
सई ताम्हणकरने केली दुनियादारीच्या सिक्वेलची घोषणा
मुंबई : मराठी सिनेसृष्टीत (Marathi Cinema) अत्यंत गाजलेल्या सिनेमांपैकी 'दुनियादारी' (Duniyadari) हा एक सिनेमा आहे. दुनियादारी प्रदर्शित झाल्यानंतरच्या काळात त्याने तरुणाईला अक्षरशः वेड लावलं होतं. मराठीतील उत्तमोत्तम कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या या चित्रपटातील गाणी आणि संवाद आजही प्रेक्षकांच्या तितकेच लक्षात आहेत. दिग्या, श्रेया, शिरीन, मिनू या पात्रांना आणि त्यांच्यातील मैत्रीला प्रेक्षकांनी आपलंसं केलं. आजही या पात्रांवरील मीम्स प्रचंड व्हायरल होत असतात. या सिनेमाच्या बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) हिने दुनियादारीच्या सिक्वेलची घोषणा केली आहे.
सई ताम्हणकरने दुनियादारी चित्रपटात शिरीनचं पात्र साकारलं होतं. दिसायला सुंदर आणि धाडसी असलेल्या शिरीनने प्रेक्षकांची मने जिंकली. शिरीनच्या भूमिकेमुळे सईची लोकप्रियता आणखी वाढली. यानंतर तिने अनेक हिंदी, मराठी चित्रपट व वेबसिरीजमधून काम केले. पण शिरीन प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. सई ताम्हणकरने नुकतीच मॅशेबल इंडियाच्या द बॉम्बे जर्नी या शोमध्ये हजेरी लावली. यावेळी तिला शोचा होस्ट सिद्धार्थने तुम्ही सगळ्यांनी दुनियादारी सिनेमाच्या कास्टच्या रियुनियनचा विचार केला आहे का? असा प्रश्न विचारला. त्यावेळी तिने सिनेमाच्या सिक्वेलवर काम करत असल्याची गोष्ट रिव्हील केली.
सई म्हणाली, "खरंतर आम्ही दुनियादारी सिनेमाच्या सिक्वेलवर काम करतोय. मी ही गोष्ट आधी कोणत्याही मुलाखतीमध्ये रिव्हील केली नाहीये. मी पहिल्यांदा या शोमध्ये बोलतेय. मी सिनेमाची स्क्रिप्ट वाचली आहे. ती खरंच खूप चांगली स्क्रिप्ट आहे. अजून आम्ही याविषयी घोषणा केलेली नाही आणि मला आशा आहे की आम्ही हा सिनेमा बनवू. आता आम्ही फक्त सुरुवातीच्या टप्प्यावर काम करतोय. "
सईच्या घोषणेमुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे. दुनियादारी सिनेमाचं दिग्दर्शन संजय जाधवने केलं होतं. यानंतर आता सिनेमाच्या दुसर्या भागात नेमकं काय पाहायला मिळणार? कोणकोणते कलाकार असणार? या सगळ्याविषयी चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र, याबाबत संजय जाधवने अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. त्यामुळे तो या सिक्वेलची घोषणा कधी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.