
मुंबई : नव्या सरकारचा शपथविधी गुरुवारी पार पडला. आता शनिवारपासून राज्याचे विशेष अधिवेशन सुरु होत आहे. नव्या विधानसभा अध्यक्षांची ९ डिसेंबरला निवड होणार असून त्यासाठी भाजपाकडून ८ डिसेंबरला दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज भरला जाणार आहे. राहुल नार्वेकर यांना पुन्हा संधी मिळणार की नवा अध्यक्ष होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणि भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष भाजपाने त्यांच्याकडे घेतले होते. भाजपाने त्यावेळी राहुल नार्वेकर यांना अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. आता पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याकडे विधानसभेचे अध्यक्षपद जाऊ शकते.राहुल नार्वेकर हे कुलाबा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत.
७, ८ आणि ९ डिसेंबरला विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविण्यात येणार आहे. या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करावे लागेल. ७ आणि ८ डिसेंबरला आमदारांचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती आहे. दरम्यान विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड ९ नोव्हेंबरला केली जाणार आहे. पण त्याआधी ८ डिसेंबरला अर्ज दाखल केला जाणार आहे. दरम्यान विधानसभेच्या आमदारांच्या शपथविधीची विधानभवनात तयारी सुरू झाली आहे. निवडून आलेले प्रतिनिधी विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात आमदारकीची शपथ घेतील.