Saturday, May 3, 2025

मनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Laapataa Ladies : भारताकडून ‘लापता लेडीज’ ऑस्करसाठी नॉमिनेट!

Laapataa Ladies : भारताकडून ‘लापता लेडीज’ ऑस्करसाठी नॉमिनेट!

किरण रावची स्वप्नपूर्ती, २९ चित्रपटांमधून निवड

मुंबई : किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवले होते. चित्रपट समीक्षकांपासून ते बॉलीवूडप्रेमींपर्यंत प्रत्येकाला या सिनेमाची अनोखी गोष्ट भावली होती. अखेर किरण रावच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने ‘लापता लेडीज’ हा चित्रपट ऑस्करसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवला आहे.

९७ व्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ‘ऑस्कर २०२५’ साठी भारताकडून ‘लापता लेडीज’ची निवड करण्यात आली आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय ( विदेशी ) चित्रपट श्रेणीसाठी ‘लापता लेडीज’ या चित्रपटाला भारताकडून नामांकन मिळाले आहे. यासंदर्भात ‘द फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’च्या सदस्यांनी अकादमी पुरस्कारांसाठी भारताच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा केली आहे.

फिल्म फेडरेशनकडून लापता लेडीजसह एकूण २९ चित्रपट पाठवण्यात आले होते. यात रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’, कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’, प्रभासचा ‘कल्की २८९८ एडी’, मल्याळम चित्रपट ‘आट्टम’, राजकुमार रावचा ‘श्रीकांत’, कान्स फेस्टिव्हलमध्ये बाजी मारणाऱ्या ‘ऑल वी इमेजिन ॲज लाइट’ यांसारख्या चित्रपटांचा या २९ चित्रपटांच्या यादीत समावेश होता. मात्र, आमिर खानच्या प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘लापता लेडीज’ने यात बाजी मारली आहे. आसामी दिग्दर्शक जाहनु बरुआ यांच्या अध्यक्षतेखालील १३ सदस्यांच्या निवड समितीने एकमताने किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’चा अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय ( विदेशी ) चित्रपट श्रेणीत समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘लापता लेडीज’ जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल ही आशा

आमचा ‘लापता लेडीज’ हा चित्रपट अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवडला गेला याचा मला खूप आनंद होत आहे. माझ्या संपूर्ण टीमच्या अथक परिश्रमामुळे आज हे यश आम्हाला मिळाले आहे. मला आशा आहे की, हा चित्रपट भारताप्रमाणेच जगभरातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, असे लापता लेडीज चित्रपटाचे दिग्दर्शिका किरण राव यांनी म्हटले.

Comments
Add Comment