Monday, May 5, 2025

कोलाजसाप्ताहिक

काव्यांजली

काव्यांजली

माझ्या मराठीची गोडी जशी अंगावर शालजोडी ना मायभाषेला कधी सोडी राजवाड्याला शोभे जशी माडी।।१।।

मायमराठीचा गोडवा , फुलमकरंदातील ठेवा किती घोटावा घोटावा संगीतातील राग मारवा।।२।।

मायमराठीचा गंध करी मनास किती धुंद जसे घरासमोरील तुळशीवृंद भासे मोहवी फूल कुंद।।३।।

मायमराठीचा स्पर्श देई मनाला किती हर्ष नाही दुजा करी संघर्ष करी सर्व भाषांचा उत्कर्ष।।४।। करुया नारा मराठीचा पसरे सुगंध प्राजक्ताचा सडा कैक दारी फुलांचा अभिमान महाराष्ट्राचा।। ५ll

(प्रा. स्नेहा केसरकर (ठाणे)

कोरी, नवी कविता...

कोऱ्या वहीच्या पहिल्या पानावरील, मी, तजेल शाईच्या कवितेचा ‘क’ व्हावं. समृद्ध, संपन्न, प्रतिभावान कवींच्या इंद्रधनू रंगीन पताकांच्या माळेतील, अदृश्य धाग्यासमान माझं अस्तित्व राहावं.

काजोळल्या दिशांन साठी ‘क’ने काजवे व्हावे, विद्वत्त्येच्या ‘वि’ ने बौद्धिक अर्थ श्रीमंत असावे. ‘ता’ ने तर्कशुद्ध आशय, विषयी निकोप राहावे, काव्यबागेतील पाणकारंजेला ही पंख फुटावे.

वहीच्या पानाने नेहमी चैतन्यमय राहावे, रसिकांच्या मनांवर क्षणभर वास्तव्य करावे. रुजून मातीत शब्दरूपी नैसर्गिक बियाणे, अंकुरित होऊन कोवळ्या पालवीने हसावे.

जरी आहे प्रकाशाच्या झोता पलीकडील, काळोख्या अंधारासमान माझी कविता. तारांगणातील सुंदर शब्द चांदण्या वेचून, तेजोमय व्हावी कॅनव्हास ची रंगछटा.

फुलबागेतील फुलपाखरांची रंग- रंगातील, आणि फुलाफुलांतील विध्वत, विविधता. माझ्या कवितेच्या प्रत्येक ओळी न व्हावं, वैविध, विषयी, रंग ढंगातीत अभिवक्ता. माझ्या कवितेच्या प्रत्येक ओळी न व्हावं, वैविध, विषयी रंग ढंगातीत अभिवक्ता.

- कवी. विनायक आजगणकर

अवनीवरती...

अवनीवरती अलगत उतरून मेघ सावळे आले चिंब होऊनी कायेसंगे मनही बावळे झाले

सृष्टीला या सजवित साऱ्या धावत श्रावण आला रंग नभाचा कधी सावळा कधी रुपेरी झाला पानाफुलांचे रूप आगळे इंद्रधनुचे झेले चिंब होऊनी कायेसंगे मनही बावळे झाले

पानाफुलांच्या बहरासंगे मनास मोहर आला रानामध्ये पक्षांसंगे मोर नाचरा झाला पिऊन घेतो वाऱ्यासंगे आठवणींचे प्याले चिंब होऊनी कायेसंगे मनही बावळे झाले

धरती, वारा, सुमने, पक्षी ओल्या पाऊसधारा जीवनाच्या वाटेवरती खेळ रंगतो न्यारा सभोवताली उभे राहिले आनंदाचे ठेले चिंब होऊनी कायेसंगे मनही बावळे झाले...

(कमलाकर राऊत)

Comments
Add Comment