोडीजोडीनं शाळेत गेल्या. बरोबर सारख्या गुणांनी एस. एस. सी. झाल्या. आनंदून जोडीजोडीनं महाविद्यालयात गेल्या. दोघींनी एकाच बाकावर बसून बी. ए. केलं. सारखेच गुण दोघींना पडले. “आता लग्न करा.” आई-बाबा म्हणाले. “आमचा कूट प्रश्न प्रथम सोडवा.” “कोणता कूट प्रश्न?” “तुम्हाला प्रश्न पडला असेल म्हणून सांगते.” शरयू म्हणाली. “सांगू ना गं सोनू?” तिनं सोनूला विचारलं. “सांग की” “लाजायचं काय त्यात?” सोनू म्हणाली. “आई-बाबांना पचणार नाही.” “पचेल पचेल बरोब्बर पचेल.” “नाही गं पचणार” “बरं मी सांगते. तुला अडखळायला होतंय ना.”

“बरं का आई-बाबा, आम्ही जोडीजोडीनं वाढलो, जोडीजोडीनं शाळा केली, सारखेच गुण मिळवून पास झालो, आता जोडीजोडीनं एकाच माणसाला वरणार. एकाच दिवशी सौभाग्यवती होणार.” “नवरे मात्र दोन निवडा. वेगवेगळे.” बाबा सावधपणे म्हणाले. त्यांना भीती वाटत होती. “तो शेराजचा शंतनू आहे ना बाबा!” “त्याचं काय?” “तो आम्ही दोघींवर प्रेम करतो.” “अगं पोरींनो, आपल्याकडे द्विभार्या प्रतिबंधक कायदा आहे.” “म्हणून त्यावर आम्ही बहिणीसोबत तोडगा काढला आहे.” “तोडगा?” कोणता गं पोरींनो?”

“एकेक वर्ष एक ऑफिशिअल, एक अनऑफिशिअल पत्नी-नो भांडण, नो कुरकुर, नो तंटा.” बाबांना आता भोवळ यायचीच बाकी होती. आई तर चक्कर येऊन पलंगावर आडवी झालीच होती. आपल्या आगाऊ पोरींचा निर्णय ऐकून बिचारी गोंधळून गेली होती. “आणि मांडवात कोण कुणाला हार घालणार?” तिने अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला. “एक लग्न घरातच उरकू.” “आणि दुसरं वाजत गाजत?” “हो. दुसरं थाटामाटात.” “हे मला अमान्य आहे.” “का गं?”

“अगं, तुम्ही दोघी आमच्या लाडक्या कन्या आहात आणि आपली आर्थिक स्थिती सधन आहे.” ती म्हणाली. “आम्ही दोघींचे विवाह थाटात करू शकतो.” बाबा बोलले “कुणी म्हणतंय का त्यावर काही?” “मग?” “एक विवाह थाटात करा. दुसरा सहा महिन्यांनी परत त्याच थाटामाटात करा.” शरयू म्हणाली. “आणि नवरा तोच?” आई आश्चर्याने म्हणाली. “हो नवरा मात्र तोच.” “अंग, लोक काय म्हणतील.?” “पब्लिक मेमरी इज व्हेरी शॉर्ट.” सोनू म्हणाली. “पण मला अगदी भोवळ येतीय या विचारानं” आई म्हणाली. “बरं. आपण एक उपाय काढू मस्तपैकी.” सोनू म्हणाली. “आवई उठवू की, त्याचा जुळा भाऊ ऑस्ट्रेलियात असतो.” “अगं पण...” आईचा घसा दाटून आला. “तो भावाच्या लग्नाला येणार नाही का?” बाबांनी प्रश्न केला. “त्याला रजा मिळणार नाही. हे आजच्या काळात अगदीच शक्य आहे. कामाचा भार प्रत्येक कार्यालयात खूप म्हणजे खूप वाढला आहे.” सोनू पुढाकार घेऊन म्हणाली. “लोकांना ते खरं वाटेल.” आईने कबुली दिली. “सहा एक महिन्यांत यालाच बोलू परत.” “बदलीच्या गावी आम्ही राहू.” सोनू म्हणाली, “मी कऱ्हाडला बदली घेते.” तिने सांगितले. “आणि त्याचं काय? तो सहा महिने काय करणार?” “तो सिक रजेवर जाईल.” सोनूनं तोडगा काढला. “अरे वा ! ऑल तोडगाज आर रेडी.” बाबा आनंदाले आणि ती लग्ने झाली. लोक दोन्ही लग्नांना आले नो आहेर ! अशी लग्ने होती म्हणून आनंदाने आले आता सहा सहा महिने एकेक जोडी राहाते कऱ्हाड-मुंबई !

Comments
Add Comment