Tuesday, May 6, 2025

संपादकीयरविवार मंथन

व्यावसायिकांना स्वयंपूर्ण करणारी सोशल आंत्रप्रेनिअर

व्यावसायिकांना स्वयंपूर्ण  करणारी सोशल आंत्रप्रेनिअर

दी लेडी बॉस:अर्चना सोंडे

लहानपणी मधमाशांचे मोहोळ पाहिले होते. आपण खातो तो मध तयार करण्यासाठी एक मोहोळमध्ये तब्बल ६० हजार मधमाशा झटतात. या ६० हजार मधमाशांचे नेतृत्व करते ती त्यांची राणी. पृथ्वीतलावरील अत्यंत कष्टाळू संजीवांपैकी एक असणाऱ्या मधमाशांना दिशा दाखविण्याचे काम त्यांची राणी करत असते. तिचं कामसुद्धा असंच काहीसं आहे. तिने अशाच तब्बल दीड लाख कष्टाळू उद्योजिकांना एकत्र आणले. त्यांना उद्योग-व्यवसाय करण्यासाठी मंच निर्माण करून दिला. आज त्या लाखो उद्योजिका तिच्या नेतृत्वाखाली समर्थपणे आपल्या उद्योग-व्यवसायाची भरभराट करत आहेत. उद्योजिकांना एकत्र आणणारी ती म्हणजे विलेपार्ले क्लबची संस्थापिका सोशल आंत्रप्रेनिअर रसिका जोशी-फेणे.

विलेपार्ले क्लबच्या स्थापनेची गोष्टसुद्धा रंजक आहे. अनोळखी परिसरात राहायला गेल्यावर आपल्याला घरकामगार ताईपासून डॉक्टर, हॉटेल्स, शाळा, ट्युशन्स घेणारी मंडळी, शिंपी, प्लम्बर, किराणावाला यांसारख्या दैनंदिन आयुष्यात महत्त्वाच्या ठरणाऱ्या व्यक्तींची, संस्थांची माहिती नसते. एखाद्याला विचारायचे कसे...’ या प्रश्नाने आपण नेहमीच गोंधळून जातो. रसिकासुद्धा या चक्रातून गेली पण तिने त्यावर तोडगा म्हणून २०१७ मध्ये ‘विलेपार्ले क्लब’ या मदत गटाची सोशल माध्यमावर स्थापना केली. त्या अंतर्गत तिने ‘विलेपार्ले वुमेन्स ग्रुप’ सुरू केला. सुरुवातीला या ग्रुपमध्ये फक्त ५० सभासद होते. या ग्रुपमध्ये विलेपार्ले परिसरात राहणाऱ्या सर्व उपयुक्त व्यक्तींची, संस्थांचे तसेच ठिकाणांची माहिती थोडक्यात त्यांच्या संपर्क क्रमांकासहित संकलित केलेली होती.

‘विलेपार्ले क्लब’च्या अंतर्गत ‘विलेपार्ले वुमेन्स ग्रुप’ची उपयुक्तता खऱ्या अर्थाने वाढली ती २०२० मध्ये आलेल्या कोरोना या महामारीच्या साथीमध्ये. तेव्हा बाहेर इतकी भीषण परिस्थिती होती की, प्रत्येकाचे बाहेर पडणे जिकिरीचे झाले होते. त्या कालखंडात विलेपार्ले आणि आसपासच्या परिसरासाठी ‘विलेपार्ले वुमेन्स ग्रुप’ची भरपूर मदत झाली. परिसरातील मंडळी या ग्रुपमुळे एकमेकांच्या संपर्कात राहिले. कोरोनाची नियमावली पाळून एकमेकांना एकमेकांची मदत झाली त्यामुळे लोकांमध्ये विश्वासार्हता वाढली.

या दरम्यानच्या काळात ‘विलेपार्ले क्लब’ने व्यावसायिक संधी देखील निर्माण केल्या. या ग्रुपवर लोकांना केटरिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, हँडीक्राफ्ट यांसारख्या ऑर्डर्स मिळू लागल्या. कोरोना काळात कित्येकांच्या रोजीरोटीचे साधन हा ग्रुप ठरला. सामाजिक मदतीसाठी सुरू केलेला ‘विलेपार्ले वुमेन्स ग्रुप’ हा आर्थिक कमाईचे व्यासपीठ ठरला. कालांतराने या ग्रुपवर विचारणा होऊ लागली की, एखादा व्यवसाय वाढवायचा असेल, तो लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर त्याचे प्रमोशन कसे केले पाहिजे, बिझनेस स्ट्रॅटेजीस कशा आखल्या पाहिजेत, महिलांसाठी, त्यातही महिला उद्योजिकांसाठी, महिलांच्या स्टार्टअपसाठी कोणते आणि कसे प्रयत्न केले पाहिजेत.

अनेक प्रश्न विचारले जात होते. ‘विलेपार्ले वुमन्स ग्रुप’सहीत ‘विलेपार्ले क्लब’, ‘दि वुमन्स सर्कल’, दादर क्लब, अंधेरी क्लब, बॅन्ड्रा क्लब, सोबो क्लब, मुंबई क्लब, जुहू क्लब असे निरनिराळे फेसबुक कम्युनिटी सुरू झाल्या. त्यातील सभासदांची संख्या ही दीड लाखांच्या घरात आहे. सर्व ग्रुप सक्रिय आहेत हे महत्त्वाचं. या ग्रुपद्वारे रोजगार तर मिळतोच शिवाय सर्व सभासदांना एकत्र आणण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन देखील केले जाते.

जसे की, कार्निव्हल्स, आर्ट फेस्टिव्हल, फूड फेस्टिव्हल, अर्बन फ्ली, महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यशाळा, डोनेशन ड्राईव्हज, मुलांसाठी कार्यक्रम, प्रश्न मंजूषा स्पर्धा, सांगीतिक कार्यक्रम, महिलांसाठी फॅशन शो, गेमिंग इव्हेंट्स अशा अनेक स्पर्धा, कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या उपक्रमांना नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो.

खरंतर एका वेळेस एवढे ग्रुप चालवणे सोपे नाही. वेगळ्या विचारांची, स्वभावांची, शैक्षणिक पार्श्वभूमी असणारी, विविध आर्थिक स्थिती असणाऱ्या माणसांशी संपर्क ठेवणे सोपे नाही. मात्र सासर आणि माहेरच्या पाठबळामुळे ते शक्य झाले असल्याची भावना रसिका व्यक्त करते. रसिकाला समाजसेवेचे बाळकडू तिचे आई-वडील संजीवनी आणि अशोक जोशी यांच्याकडून मिळाले. एखाद्याला मदत करणे, एखादा कार्यक्रम, उपक्रम भरविण्याकरिता नियोजन करणे यात रसिकाच्या आई-बाबांचा हातखंडा होता. ते पाहतच रसिका लहानाची मोठी झाली. ‘नेतृत्व गुण’ हे जणू रसिकाच्या रक्तातच भिनले आहे.

पार्ले टिळक शाळेच्या इंग्रजी माध्यमातून शालेय शिक्षण पूर्ण करताना ती भरतनाट्यम शिकली. मुंबईच्या रूपारेल महाविद्यालयातून पदवी पूर्ण केल्यानंतर तिने मुंबई विद्यापीठातून कम्युनिकेशन आणि जर्नालिझम विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. हा अभ्यासक्रम पूर्ण करताना लोकसंपर्क आणि लोकसहभागाचे अप्रत्यक्षरीत्या शिक्षण मिळतच गेले. त्याचा उपयोग विलेपार्ले ग्रुप अंतर्गत विविध ग्रुप सुरू करताना तिला झाला. पेशाने सनदी लेखापाल असणारा पण शैक्षणिक क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या सी. ए. अनिरुद्ध फेणे या तरुणासोबत तिचा विवाह झाला. नवरा आणि सासू-सासरे नीता आणि भारत फेणे यांच्या भरभक्कम पाठिंब्यामुळे रसिकाला ‘विलेपार्ले ग्रुप’चे काम वाढवता आले.

आजच्या डिजिटल युगात नवीन माणसं जोडणे, जुन्यांसोबत संपर्क कायम ठेवत नवीन लोकांशी संपर्क वाढवणे, त्यांना नवनवीन व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणे यासाठी नेतृत्त्व कौशल्याची आवश्यकता असते. हे गुण रसिकांमध्ये आहेत. या गुणांच्या जोरावरच तिने मधमाश्यांप्रमाणे लाखो उद्योजिकांचे मोहोळ तयार केले आहे. उद्योजिकांना घडविणारी खऱ्या अर्थाने ती लेडी बॉस ठरली आहे. [email protected]

Comments
Add Comment