Tuesday, May 6, 2025

रिलॅक्सकोलाजसाप्ताहिक

काव्यांजली

काव्यांजली

तुझ्यात व्यस्त राहतो - डॉ. मनोज वराडे

तुझ्यात व्यस्त राहतो अजूनही अजूनही तुझा वसंत मागतो अजूनही अजूनही!

सुखावतो सखे मला तुझा विचार सारखा तुला कवेत पाहतो अजूनही अजूनही!

गुलाब कस्तुरी नको, सुगंध चंदनी नको तुझाच गंध भावतो अजूनही अजूनही!

कितीक आर्जवे करू,वळून तू पहा जरा... तुला पुन्हा खुणावतो अजूनही अजूनही!

झरे अनेक वाहती...किती किती भिजायचे? तुझ्या स्मृतीत न्हाहतो अजूनही अजूनही!

दुरावलीस का अशी? प्रमाद सांग कोणता? पुन्हा पुन्हा विचारतो अजूनही अजूनही!

अनंतातून अनंताकडे- स्वाती गावडे, ठाणे

मनाचे तरंग सूर्याचे किरण अनंतातून अनंताकडे

चांदण्यांचा साज चंद्राचं तेज अनंतातून अनंताकडे

पृथ्वीची गती सागराची भरती-ओहोटी अनंतातून अनंताकडे

रिमझिम पाऊस अवखळ झरे अनंतातून अनंताकडे

जन्माचा जल्लोष मृत्यूचा सोहळा अनंतातून अनंताकडे

श्वास उच्छवास परमात्म्याचा वास अनंतातून अनंताकडे

Comments
Add Comment