
'या' जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मान्सून (Monsoon) संपूर्ण राज्यात सक्रिय झाला आहे. मात्र काही भागात पावसाने अजूनही हजेरी लावली नाही. राज्यभरात पावसाची उघडझाप सुरु असताना मुंबईत मात्र पावसाने ब्रेक घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. मुंबईत या आठवड्यात जोरदार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. (Mumbai Rain) मात्र, हवामान विभागाचा हा अंदाज चूकीचा ठरला असून मागील दोन दिवसांपासून मुंबईकरांच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. त्यासोबत तापमानातही वाढ झाली आहे. अशा बदलत्या वातावरणामुळे नागरिक पुन्हा हैराण झाले आहेत.
राज्यात पाऊस ये-जा करत असून हवामान विभागाने अंदाज वर्तवूनही मुंबईकडे मात्र पावसाने सपशेल पाठ फिरवली आहे. त्यानंतर आज पुन्हा हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा दिला असून अलर्ट जारी केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यातही वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसेल. तसेच मुंबईत पुढील पाच दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मुंबई, ठाणे, पुण्याला यलो अलर्ट
हवामान विभागाकडून ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तर विदर्भातील नागपूर, वर्धा अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांनाही वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. त्यासोबत उद्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग, आणि २८ जून रोजी रत्नागिरी, रायगड येथे पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित जिल्ह्यांतही पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आज धुळे, नंदुरबार आणि नाशिकमध्ये मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.