Wednesday, May 7, 2025

कोलाजसाप्ताहिक

आवडत्या बाई

आवडत्या बाई

नक्षत्रांचे देणे - डॉ. विजया वाड

शाळेतील प्रत्येकाला वाटायचं की, आपल्याला इंदुलकर बाईंनी शिकवावं. नववी आणि दहावीला बाई मराठी नि इतिहास शिकवायच्या. इतकं छान शिकवीत की, मुलं दत्तचित्त ऐकत असत. उपमा, उत्प्रेक्षा अलंकारांनी त्यांची भाषा नटलेली असे. आवाज घंटेसारखा मधुर. मुख्य म्हणजे त्या कोणाला कमी लेखत नसत.

शाळेत इन्स्पेक्शन करायला काही तपासनीस आले. तेव्हा त्यांनी प्रश्न केला, ‘‘तुमच्या सर्वात आवडत्या बाई कोणत्या? किंवा शिक्षक असले तर ते कोण?’’ इंदुलकर बाई आम्हाला आवडतात, असं उत्तर त्यांच्या प्रत्येक तुकडीतील मुलांनी दिलं. तपासनीसांना उत्सुकता लागली, कोण या इंदुलकर बाई? “नवीनच आल्यात या वर्षी.” हेड मास्तर म्हणाले. “शिक्षकांना त्या आवडत नाहीत हो अजिबात” इति उप हेमा. “अहो क्लोज काँपिटिटर कोण?” हेमा टेकू देत म्हणाले. “अलीकडे त्यांच्याबद्दल एक वेगळीच तक्रार आलीय” इति हेमा. “कोणती हो?” तपासनीसांनी विचारलं. “त्या म्हणे पेपरच्या पेपर सोडवून घेतात, परीक्षेच्या आधी.” “सगळेच्या?” “नाही.” “मग?” “मराठी नि इतिहासाचे.” “अरे बापरे. धिस इज सीरियस.” तपासनीस म्हणाले. “बघा ना!” “तुम्ही खडसावा त्यांना.” “सोडतो की काय?” तपासनीस छाती फुगवून म्हणाले. “एकदम काढू बिढू नका.” “का नको? माझ्या हातात पॉवर आहे.” तपासनीस गुर्मीत म्हणाले. “अहो नको.” “तेच! का नको?”

“साहेब, मराठी शाळांचे वर्ग कमी कमी होताहेत. मी पहिलीपासून इंग्रजी घेतो वर्गात. शिवाय ब्रिटिश काऊंसिलमधली इंग्लिश मेम बोलावतो. शाळा मुंबईत आहे म्हणून हे शक्य होतय सर.” हेमा अजिजीनं म्हणाले.

“मला कल्पना आहे जो उठतो तो इंग्लिश मीडियमला आपला पोरगं पाठवतो. आता आपण पालक जागृती सेंटर कसं काढणार? मग मी शाळेतच ब्रिटिश बाईस शिकवायला बोलावून, माझ्या शाळेपुरता प्रश्न सोडवला आहे सर.” “हुशार आहात.” तपासनीस म्हणाले. त्यांच्या तरफदारीने हेमा चढून बसले. त्यांची छाती अभिमानाने फुगली. आता घरी गेलो की, बायकोला छाती फुगवून सांगू! मास्तरडा म्हणून हिणवतेस ना जेव्हा जेव्हा! एकांतात! आता बघ! … “शाळेत हुशार नि आवडते शिक्षक कोण? असं जेव्हा मी वर्गावर्गात विचारलं, तेव्हा एकच नाव सगळ्यांच्या ओठावर होतं.”

“त्या इंदुलकर बाई ना?” “अहो हो. इंदुलकर बाईच मला भारी उत्सुकता आहे त्यांना बघायची.” हेमांना अंतरी असूया वाटली. “अहो, त्यांच्याबद्दल इतर शिक्षकांनी तक्रार केली आहे.” “अहो सर, इतरांना त्यांची वाहवा कशी काय पचनी पडणार?” “हो. तेही खरंच म्हणा.” “तक्रार ऐकवा ना?” “सांगा मोकळं करा मन.” “त्या पेपर, म्हणजे परीक्षेचा हं! आधी दोन दिवस सांगतात. त्यांची आदर्श उत्तर फळ्यावर लिहून देतात. परिणाम? वर्ग डिस्टिक्शनमध्ये पास हो!”

“हे जरा अति होतंय! बोलवा त्यांना.” तपासनीस आता हजेरी घेणार, या कल्पनेने हेमांना आंतरिक आनंद झाला. आल्या की बाई. “अभिनंदन बाई. प्रत्येक मुलाने ‘मला इंदुलकर बाई आवडतात’ असं लिहून दिलंय म्हणून मुद्दाम बोलावलं.” “धन्यवाद सर.” “तुम्ही म्हणे पेपर सोडवून घेता. वर्गाकडून? परीक्षेच्या आधीच?” तपासनीस प्रश्न कर्ते झाले. “ती आदर्श उत्तरे मीच फळ्यावर लिहून देते सर.” “काय?” “हो. माझ्या बाळांच्या मनात परीक्षेची भीती राहू नये. अशी माझी प्रामाणिक इच्छा असते.” “तरी सुद्धा आधीच परीक्षेचा पेपर सांगणे, ही चूक आहे आणि चूक ती चूकच.” तपासनीस करडे झाले. “शिक्षण म्हणजे काय?” “एक आनंददायी अनुभव.”

“मग माझा प्रत्येक विद्यार्थी आनंदी असावा, या इच्छेने मी सारा पेपर आदर्श उत्तरासकट फळ्यावर लिहिते. विद्यार्थी तो उतरवितात ऑपशनसकट. पाठ करतात. परीक्षेच्या टेन्शनचे मागमूसही उरत नाही. आपल्याला छानच गुण पडणार, ही खात्री. पालकांचा मार खावा लागणार नाही, याचीही खात्री. शिवाय कॉपी केस एकही नाही. मला आणखी काय हवं!” तपासनीस बघतच राहिले. शिक्षण-परीक्षा-पेपर-ताण यावर उतारा सापडला होता.

Comments
Add Comment