
कथा - प्रा. देवबा पाटील
आज परी खूपच आनंदात होती. तिने आपल्याजवळील चहा यशश्रीला दिला व प्रश्न विचारण्यास सांगितले. “आपल्या आकाशगंगांमध्ये कृष्णविवरे असतात असे तुम्ही सांगितले, परीताई. काय आहेत ते?” “ यशश्रीने विचारले.” “अंतराळात दिसणाऱ्या काही काळ्या पोकळ्यांना कृष्णविवर असे म्हणतात. एखादी प्रचंड मोठी खगोलीय वस्तू स्वत:च्याच गुरुत्वाकर्षणाने संकुचित होत गेली तर एक परिस्थिती अशी निर्माण होते की, ती वस्तूच बाहेरून दिसेनाशी होते. कारण त्या वस्तूच्या पृष्ठभागावरचे गुरुत्वाकर्षण एवढे प्रचंड वाढते की, त्यामुळे प्रकाशसुद्धा त्या वस्तूकडे खेचला जातो. अशा वस्तूला कृष्णविवर म्हणतात. थोडक्यात कृष्णविवर म्हणजे अशी अफाट मोठी पोकळी की, जिचे गुरुत्वाकर्षण अचाट असते. त्यामुळे त्याच्या आसपास चुकूनही गेलेले तारे, ग्रह, उपग्रह वा धूमकेतू काहीही असो ते स्वत:च्या केंद्राकडे खेचून घेते व त्याला गिळंकृत करते. शास्त्रज्ञ सांगतात की, कृष्णविवरात काहीही गेले तर ते परत तर येतच नाही पण त्याचा नंतर मागमूसही लागत नाही. त्यात ते नाहीसे होते, नष्टच होते.”
“परीने सांगितले.” “बापरे ! भयानकच आहेत ही कृष्णविवरे.” “यशश्री म्हणाली.” “हो, तसेच महाभयानक आहेत ते. शास्त्रज्ञांच्या मते कृष्णविवरे म्हणजे काही विझणाऱ्या ताऱ्यांचे अर्थात ज्यांचे अस्तित्व नष्ट होत आलेले आहे अशा ताऱ्यांचे हे अवशेष असतात. पण आता तू मला तुझ्या सूर्यमालेतील नवग्रह कोणते आहेत ते सांग बरं?” “परीने विचारले.”
“हो सांगते ना!” “यशश्री सांगू लागली, “आमची पृथ्वी, मंगळ, बुध, गुरू, शुक्र, शनी, युरेनस, नेपच्यून व प्लुटो हे नवग्रह आहेत आमच्या सूर्यमालेत. त्यांपैकी काही ग्रहांना आमच्या चंद्रासारखे उपग्रहही आहेत, काहींना नाहीत. जसे स्वत:भोवती फिरताना ग्रह सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाने त्याभोवती फिरतात. तसेच ग्रहांच्या गुरुत्वाकर्षणाने उपग्रह हेसुद्धा स्वत:भोवती व त्यांच्या ग्रहांभोवती फिरतात.”
“का गं यशश्री! या ग्रहांची फिरताना एखाद् वेळी टक्करही होत असेल?” परीने जणू काही यशश्रीची परीक्षाच घेणे सुरू केले.
“त्यांची टक्कर झाली तर आमची पृथ्वी कशी राहील? त्यांची टक्करच होत नाही कारण सूर्यापासून त्यांचे अंतरही वेगवेगळे आहे आणि सूर्याभोवतीच्या त्यांच्या लंबवर्तुळाकार भ्रमणकक्षाही निरनिराळ्या आहेत.” “यशश्रीने सांगितले.” “मग तुला त्यांचे सूर्यापासूनच्या अंतरानुसार क्रमही माहीत असतील?” “परीने विचारले.”
“हो. आहे ना माहीत.” “यशश्री उत्साहाने सांगू लागली,“सूर्याच्या सर्वात जवळ बुध ग्रह आहे. नंतर शुक्र, त्यानंतर आमची पृथ्वी आहे. त्यापुढे क्रमाने मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून व शेवटी प्लुटो सर्वांत दूर आहे.”
“ तुला तर बरीच माहिती आहे गं.” “ परी पुढे म्हणाली,” “मग त्यांपैकी साध्या डोळ्यांनी कोणते ग्रह दिसतात सांग बरं!” “हो, सांगते ना.” म्हणत यशश्री आनंदाने पुढे बोलू लागली, “बुध, शुक्र, मंगळ, गुरू, शनी हे ग्रह डोळ्यांनी दिसतात. बऱ्याचदा मंगळ व शुक्र हे ग्रह रात्री डोळ्यांनीच दिसतात. गुरू व शनीही कधीकधी दिसतात.” “ तुमच्या सूर्यमालेतील सर्वात लहान व सर्वात मोठा ग्रह कोणता आहे यशश्री?” “परीने विचारले.”
“बुध हा आकाराने सर्वात लहान असल्याने तो सर्वात जास्त वेगाने फिरतो व तोही कधी कधी डोळ्यांनी दिसतो. गुरू हा आकाराने सर्वात मोठा असून त्यावर निरनिराळे गडद रंगांचे पट्टे आहेत.” “ छान, तांबडा ग्रह व सर्वात तेजस्वी ग्रह कोणता सांग बरे.” “परी म्हणाली.” “ मंगळाच्या खडकांत तांबडे लोहसंयुग असल्याने तो तांबड्या रंगाचा दिसतो. शुक्रावरील ढग जास्त प्रकाश परावर्तित करतात व त्याचे आमच्या पृथ्वीपासूनचे अंतर सर्वांत कमी असल्याने शुक्राची चांदणी म्हणजे शुक्र ग्रह जास्त तेजस्वी दिसतो.” “यशश्रीने सांगितले.”
“बरे सुंदर कडे कोणत्या ग्रहाला आहेत.” “परीने जणूकाही यशश्रीची मुलाखतच घेणे सुरू केले.” “शनी ग्रहाभोवती बर्फाच्या खडकांचे सुंदर सात कडे आहेत. आकाराने शनी ग्रहाचा दुसरा नंबर लागतो.” “अरे व्वा तुला तर खरंच बरीच माहिती आहे गं.” “परी म्हणाली.” “माहिती अजून अपुरीच आहे परीताई. अजून तीन ग्रह सांगायचे राहिलेत.” “यशश्रीने म्हटले.” “सांग बरे, कोणते राहिलेत ते?”
“परीने म्हटले.” “युरेनस, नेपच्यून व प्लुटो. पण ते साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत, दुर्बिणीतूनच दिसतात.” “यशश्रीने सांगितले.” “बरोबर. खरेच तुझे सामान्य ज्ञान खूपच उत्तम आहे.” “परी आनंदाने म्हणाली आणि एकाएकी गुप्त झाली.” आणि यशश्री पलंगावरून खाली उतरली व आपल्या दिनचर्येला लागली.