
मुंबईतील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरांपैकी वडाळा येथील विठ्ठल मंदिर हे एक आहे. हे मंदिर पुरातन असून ४०२ वर्षांपूर्वी उभारण्यात आल्याचे विश्वस्त सांगतात. या मंदिराच्या स्थापनेविषयीची गोष्ट ऐकण्यासारखी आहे. वडाळा गाव हे एक बेट होते. वडाळा या ठिकाणी विठ्ठलाचे मंदिर स्थापन झाले म्हणून या मंदिराला ‘प्रतिपंढरपूर’ देखील संबोधले जाते.
कोकणी बाणा - सतीश पाटणकर
महाराष्ट्र राज्यातील मुंबई शहरातील वडाळा या उपनगरात हे मंदिर आहे. ‘श्री विठोबा गणपती महादेव मंदिर’ असे या मंदिराचे नाव आहे. ४०० वर्षांचा जुना इतिहास या मंदिराला आहे, असे मानले जाते. विठुरायाचे दर्शन घेण्याच्या ओढीने देशातील विविध राज्यांतून आलेले वारकरी पायी चालत, पंढरपूरची वाट धरत असतात. टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर आणि ‘ग्यानबा तुकारामा’च्या जयघोषात विठुरायाचे नामस्मरण करीत, वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन पंढरपुरात पोहोचत असतात. प्रत्येक विठ्ठल भक्ताला या विठ्ठलाचे दर्शन व्हावे, असे वाटत असते; परंतु प्रत्येकालाच वारीला जाण्याची संधी मिळतेच असे नाही. त्यामुळेच मुंबईकर व शहराच्या शेजारील भक्तांना या विठुरायाचे दर्शन व्हावे, यासाठी ४०० वर्षांपूर्वी मुंबईत वडाळा या ठिकाणी विठ्ठलाचे मंदिर स्थापन झालेले आहे. या मंदिराला ‘प्रतिपंढरपूर’ देखील संबोधले जाते.
मुंबईतील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरांपैकी वडाळा येथील विठ्ठल मंदिर हे एक आहे. हे मंदिर पुरातन असून ४०२ वर्षांपूर्वी उभारण्यात आल्याचे विश्वस्त सांगतात. या मंदिराच्या स्थापनेविषयीची गोष्ट ऐकण्यासारखी आहे. मुंबई सात बेटांची आहे. त्यातील वडाळा गाव हे एक बेट होते. तेव्हा वडाळा गाव हे मिठागरासाठी प्रसिद्ध होते. या मिठागरात ब्राह्मण, लमानी, शेतकरी व कोळी-आगरी अशी अनेक लोकं राहत होती. मिठाचा व्यापार करणे हा त्या परिसरातील लोकांचा व्यवसाय होता. व्यापार करणारे व्यापारी हे विठ्ठलाचे आणि तुकारामांचे भक्त होते. ते नित्यनेमाने पंढरपूरच्या वारीला जात असत. एका वारीत पंढरपूरला गेले असताना स्नान करताना त्यांना एक दगड दिसला. तो दगड पंढरपुरातून त्यांनी वडाळा गावात घेऊन आले. जेथे तळ होते, त्या ठिकाणी ते दगड ठेवून विठ्ठल-रखुमाईचे मंदिर स्थापन केले. मुंबईतील व मुंबई शेजारील शहरातील ज्यांना पंढरपूर येथे जाणे शक्य होत नाही, त्यांच्यासाठी हे मंदिर एक प्रतिपंढरपूर म्हणून उभे केले.
मंदिरात आषाढी एकादशीला लाखो भाविक गर्दी करतात. मुंबईतील कुलाबा आणि अनेक ठिकाणांहून येथे वारकऱ्यांच्या दिंड्या पायी चालत येतात. आषाढी एकादशीच्या निमित्ताने विश्वस्त या ठिकाणी जत्रेचे आयोजन करतात. तसेच आषाढी एकादशीला भजन व कीर्तनाचे मोठे कार्यक्रम येथे आयोजित केले जातात. हे संपूर्ण मंदिर संगमरवरी दगडाचे आहे. मंदिरात प्रथम प्रवेश करताना, आपल्या नजरेस काळ्या पाषाणातील गरूड देवाची मूर्ती दृष्टीस पडते. पुढे गेल्यानंतर मुख्य गाभाऱ्यात विठुरायाचे दर्शन घडते. सुंदर काळ्या पाषाणातील विविध आभूषणे आणि अलंकाराने नटलेल्या विठ्ठल-रखुमाईची ती मूर्ती आहे. या मंदिराच्या उजव्या बाजूला महादेवाचे मंदिर असून, डाव्या बाजूला गणपतीचे मंदिर आहे. तसेच हनुमानाचे देखील मंदिर आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी या मंदिरात पांडुरंग आणि रुक्मिणी देवीची विशेष पूजा आयोजित केली जाते. मुंबई आणि परिसरातून वारकरी आपापल्या दिंड्या घेऊन मंदिराला भेट देतात. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दिवशी येथे विशेष जत्रा भरते.
मंदिरात पहाटे काकड आरती, दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता व ९.३० वाजता शेजारती होते. दशमीपासून या मंदिरात भजन सुरू होऊन, ते आषाढी एकादशीच्या रात्रीपर्यंत सुरू असते. आषाढीला लाखो वैष्णवांचा मेळा या मंदिरात हरी नामाचा जप करत असतो. तसेच मंदिरात विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तींची पूजा आषाढी एकादशीला विश्वस्त व राजकीय पुढारी व्यक्तींच्या हस्ते केली जाते.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)