
ज्या दिवशी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर केली, तेव्हाच त्यांचा विजय निश्चित झाला होता. नारायण राणे यांचे नाव जाहीर होताच, उबाठा सेनेत मोठी खळबळ माजली व राणेंच्या विरोधात निवडणूक लढणे सोपे नाही, याची त्यांना जाणीवही झाली. म्हणूनच राणे व त्यांच्या परिवारावर वाट्टेल तसे आरोप करणे आणि सोशल मीडियातून तसेच कुजबूज मोहिमा राबवत अफवा पसरविणे असे चाळे उबाठा सेनेने भरपूर केले. राणेसाहेब निवडून येत नाहीत, राणे यांचा पराभव होणार, या पूर्वीही पराभव झाला आणि आता पुन्हा होणार अशी कुजबूज मोहीम उबाठा सेनेने जोरदार चालवली होती. प्रत्यक्षात जवळपास पन्नास हजारांचे मताधिक्य मिळवून नारायण राणे लोकसभा निवडणुकीत निवडून आले व त्यांना विजयी झाल्याचे निवडणूक आयोगाकडून प्रमाणपत्रही मिळाले.
नारायण राणे हे लोकसभेवर निवडून गेले याचाच दुसरा अर्थ कोकणचा आवाज लोकसभेत पोहोचणार आहे. कोकणचा वाघ कोकणवासीयांनी लोकसभेत पाठवला आहे. आमचा खासदार म्हणून मतदारांनी जनादेश नारायण राणे यांना दिला आहे. गेली दहा वर्षे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचा जो कोणी खासदार म्हणून लोकसभेत प्रतिनिधित्व करीत होता, त्याला लोक कंटाळले होते, त्याने कोकणच्या विकासासाठी काय केले, कोकणचे कोणते प्रश्न सोडवले, लोकांना तो किती उपलब्ध होता, असे प्रश्न निवडणूक काळात मतदार विचारत होते. पण राणे परिवाराला सतत विरोध करण्यात मग्न असलेल्या मावळत्या खासदारांना कशाचेच सोयरसुतक नव्हते. केवळ मातोश्रीला खूश करण्यासाठीच त्यांनी राणे परिवाराला शत्रू मानून त्यांना सतत विरोध करायचा हे धोरण अवलंबिले होते. दहा वर्षांत लोकसभेवर प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदाराकडून कोकणाला काय मिळाले, या प्रश्नाचे उत्तर शोधले तर शून्य असे उत्तर मिळते. मावळत्या लोकसभेतील उबाठा सेनेच्या खासदाराविषयी लोक नाराज होते, त्याचा राग यंदाच्या निवडणुकीतून मतपेटीतून बाहेर पडला व त्या माजी खासदाराला मतदारांनी अद्दल घडवली.
नारायण राणे आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते होते. भाजपाने त्यांची कामगिरी व उपयुक्तता बघून राज्यसभेवर खासदार केले व केंद्रात ते मोदी सरकारमध्ये मंत्रीही झाले. राणेसाहेब कुठेही कोणत्याही पदावर असले तरी त्यांचे सदैव लक्ष कोकणावर असते. विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यावर असते. घार हिंडते आकाशी तिचे लक्ष पिल्लांपाशी, तसे राणेसाहेबांचे आहे. केंद्रात मंत्री असतानाही कोकणच्या विकासाठी त्यांनी अनेक विकास योजना आणल्या. कोकणात विमानतळाबरोबरच उद्योग, रोजगार नवे प्रकल्प कसे येतील यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. कोकणात आपल्या खात्याचे प्रकल्प कसे येतील यावर त्यांचा कटाक्ष होता. कोकणात केंद्रीय व राज्याच्या योजना कशा ओढून आणता येतील याचा त्यांनी सदैव विचार केला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोकणवासीयांना नेमके काय हवे आहे हे त्यांना ठाऊक असते व त्या दृष्टीने ते नेहमीच जागरूक असतात.
लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्हा राणेसाहेबांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला. जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांतून राणे यांना चांगले मताधिक्य मिळाले. रत्नागिरी जिल्ह्याने तशी साथ दिली असती, तर राणेसाहेबांचे मताधिक्य लाख-दीड लाखांवर गेले असते. भारतीय जनता पक्षाची सर्व संघटना या निवडणुकीत जबरदस्त राबली. निलेश राणे, नितेश राणे, सौ. निलमवहिनी साऱ्या राणे परिवाराने प्रचारात वाहून घेतले होते. राणे यांना मानणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांनी दीड-दोन महिने अथक परिश्रम घेतले. कोकणचा सुपुत्र म्हणून तेथील जनतेचे नारायण राणेंवर प्रेम आहेच पण कोकणचा लढाऊ नेता म्हणून कोकणवासीयांना त्यांच्याविषयी जबर अभिमान आहे.
लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांना भाजपाने उमेदवारी दिली हा अत्यंत योग्य निर्णय होता, असे प्रत्येक जण बोलत होता. स्वत: राणेसाहेब निवडणूक लढवत होते म्हणून जुने शिवसैनिकही त्यांच्यासाठी प्रचारात पुढे आले. नारायण राणे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संस्कारात वाढलेले शिवसैनिक आहेत, त्यामुळे जुन्या शिवसैनिकांचे त्यांच्यावर आजही तेवढेच प्रेम आहे, हीच भावना मतदानातून प्रकट झाल्याचे बघायला मिळाले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात चाळीस वर्षांनी कमळ फुलले असे अनेक जण सांगत आहेत. अर्थात याचे श्रेय नारायण राणे यांच्या उमेदवारीला दिले पाहिजे. स्वत: राणे उमेदवार असल्याने जुने-नवे कार्यकर्ते आपणहून प्रचारात उतरले होते. नारायण राणे यांचा विजय म्हणजे कोकणच्या विकासाला दिलेला कौल अशीच प्रतिक्रिया व्यक्त झाली, यातच त्यांच्याविषयी जनतेच्या भावना प्रकट झाल्या आहेत. सार्वजनिक जीवनात नारायण राणे यांनी अनेक निवडणुका लढवल्या, पण विजयाने ते कधी हुरळून गेले नाहीत किंवा पराभवाने कधी खचले नाहीत. पाच दशकांच्या जनसेवेत त्यांनी कधीच खंड पडू दिला नाही. राणे यांना संसदेत जाणे हे काही नवीन नाही. ते सहा वर्षे राज्यसभेचे सदस्य होतेच.
आता लोकसभेत जाऊन कोकणच्या प्रश्नावर ते आवाज उठवतील. २०१४ च्या निवडणुकीत लागोपाठ तिसऱ्यांदा देशातील जनतेने केंद्रात एनडीए सरकार स्थापनेचा जनादेश दिला आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची हॅटट्रिक करणार आहेत कारण तसा मतदारांनी स्पष्ट कौल दिला आहे. नारायण राणे यांचा विजय म्हणजे मतदारांनी कोकणची प्रतिष्ठा जपली आहे. आपला विजय त्यांनी मतदारांना समर्पित केला आहे व कोकणवासीयांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही, अशी विनम्र भावनाही व्यक्त केली आहे. नारायण राणे यांच्या नव्या वाटचालीस ‘प्रहार’ परिवाराच्या वतीने मन:पूर्वक शुभेच्छा!