Tuesday, May 6, 2025

श्रध्दा-संस्कृती

Shri Swami Samarth: स्वामी पृथ्वीतलावर प्रकटले

Shri Swami Samarth: स्वामी पृथ्वीतलावर प्रकटले

समर्थ कृपा - विलास खानोलकर

श्री ब्रह्मा, विष्णू, महेश हे जगताचे मालक, विश्वाचे दयाघन, जगताच्या उद्धारासाठी त्यांनी वारंवार पृथ्वीवर अवतार घेतला. मानवाच्या भल्यासाठी, त्याला सन्मार्ग दाखवण्यासाठी विविध रूपे घेतली. अत्री ऋषींच्या घरी अनुसुयेच्या पुत्राच्या रूपाने परमेश्वराने दत्तावतार धारण केला. गुरूदत्तांनी पुढे आंध्र प्रदेशातील पिठापूर नावाच्या गावात आयाप्यराजा आणि त्यांची पत्नी सुमतीच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या रूपाने जन्म घेतला. तर श्रीनृसिंह सरस्वतीच्या रूपाने जगाचा उद्धार केला. पुढे श्रीनृसिंह सरस्वती कर्दळी वनात गुप्त झाले. तेथे त्यांनी तीनशे वर्षे तपश्चर्या केली.

श्रीशैल्य येथील त्या कर्दळी वनात एक लाकूडतोड्या लाकडे तोडायला गेला. लाकडे तोडता तोडता त्याची कुऱ्हाड चुकून एका वारूळाला लागली. तेव्हा त्या वारूळातून रक्त येऊ लागले. लाकूडतोड्या ते बघून घाबरला. थरथर कापू लागला. त्याने वारूळाची माती दूर केली तर त्यातून एक दिव्य, तेजस्वी दिगंबर साधू बाहेर आला. तेच पूर्ण दत्तावतार श्री स्वामी समर्थ ! बघता बघता ही वार्ता छेली गावात पसरली.

श्री स्वामी समर्थ हेच गुरूदत्त, श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, तेच शिर्डीचे साई बाबा! प्रसन्न हसरा चेहरा, विशाल कपाळ, तेजस्वी डोळे, अजानुबाहू, क्रांतीमान उंच शरीर असे श्री स्वामींचे स्वरूप होते. स्वामी कर्दळी वनातून निघाले ते देशाटन करायला गेले. श्री शैल्य, हिमालय, बद्रीनाथ, जगन्नाथपुरी, कलकत्ता असे फिरत फिरत ते गोदावरी नदीच्या काठी पोहोचले. तेथे त्यांची भेट चंचल भारतींशी झाली. श्री स्वामी संचार करीत मंगळवेढा या गावी आले. तेथे बारा वर्षे निवास करून पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट या गावांना त्यांचे वास्तव्य झाले. श्री स्वामी समर्थ सहसा रानात राहत. कधी कधी गावात येत. जय शिव शंकर, नमामी शंकर, शिव शंकर शंभो हा जप श्री स्वामी समर्थ सदा करीत असत. श्री स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांचा उद्धार केला. प्रत्येकाची मनोकामना पूर्ण केली. गरीब, श्रीमंत असा भेदभाव त्यांनी कधी केला नाही. ज्याने भाव ठेवला त्याला देव पावला.

स्वामी चोळप्पा भेट

एके दिवशी स्वामी समर्थ गावाबाहेरच्या ओढ्याच्या काठावर बसले होते. तेव्हा त्याच गावात राहणाऱ्या रामचंद्र रंगारी आणि अहमद नावाच्या दोघांना महाराजांची चेष्टा करण्याची लहर आली. दोघांनी तंबाखू भरून विस्तव न टाकताच गुडगुडी महाराजांकडे दिली आणि त्यांना ती ओढायला सांगितले. आपली चेष्टा करायला दोघांनी गुडगुडी दिली हे श्री स्वामी समर्थांनी जाणले होते. त्यांनी क्षणात ती गुडगुडी घेतली आणि मजेत ओढू लागले. तोंडातून धूर काढू लागले. ते बघून दोघेही थक्क झाले. स्वामींच्या पायांवर लोटांगण घालत ते क्षमा मागू लागले.

रामचंद्र रंगारी म्हणाला, ‘महाराज आपण कोण ? कुठले ? आपले कुणी या गावात आहे का?’ त्यावर महाराज म्हणाले, ‘होय! याच गावात चोळाप्पा नावाचा आमचा नातेवाईक राहतो.’ रामचंद्र रंगारी म्हणाला, ‘महाराज, त्या चोळाप्पाला मी ओळखतो. मी आत्ताच त्याला घेऊन येतो.’ असे म्हणून तो लगबगीने जाऊन चोळाप्पाला घेऊन आला. पण चोळाप्पाने त्यांना ओळखले नाही. महाराजांनी त्याचा पूर्वतिहास त्याला सांगितला. तेव्हा त्याला स्वामींची ओळख पटली. तो स्वामींच्या पाया पडला. तेव्हा स्वामींनी त्याला प्रेमभराने आलिंगन दिले. चोळाप्पा स्वामींना घेऊन आपल्या घरी आला. चोळाप्पा गरीब असल्याने धनधान्य त्याच्या घरात नव्हतं. तो स्वामींची काय सेवा करणार? पण त्याने आग्रहाने स्वामींना जेवू घातले.

एकदा स्वामींना भूक लागली तेव्हा ते चोळाप्पाच्या घरी आले. त्याच्या सासूबाईंना म्हणाले, ‘मला भूक लागली आहे. काही तरी स्वयंपाक करा.’ तेव्हा चोळाप्पाच्या सासूने सांगितले की, ‘घरात धान्याचा कण नाही, तर स्वयंपाक कसा करणार? आणि खायला तरी काय देणार?’

त्यावर श्री स्वामी म्हणाले, ‘जरा स्वयंपाक घरात जाऊन काही आहे का ते बघून तरी या.’ स्वामींचे ते बोलणे ऐकून सासूबाई घरात गेल्या, तर स्वयंपाकघरात त्यांना पंचपक्वान्नांनी भरलेली ताटे दिसली. त्यांना खूप आश्चर्य वाटले. त्यांनी स्वामींना वंदन केले. त्यांची भक्ती स्वामीचरणी जडली.

स्वामी गुणगान

आज स्वामी चरित्र वाचा स्वामी सेवक बना काय वाचा ||१|| पालखी सोबत आनंदाने नाचा स्वामी मठात लवकर पोहचा ||२|| भंडाऱ्याने गरिबांना पोसा स्वामी देतील सोन्याचा मासा ||३|| तुकाराम बीजदिनी अभंग वाचा ज्ञानेश्वराचे पसायदान वाचा ||४|| नामदेवाचे शतकोटी अभंग वाचा सोपान मुकाबाई वाचा ||५|| निवृत्तीनाथा बंधु प्रेमाने नाचा श्री गणेशा प्रमाणे मातृभक्तीने नाचा ||६|| दत्तात्रया परी अनुसयामय व्हा महादेव शंकरापरी निस्वार्थ व्हा ||७|| शंकराचार्या परी ज्ञानी व्हा स्वामी विवेकानंदापरी देशप्रेमी व्हा ||८|| कार्तिकस्वामी परी शूरवीर व्हा श्रीकृष्ण प्रमाणे मित्रप्रेमी व्हा ||९|| अर्जुना परी धनुर्धारी व्हा भीमापरी ताकदवान व्हा ||१०|| धर्मराजापरी सत्यप्रेमी व्हा सावित्रीपरी सुखीसंसारी व्हा ||११|| विठ्ठला परी भक्तप्रेमी व्हा नामदेव पायरीचे भक्त व्हा ||१२|| गांधी विनोबा परी देश सेवक व्हा आंबेडकरां प्रमाणे शिकून मोठे व्हा ||१३|| साईबाबांची श्रद्धा सबुरी ठेवा चीन पाकीस्तानला लांब ठेवा ||१४|| सैनिकांपरी दिनरात करा देशसेवा श्री स्वामी देतील प्रसादरूपी मेवा ||१५|| स्वामी किर्ती जगभर झेंडा प्रकट दिनी लावा झेंडा ||१६||

[email protected]

Comments
Add Comment