Monday, May 12, 2025

किलबिलसाप्ताहिक

उल्का

उल्का

कथा - प्रा. देवबा पाटील

परी व यशश्री या दोघींच्या ज्ञान-विज्ञानाच्या गप्पा सुरू होत्या. अचानक काही तरी आठवल्यासारखे विचार करीत, “आमच्या सूर्यमालेसारखे तुमच्या मित्रमालेत किती ग्रह आहेत परीताई?” यशश्रीने विचारले. “तुमच्या सूर्यमालेत किती ग्रह आहेत, सांग बरं?” परीने यशश्रीला विचारले. “नऊ आहेत.” यशश्री उत्तरली.

“तुमची नवग्रहांची सूर्यमाला आहे, तर आमची मित्रमाला दशग्रहांची आहे.” परी सांगू लागली, “पण तुमच्या सूर्यमालेत किंवा आमच्या मित्रमालेत नुसते ग्रहच नाहीत, तर ग्रहांचे उपग्रह, लघुग्रह, उल्का व धूमकेतू असे सारे आहेत.” “या उल्का कशा बनल्यात परीताई?” मध्येच यशश्रीने विचारले.

परी पुढे म्हणाली, “ब­ऱ्याचदा रात्री निरभ्र आकाशात क्षणात एखादी प्रकाशरेखा चमकून जाताना दिसते. त्यालाच उल्का म्हणतात. उल्का म्हणजे सूर्याच्या स्फोटातून निर्माण झालेले खडकधुळीचे तुकडे नि गोळे आहेत. ते सतत सूर्याभोवती फिरत असतात व फिरता फिरता कधी-कधी पृथ्वीच्या कक्षेत येतात. पृथ्वीच्या कक्षेत आल्यावर, ते पृथ्वीच्या गुरुत्वबलाने पृथ्वीकडे जोराने खेचल्या जातात. त्याने ते खूप वेगाने पृथ्वीकडे येतात. खूप वेगाने येताना, त्यांचे हवेसोबत घर्षण होते. त्या घर्षणाने ते खूप तापतात व जळून खाक होतात. जळताना ते क्षणभर चमकतातही. चमकताना त्यांचा क्षणभर प्रकाश पडतो. त्यालाच उल्का वा उल्कापात किंवा तारा तुटणे असे म्हणतात. तू हाच प्रश्न तुझ्या बाबांना आता थोड्या वेळापूर्वी गच्चीवर विचारला होता ना?” परीने विचारले.

“हो परीताई. तुला कसे गं हे माहीत?” यशश्रीने आश्चर्याने विचारले. “अगं, तुमच्या बोलण्याच्या लहरी माझ्या डोक्यावर लावलेल्या ग्राहक उपकरणाच्या या आकाशीयांनी खेचल्या होत्या. एवढी आमची उपकरणे प्रगत आहेत.” असे म्हणत, तिने आपल्या डोक्यावरील दोन तिरप्या आकाशीयांकडे (अॅन्टेनांकडे) बोट दाखविले. “त्यांना वाईट का म्हणतात परीताई?” यशश्रीने शंका काढली. परी म्हणाली, “तुम्ही ज्या उल्कापाताला वाईट म्हणतात ना, त्यात वाईट असे काहीच नसते, तर आकाशातील ती एक घटनाच असते फक्त.”

“उल्कावर्षाव कसा होतो मग?” यशश्रीने विचारणा केली. “कधी कधी उल्कापात होताना, असंख्य उल्कांच्या झुंडीच्या झुंडी एकाच वेळी पृथ्वीकडे धाव घेतात, त्यामुळे पृथ्वीवर त्यांचा वर्षावच होत आहे असे दिसते.” परीने उत्तर दिले. “तारा कसा काय तुटतो? आणि इतके असंख्य तारे तुटताना दिसतात, तर मग आकाश ओस का पडत नाही?” यशश्रीने लागोपाठ दोन प्रश्न विचारलेत.

“खरे तर इतक्या मोठ्या संख्येने तारे तुटून खाली पडले असते, तर आपली पृथ्वीच राहली नसती व आकाशही केव्हा ना केव्हा तरी त्यातील इतके तारे तुटल्यामुळे ओस पडलेच असते; पण जे तारे आपणास तुटताना दिसतात, ते मुळी तारे नसतातच, तर त्या उल्का असतात. सूर्याभोवती फिरणारे छोटे-मोठे खडक-दगडांचे तुकडे फिरता फिरता, जेव्हा पृथ्वीच्या कक्षेत येतात, तेव्हा ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीकडे ओढल्या जातात. ते पृथ्वीकडे येताना वातावरणात हवेसोबत घासल्या जातात व त्या घर्षणाने तापतात नि जळून खाक होतात. जळताना ते क्षणभर चमकतात. त्यांनाच उल्का किंवा तारा तुटला असे म्हणतात.” परीने खुलासा केला.

“पण त्यांचाही रंग तर वेगवेगळा दिसतो ना परीताई?” यशश्रीने विचारले. “तू स्वत: बघितले का गं एवढे बारीकपणे?” परीने विचारले. “हो परीताई, आम्ही उन्हाळ्यात दररोज रात्री गच्चीवरच झोपतो. त्यावेळी आम्ही ब­ऱ्याच वेळा तारा तुटताना बघतो.” यशश्री म्हणाली.

परी सांगू लागली, “या उल्का खाली येताना, ज्यांचा वेग कमी असतो, त्यांचे घर्षण कमी होते व त्या तांबूस दिसतात. ज्यांचा वेग थोडा जास्त असतो, त्या पिवळसर दिसतात, तर ज्यांचा वेग अतिजास्त असतो, त्या निळसरशुभ्र दिसतात. पृथ्वीच्या वातावरणात दररोज अशा खूप उल्का प्रवेश करतात; पण त्यापैकी जास्तीत जास्त पृथ्वीवर पोहचण्यापूर्वीच वरच जळून खाक होतात. त्यांचे रुपांतर धूळ किंवा राखेत होते व फारच अल्प खाली पृथ्वीवर पोहोचतात.” “मग अशनी म्हणजे काय असते?” यशश्रीने प्रश्न केला.

“कधी कधी या उल्का वर पूर्णपणे न जळता, खाक न होता, पृथ्वीवर तशाच खडक-दगडाच्या रुपात जमिनीवर पडतात व त्यांना तुम्ही अशनी किंवा उल्का पाषाण अथवा अशनीखंड असे म्हणतात; परंतु आकाराने खूप मोठ्या अशनी जर आपल्या ग्रहावर पडल्या, तर मात्र त्या एखादे वेळी नुकसानही करतात.” परीने सांगितले.

“आज आपण उल्कांची पूर्णपणे माहिती बघितली. उद्या धूमकेतूची बघू.” असे म्हणून परीने त्या दिवशीची चर्चा थांबवली व आपल्या मार्गे निघाली.

Comments
Add Comment