
पावस गावापासून हाकेच्या अंतरावर वसलेले निसर्गरम्य गाव म्हणजे गणेशगुळे. या गावात स्वयंभू गणेश अवतारल्यामुळे ‘गणेशगुळे’ हे नाव पुढे रूढ झाले. या मंदिराचे वैशिष्ट म्हणजे श्री गणेशासमोर बोललेल्या इच्छा पूर्ण होत असल्याने, या गणपतीला ‘इच्छापूर्ती गणेश’ म्हणूनही ओळखले जाते.
कोकणी बाणा - सतीश पाटणकर
राजापूर या महामार्गावर पूर्णगडकडे जाताना, रत्नागिरीपासून २२ किलोमीटर तर पावस गावापासून सहा किलोमीटर अंतरावर समुद्रकिनारी असलेले निसर्गरम्य गाव म्हणजे गणेशगुळे. पूर्वेला डोंगररांगा आणि पश्चिमेला अथांग अरबी समुद्र. हिरवीगार वनसंपदा लाभलेला सुंदर परिसर. आंबा, काजू, नारळी-पोफळीच्या बागांनी वेढलेला. अशा सुंदर परिसरात पूर्वेला असलेल्या टेकडीच्या माथ्यावर श्री गणेशांचे स्वयंभू स्थान आहे. रस्त्याच्या उजव्या हाताला मंदिराची दोन खरे दिसून येतात. उंचावर असलेल्या मंदिराच्या समोरच्या भागात खोल दरी आणि हिरव्यागार वनसंपदेने नटलेले सौंदर्य नजरेत भरते.
डोंगर उताराच्या बाजूने एका विस्तीर्ण चौथऱ्यावर दक्षिणाभिमुखी असलेले हे गणेशस्थान वसलेले आहे. काही पायऱ्या उतरून मंदिर परिसरात जाता येते. पायऱ्या उतरल्यावर उजव्या बाजूस मंदिर संस्थांचे कार्यालय आहे. मुख्य मंदिराच्या डाव्या हाताला पत्रे घातलेले खूप मोठे सभागृह असून, गाभाऱ्यासमोर बैठक व्यवस्था असलेले छोटे सभागृह आहे.
गाभाऱ्यासमोर एक तुळशी वृंदावन आणि हातात लाडू घेतलेल्या उंदराची पितळी मूर्ती आहे. सभागृह आणि गाभारा या दोन्हींवर कळस बांधलेले आहेत. या मंदिराच्या गाभाऱ्यात श्रीगणेशांची मूर्ती नसून, मध्यभागी असलेल्या ६ फूट उंचीच्या भल्या मोठ्या शिळेस स्वयंभू गणपती असल्याचे मानले जाते. फार पूर्वी गणपतीच्या नाभीतून अर्थात या स्वयंभू शिळेमधून पाण्याची संततधार वाहत असे. काही नैसर्गिक कारणांनी एके दिवशी हे पाणी अचानक बंद झाले, तेव्हापासून देवाने गणेश गुळ्याहून गणपतीपुळ्याला स्थलांतर केले, अशी आख्यायिका प्रचलित झाली.
समुद्रमार्गे व्यापार करणारे अनेक व्यापारी, कोळी या ठिकाणी व्यापार वाढीस जावा, तसेच समुद्रमार्गे होणारा गलबतांचा प्रवास सुरळीत व्हावा, म्हणून गणपतीला साकडं घालायचे. केलेला नवस पूर्णही व्हायचा, तेव्हापासूनच हा देव ‘गलबतवाल्यांचा गणपती’ म्हणून ओळखला जाऊ लागला. या मंदिराच्या निर्मितीबाबत एक आख्यायिका अशी सांगितली जाते की, फार पूर्वी ‘गणेशगुळे’ हे गाव ‘आगरमुळे’ या नावानं ओळखलं जात असे. अंदाजे ४०० वर्षांपूर्वी पावस येथील ग्रामस्थ वेदशास्त्रसंपन्न रामचंद्रपंत चिपळूणकर हे दशग्रंथी ब्राह्मण पोटशुळाच्या आजाराने त्रस्त होते. आजार विकोपाला गेल्याने, तसेच वेदना असह्य झाल्यामुळे, त्यांनी त्या वेळेच्या आगरगुळे गावाजवळील समुद्रात देहत्याग करण्याचा निश्चय केला. ते समुद्राच्या दिशेनं चालत जात असतानाच, वाटेत त्यांच्या वेदना इतक्या असह्य झाल्या की, पुढचे पाऊल देखील टाकवेना. वाटेतच ते एके ठिकाणी झुडपाशेजारी तसेच मरणासन्न अवस्थेत पडून राहिले. गणेशभक्त असल्याने, त्यांनी तेथेच श्री गणेशांच्या अनुष्ठानास आणि नामस्मरणाला प्रारंभ केला. २१ दिवसांनंतर त्यांना दृष्टांत झाला आणि काय आश्चर्य अल्पावधीतच ते व्याधीमुक्तही झाले. चिपळूणकर गुरुजींना झालेला साक्षात्कार आणि त्यांचा पोटशुळाचा आजार बरा झाल्याचे गावात समजल्यानंतर, अनेकांनी या गणेशाचे दर्शन घेतलं.
श्री गणेशासमोर बोललेल्या इच्छा पूर्ण होत असल्याने, हा गणपती ‘इच्छापूर्ती गणेश’ म्हणूनही ओळखला जातो. तेव्हापासून मूळचे आगरगुळे नाव असलेल्या या गावात स्वयंभू गणेश अवतारल्यामुळे ‘गणेशगुळे’ हे नाव पुढे रूढ झाले. गणपतीपुळे प्रमाणे या मंदिराला फारशी प्रसिद्धी प्राप्त झालेली नसली तरी मराठवाडा, विदर्भ, गोवा, पश्चिम महाराष्ट्रातून अनेक गणेशभक्त गणेशगुळेतील श्री गणेशांच्या दर्शनासाठी येत असतात. मंदिराचे स्वतःचे असे भक्त निवास नाही. मात्र या ठिकाणी भाविक आणि पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेऊन गावात समुद्रकिनारी असलेल्या हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये उत्तम व्यवस्था ठेवली जाते. काही ग्रामस्थांकडून घरगुती निवास भोजनाची व्यवस्था करण्यात येते. येथून रत्नगिरी शहर फक्त २२ किलोमीटर अंतरावर असून, तेथे आपल्या बजेटनुसार निवास, भोजनाची सोय होऊ शकते. गणेशगुळे गावाला सुमारे दोन कि. मी. लांबीचा सुंदर समुद्रकिनारा लाभलेला आहे. किनाऱ्यावर माड आणि सुरूचे बन असून थोडासा निर्मनुष्य असलेला किनारा शांत आणि स्वच्छ आहे.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)