Monday, May 12, 2025

श्रध्दा-संस्कृतीसाप्ताहिक

Wamanrao Pai : मानवजातीच्या दुःखाचे मूळ

Wamanrao Pai : मानवजातीच्या दुःखाचे मूळ
  • जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै

परमेश्वराबद्दलचे अज्ञान हे मानवजातीच्या दुःखाला कारण आहे. मानवजातीच्या दुःखाचे मूळ आहे. परमेश्वराबद्दलचे जे आज लोकांमध्ये अज्ञान आहे, ते दूर व्हावे म्हणून मी हा विषय घेतलेला आहे. आस्तिक असला किंवा जरी नास्तिक असला तरी हे दोघेही या विषयाबद्दल अज्ञानी असतात. तो म्हणतो की, मी आस्तिक आहे व हा म्हणतो की, मी नास्तिक आहे, पण प्रत्यक्षात हा आस्तिक हा आस्तिक नसतो व तो नास्तिक हा नास्तिक नसतो. कारण काय? आस्तिक हा नास्तिक कधी होईल व नास्तिक हा आस्तिक कधी होईल हे सांगता येत नाही. संसारात सगळे काही ठीक चाललेले आहे, तोपर्यंत हा आस्तिक असतो व जरा संसारात काही बिघडले की, हा लगेच नास्तिक होतो व देवबिव सगळं झूट असे म्हणतो. हे सगळे देवाबद्दलच्या अज्ञानातून होते. सगळे जे काही चांगले होते, ते देवाच्या कृपेने व देवाचा कोप झाला की, संकटे येतात हा समजच चुकीचा आहे. परमेश्वर कृपाही करत नाही व कोप ही करत नाही. तो तुमच्या वाट्याला कधीच जात नाही. मला तुम्ही सांगा अनंतकोटी ब्रम्हांडे ज्याच्या पोटातून निर्माण झाली, तो निर्माण करत नाही, हा जीवनविद्येचा अभिनव सिद्धांत आहे. त्याच्याकडून निर्माण होतात, ते त्याला माहीतही नाही. अशा परिस्थितीत कोणी नवस केला, कोणी उपवास केला, कोणी यज्ञ केला, कोणी गंध लावले, कोणी गंध लावले नाही हे कोण बघत बसलेला आहे. परमेश्वर कोणाकडे बघत बसणार? तो अशा फालतू गोष्टींत लक्ष घालत नाही म्हणून आम्ही सिद्धांत मांडला की, परमेश्वर कृपाही करत नाही व कोपही करत नाही, तो दयाळू नाही व तो निष्ठूरही नाही. तो तुमच्या भानगडीतच पडत नाही, हस्तक्षेप करत नाही. तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारची लुडबुड तो करत नाही. हा जीवनविद्येचा सिद्धांत जर नीट लक्षात ठेवला, तर परमेश्वराबद्दलच्या सगळ्या अंधश्रद्धा गळून पडतील.

मला एकाने विचारले, परमेश्वर जर कृपाही करत नाही व कोप ही करत नाही, तर त्याच्यासाठी आम्ही हे सगळे का करायचे? चांगल्या माणसाने हा प्रश्न विचारला व प्रश्न ही चांगला आहे. देव जर कृपाही करत नाही व कोपही करत नाही, तर आम्ही देवासाठी कशाला करायचे? याचे पहिले उत्तर असे की, देवाने तुम्हाला येऊन सांगितले आहे की, माझ्यासाठी हे कर म्हणजे मी तुला पावेन. मध्येमध्ये लुडबुड करणारे जे लोक असतात, ते हे सांगतात. बुवा बाबा भागात फकीर हे सर्व तुम्हाला हे सांगतात. देवाने तुम्हाला येऊन सांगितले आहे का, की असे कर म्हणजे मी तुला पावेन? लोक हे समजूनच घेत नाहीत. कौल जो लावता तो काय देव देतो? कोकणातले लोक जेव्हा देवाला कौल लावतात, तेव्हा तो कौल काय देव देतो? या कारणाने एकाने तर आपली नोकरी गमावली. त्याला नोकरीचा कॉल आला होता. याने देवाला कौल लावला. नोकरीचा कॉल आला आहे, जाऊ की नको? कौल जाऊ नको असा आला. हा घरीच बसला व नोकरी गेली. कौल देव देत नाही, कौल देतो तो पुजारी. तोच सगळा थाट मांडतो. ते देव करत नाही. पाकळ्या लावल्या जातात, त्या देवाकडून की पूजाऱ्याकडून? उजव्याला बाजूचा कौल दे, डाव्या बाजूचा नको हे कोण सांगतो? हे सगळे कोण करतो? पूजारी करतो मग कौल कोणी दिला? पूजाऱ्याने. ही साधी गोष्ट लोकांना पटत नाही व सांगितलेली गोष्ट लोक समजून घेत नाहीत. बदलत्या परिस्थितीनुसार काही सवयी, विचार, परंपरांमध्ये बदल करणे आवश्यक असतो.

Comments
Add Comment