
पुढील तीन दिवस मुंबईसह 'या' राज्यांत वाढणार उकाडा
वेधशाळेकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन
मुंबई : देशभरात वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून मुंबईत उन्हाचा पारा प्रचंड वाढला आहे. त्यातच या तापमानाची वाढ आणखी तीन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे. मुंबईसह काही राज्यांत उकाडा वाढणार असल्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होणार असल्याचा सर्तकतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात अवकाळी पावसामुळे काही भागात गारवा पसरला आहे. मात्र मुंबईत निरभ्र आकाश आणि प्रखर सूर्यप्रकाशामुळे नागरिकांचा घामटा निघत आहे. मुंबई, ठाणे,पालघर, रायगडमध्ये आणखी दोन दिवस उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तापमान ३७ ते ३८ अंशांवर जाणार असून शनिवार, रविवार आणि सोमवारी उकाडा आणखी वाढणार आहे. तर २६, २७,२८ एप्रिल रोजी मुंबईसह पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात उन्हाचा पारा चढणार आहे. उकाडा वाढणार असल्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आवश्यक काळजी घेण्याचं आवाहन कुलाबा वेधशाळेकडून करण्यात आले आहे.
अशी घ्या काळजी-
- उन्हात गेल्यास डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा.
- पांढरे, सौम्य रंगाचे व सैल असणारे कपडे घाला.
- पुरेसे पाणी प्यावे. ताक, लिंबूपाणी अशा द्रव्य प्रदार्थांचा आहार घ्या.
- दुपारी १२ ते सायंकाळी ४ च्या दरम्यान बाहेर जाणे शक्यतो टाळा.