Saturday, May 10, 2025

महामुंबईमनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा पुन्हा अडचणींच्या विळख्यात!

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा पुन्हा अडचणींच्या विळख्यात!

फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्यावरील अडचणींचे सत्र सुरुच असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्यावर असलेल्या केसेस न्यायालयात सुरु असताना आणखी एका प्रकरणात त्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. मुंबईच्या एका सराफा व्यापाऱ्याने सोनं गुंतवणूक योजनेत शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रावर फसवणुकीचा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे हे दोघे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध एका सराफा व्यापाऱ्याने फसवणुकीचा आरोप केला आहे. यावर मुंबई सत्र न्यायालयाने आरोपींची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. सराफा व्यापारी पृथ्वीराज कोठारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोप सिद्ध झाल्यास पोलिसांनी या प्रकरणात भादविच्या आवश्यक कलमांतर्गत एफआयआर नोंदवावा, असे सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एनपी मेहता यांनी सांगितले.

योजनेंतर्गत गुंतवणूकदारांची फसवणूक

सराफा व्यापाऱ्याच्या वतीने वकील हरिकृष्ण मिश्रा आणि विशाल आचार्य यांनी केलेल्या तक्रारीनुसार, कुंद्रा आणि शेट्टी यांनी २०१४ मध्ये एक योजना आणली होती. या योजनेंतर्गत गुंतवणूकदारांनी अर्ज केल्यावर सवलतीच्या दराने सोन्यासाठी संपूर्ण रक्कम अगोदर भरणे आवश्यक होते. त्यानंतर, मुदत पूर्ण झाल्यानंतर ठरलेल्या तारखेला सोन्याचे निर्देशित प्रमाणात वितरण केले जाईल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार, तक्रारकर्त्यांनी ५,००० ग्रॅम २४ कॅरेट सोने मिळण्याची अपेक्षा ठेवून ५ वर्षाच्या योजनेत ९० लाख ३८ हजार ६०० रुपये गुंतवले होते.

मात्र योजनेनुसार अपेक्षित असलेले सोने ठरलेल्या तारखेला वितरित केले गेले नाही. हा आरोपींनी कट रचला असून त्यांनी फसवणूक केली आहे आणि विश्वासार्हतेचा भंग केला आहे, असे म्हटले आहे.

दरम्यान याबाबत शिल्पा आणि राज यांच्याकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आले नाही. या आधीही राज कुंद्रावर पोर्नोग्राफिक सिनेमा बनवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्यामुळे याबाबत काय निकाल लागतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment